आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • City Bus Decreases And School Bus Increases Aurangabad

शहर बस मंदावल्या, स्कूल बस फोफावल्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अवैध वाहतुकीविरोधात दहा जूनपासून मोहीम हाती घेण्याबरोबरच नवीन बस शहरात दाखल होतील, अशी घोषणा विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली होती; परंतु ती घोषणा हवेत विरली आहे आणि आदेश बासनात गुंडाळला गेला आहे. त्याचा फटका शालेय विद्यार्थी व त्यांच्या पालकांना बसत असून दुप्पट पैसे देऊनही लहानग्या विद्यार्थ्यांना कोंडवाड्यासारख्या अवस्थेत प्रवास करावा लागत आहे. बससेवेच्या नावाखाली शाळा दरवर्षी लाखो रुपयांची कमाई करत आहेत.

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी एसटी महामंडळाला 1970 मध्ये देण्यात आली. मात्र, चालक-वाहक आणि महामंडळाच्या अधिकार्‍यांमुळे ती डबघाईला आली आणि नंतर बंद पडली. त्यानंतर 2006 मध्ये महापालिकेने अकोला नागरी वाहतूक संस्थेमार्फत छोट्या बसद्वारे सेवा सुरू केली. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, ही सेवाही मनपा अधिकारी, पदाधिकार्‍यांच्या अकर्मण्यतेमुळे 2009 मध्ये बंद झाली. शाळा व्यवस्थापनाची बससेवा किंवा रिक्षांशिवाय अन्य पर्याय पालकांपुढे राहिला नाही. मुंबई-पुण्यासारख्या मोठय़ा शहरांमध्ये बससेवा सुरळीत चालते, विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरते. पण औरंगाबादमध्ये असे का होत नाही हा मोठा प्रश्न आहे. महत्त्वाचे म्हणजे एसटीची सेवा नसल्याने शाळांचे व्यवस्थापन, रिक्षाचालक मनमानी पद्धतीने वाहतुकीचा खर्च पालकांकडून वसूल करत आहेत. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने शिक्षण क्षेत्र, वाहतूक व्यवसायातील मान्यवर, शाळांचे प्रशासकीय अधिकारी, पालकांशी संवाद साधला असता शहर बसची संख्या वाढवल्यास पालकांचे दरमहा किमान दहा लाख रुपये वाचतील, वाहतुकीची कोंडी थांबेल आणि विद्यार्थ्यांचा प्रवासही सुरक्षित होईल, असे स्पष्ट झाले.

महामंडळाची घोषणा हवेतच
महापालिकेने चालवण्यासाठी घेतलेल्या एएमटीचा तीनच वर्षांत बोजवारा उडाला. त्यानंतर पुन्हा महामंडळाने या सेवेचा ताबा घेतला. लहान बस आणून गल्लीबोळात फिरवू असा दावा करण्यात आला. लवकरच 200 बसेस शहरात फिरतील असे सांगण्यात आले; परंतु दोन वर्षांनंतर फक्त 30 बस धावत आहेत. परिणामी शहरात रिक्षा, अँपे, मिनी मेटॅडोरची वाहतूक वाढली असून अपघातांनाही आमंत्रण दिले जात आहे. 50 पेक्षा 25 आसनांच्या छोटेखानी बस सुरू केल्यास त्या गल्लीबोळातून फिरू शकतात. शाळेच्या तसेच कामगार, नोकरदारांच्या कामाच्या वेळी बसच्या फेर्‍या वाढवल्या तर नागरिकांबरोबरच महामंडळालाही त्याचा फायदा होऊ शकतो. अवैध वाहतुकीतून होणार्‍या प्रवासाची उबग आलेल्यांना एकदा बसची सवय लागली की अशी अवैध वाहने शहराबाहेरचा रस्ता धरतील, असाही सूर पालकांनी व्यक्त केला.

25 दिवसांसाठी महिन्याचे भाडे
बड्या शाळांतर्फे जी बससेवा पुरवली जाते त्यात अंतरानुसार दोन ते तीन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यासाठी दरमहा 600 ते 750 रुपये, दुसर्‍या टप्प्यासाठी 900 ते एक हजार आणि घरापासून सर्वाधिक अंतरावर शाळा असेल तर दरमहा 1200 रुपयापर्यंत शुल्क आकारले जाते. हे शुल्क एका महिन्यासाठी असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात शाळा एका महिन्यात जास्तीत जास्त 26 दिवस भरते. सरासरी शाळेचे दिवस हे 23 ते 25 याच दरम्यान असतात.

एका बसचा दिवसाचा खर्च असा
शाळेपासून एका विद्यार्थ्याचे घर सर्वाधिक म्हणजे 15 किलोमीटर अंतरावर आहे, असे आपण गृहीत धरू. सकाळी बस त्याला शाळेत सोडते तेव्हा 15 किलोमीटर ती धावते. दुपारी ही बस दुसर्‍या मुलांना सोडून सकाळच्या मुलाला परत आणेल. सायंकाळी पुन्हा घेण्यासाठी जाईल. म्हणजे सकाळी 30, दुपारी 15 आणि सायंकाळी 30 असे मिळून दिवसात बस 75 किलोमीटर धावेल. हे कमाल अंतर ठरणार आहे. मोठी बस एक लिटर डिझेलला शहरात पाच किलोमीटर चालते असे गृहीत धरू. बसमध्ये जास्त भार नसला तरी शहरातील वाहतूक, वेग यामुळे हे अंतर गृहीत धरण्यात आले आहे. अन्यथा 50 मुलांना ने-आण करणारी ही बस किमान 8 किलोमीटरचे अंतर एका लिटरमध्ये कापते. त्यामुळे 75 किलोमीटरसाठी गाडीला 15 लिटर डिझेल लागते. सध्याचा डिझेलचा दर 52 रुपये असून त्यामुळे एका बसला दिवसाला 800 रुपये लागतील. चालकाला महिन्याला 9 हजार पगार गृहीत धरला तर 300 रुपये त्याचे होतात. एकूण 1100 रुपये प्रतिदिन एका बसचा खर्च झाला. देखभाल दुरुस्ती तसेच घसारा असे सर्व गृहीत धरले तर दीड हजार एवढय़ा रकमेत बस फायद्यात चालू शकते. (आकडे वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहेत.)

पालकांकडून घेतली जाणारी रक्कम : विद्यार्थ्यांकडून सरासरी 900 रुपये प्रतिमहा घेतले जातात, असे गृहीत धरल्यास 90 हजार रुपये पालकांकडून घेतले जातात. कारण, एक बस एकाच शाळेत दोन सत्रांत काम करते. म्हणजे सकाळचे 50 आणि दुपारचे 50 विद्यार्थी. 90 हजार 30 दिवसांचे म्हणून जमा होतात आणि बस प्रत्यक्षात फक्त 25 दिवस धावते. म्हणजेच 100 विद्यार्थ्यांकडून बसमालक एका दिवसासाठी 3 हजार 600 रुपये घेतो. त्याच्या खर्चाच्या दुप्पट रक्कम विद्यार्थ्यांकडून वसूल केली जाते.

शहर बस आल्यास दरमहा 100 रुपयांत काम भागेल : सध्या बससाठी 900 रुपये प्रतिमहिना शुल्क देणार्‍या विद्यार्थ्याला सवलतीच्या दरात पास मिळू शकेल. शहराचा विस्तार पाहता म्हणजेच जास्तीत जास्त 15 ते 20 किलोमीटरचा टप्पा घेतला तर एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मासिक पास हा जास्तीत जास्त 150 रुपयांपर्यंत जाऊ शकेल. शालेय विद्यार्थ्यांसाठी तो 100 रुपयांच्या आसपास राहू शकेल, असे एस. टी. महामंडळाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

शहरात सध्या केवळ 40 बसगाड्या : शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाकडून सिटी बसची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थी महिनाभर प्रवास करूनही त्याला 10 दिवसांचे भाडेच आकारले जाते. मुलांना ही सुविधा वयाच्या 25 वर्षांपर्यंत पुरवली जाते, तर मुलींना 33 वर्षांपर्यंत या सुविधेचा लाभ घेता येतो. सध्या औरंगपुरा, सिडको आणि रेल्वेस्टेशन या क्रूपासून विविध मार्गांचे पास दिले जातात. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेतल्यास त्यांचा प्रवास सुखकारक होऊ शकतो. शिवाय अल्पवयीन विद्यार्थ्यांना वाहन चालवण्याची गरज पडणार नाही. विशेष म्हणजे पालकांनी आणि शाळांनी मागणी केल्यास शाळेच्या वेळेत गाडी सोडली जाते. सध्या केवळ 40 गाड्या ही सुविधा पुरवतात.

शहर बस हवीच
आजही 100 टक्के विद्यार्थी बसने येत नाहीत. काही रिक्षांचा वापर करतात तर काहींची ने-आण पालक दुचाकीवरून करतात. औरंगाबाद शहर हे भविष्यात आणखी मोठे शहर होऊ घातले आहे. तेथे शहर बसची नितांत गरज असून त्याचा शाळकरी मुलांना नक्कीच फायदा होईल. देशातील मोठय़ा शहरांत अनेक विद्यार्थी शहर बसने प्रवास करतात.’ रणजित दास, प्राचार्य, नाथ व्हॅली.

वाहतुकीचा प्रश्न मिटेल, खर्चही वाचेल
अनेक वर्षांपासून शहर बस फक्त स्वप्नातच दिसते. दुसरीकडे रिक्षाचालक थेट घरापर्यंत येतात. त्यामुळे बस थांब्यापर्यंत पालकांना सोडण्याचे काम राहत नाही. पती-पत्नी दोघेही नोकरीवर असतात तेथे रिक्षालाच प्राधान्य दिले जाते; परंतु बसची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली तर वाहतुकीचा प्रश्न मिटेल. खर्चातही बचत होईल, हे मात्र खरे.’ अविनाश कुलकर्णी, सातारा परिसर.

डिझेल वाढल्याने शुल्कवाढ
आमच्या शाळेने विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली आहे. सीसीटीव्ही कॅमेर्‍यांबरोबरच सुरक्षेच्या सर्व उपाययोजना आम्ही करतो. त्यामुळे आमची मुले शहर बसमध्ये प्रवास करणार नाही. गेल्या वर्षभरात डिझेलमध्ये 16 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे शुल्कवाढ करण्यात आली. त्याला पर्याय नाही.’ मुलतान सिंह, प्रशासकीय अधिकारी, पोदार इंटरनॅशनल.

मागणी केल्यास बससेवा देऊ
औरंगाबाद विभागासाठी 200 नवीन बसची मागणी करण्यात आली आहे. पुढील 2 महिन्यांत या बस मिळण्याची आशा आहे. बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. पालकांनी शाळेच्या वेळेत अधिक बसची मागणी केल्यास त्याचा नक्की विचार होईल. लोकप्रतिनिधी व नागरिकांनी तसे लेखी निवेदन दिल्यास गरजेप्रमाणे अधिक बस पुरवल्या जातील. शाळांनीही याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा आहे.’ सुभाष देवकर, वरिष्ठ पर्यवेक्षक (एसटी महामंडळाच्या शासकीय समितीचे सदस्य)