आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंत्रामध्ये प्लास्टिक टाकताच चटकन हाती पडतील पैसे..!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बाटलीबंद पाणी संपल्यानंतर प्लास्टिकची बाटली रस्त्यावर फेकली जाते. कॅरीबॅगचेही तसेच होते. त्यामुळे जागोजागी प्लास्टिक कचरा पसरतो. परंतु यापुढे तसे होणार नाही. रिकामी बाटली, कॅरीबॅग किंवा अन्य प्लास्टिकच्या वस्तू नागरिकांना पैसेही मिळवून देतील. प्लास्टिक बाटली किंवा प्लास्टिक एका मशीनमध्ये टाकल्यानंतर वजन किंवा नगाप्रमाणे जो दर ठरला त्यानुसार नागरिकांच्या हाती पैसे पडतील. थोडक्यात एटीएमसारखीच ही कार्यप्रणाली असेल. अशी यंत्रे शहरात जागोजागी लावली जाणार असल्याने प्लास्टिक कचऱ्यापासून शहराची मोठ्या प्रमाणात मुक्तता होणार आहे.
घनकचऱ्याची अद्ययावत पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी काय केले जाऊ शकते, यावर चर्चा करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने नुकतीच एक कार्यशाळा घेतली. त्यात गांडूळ खत निर्मितीबरोबरच अन्य वेगवेगळ्या विषयांवरही चर्चा झाली. औरंगाबाद पालिकेचे घनकचरा व्यवस्थापन प्रमुख शिवाजी झनझन यांच्यासह काही वाॅर्ड अधिकारी या कार्यशाळेस हजर होते. प्लास्टिक कचरा ही मोठी समस्या आहे. फराळाचे पदार्थही प्लास्टिकमध्येच मिळतात. वापर झाल्यानंतर हे प्लास्टिक रस्त्यावर फेकले जातात. परिणामी प्रदूषणात वाढ होते. त्यामुळे हे रोखण्यासाठी रेल्वेस्थानक, बसस्थानक, बाजारपेठांमध्ये प्लास्टिक स्वीकारणारी यंत्रे बसवली तर आपोआपच हा कचरा कमी करणे सोपे होईल. नागरिकांना याकडे आकर्षित करण्यासाठी प्लास्टिकच्या मोबदल्यात पैसे देण्याचा पर्याय ठेवण्यात आला. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने जास्तीचे प्लास्टिक त्या यंत्रात टाकले तर त्याला जास्तीचे पैसे मिळतील. प्लास्टिकचे वजन तसेच त्याच्या प्रकारावर ही रक्कम अवलंबून असेल. ही रक्कम कमी असली तरी नागरिक प्लास्टिकचा कचरा रस्त्यावर फेकणार नाहीत.
यंत्रासाठी १० लाख
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लास्टिकचा कचरा स्वीकारणाऱ्या एका यंत्रासाठी १० लाखांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. मनपाला अशी यंत्रे लावण्यात फारशी आर्थिक अडचण येणार नाही. रेल्वेस्थानक, बसस्थानक, औरंगपुरा, टीव्ही सेंटर, शहरातील मोठी महाविद्यालये आदी ठिकाणी अशी यंत्रे लावली जाऊ शकतात.

निर्णय आयुक्तांचा
^आम्ही कार्यशाळेत या बाबीची माहिती घेतली. शहर प्लास्टिक कचरामुक्तीसाठी हा प्रयोग केला जाऊ शकतो. आणखी अभ्यास केल्यानंतर यावर अंतिम निर्णय आयुक्तांकडून घेतला जाईल. -शिवाजी झनझन, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख.

जागृतीसाठी उपक्रम
नागरिकांनी प्लास्टिकचा कचरा रस्त्यावर फेकू नये, यासाठी नागरिकांना पैसे दिले जाणार आहेत. दिल्ली मुंबईत नागरिकांना रोख रक्कम देता मोबाइलचे रिचार्ज व्हाऊचर किंवा तत्सम पद्धतीने पैसे दिले जातात. येथे एखादी मोबाइल कंपनी समोर आली तर रिचार्ज व्हाऊचरही दिले जाऊ शकते. परंतु तसे झाल्यास रोख रक्कम देण्याचा पर्याय आहे.

प्लास्टिकचे काय ?
यंत्रात टाकलेले प्लास्टिक प्रथम बारीक केले जाईल. त्याचा चुरा एका ठिकाणी साठवला जाईल. त्यानंतर ते प्रक्रियेसाठी अन्यत्र पाठवले जाईल. त्यासाठी वेगळी यंत्रणा असेल. म्हणजे या यंत्रात टाकलेल्या प्लास्टिकपासून अन्य साहित्य बनवले जाईल किंवा त्यापासून पुन्हा प्लास्टिकच्या पिशव्या वा बाटल्या तयार होतील.
बातम्या आणखी आहेत...