आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

८० रुपयांत घडणार ठिकाणांचे पर्यटन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील पर्यटनाचा चालना देण्यासाठी अनेक दिवसांपासून मागणी होत असलेल्या शहर पर्यटन बसला अखेर मुहूर्त मिळाला असून ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून एसटीची खास औरंगाबाद दर्शन बस सुरू होत आहे.
ही बस अवघ्या ८० रुपयांत सिद्धार्थ उद्यानापासून बीबी का मकबरा, पाणचक्की, कलाग्राम, औरंगाबाद लेेणी अशा ठिकाणांचे दर्शन घडवेल. दिवसभरात दोन फेऱ्याद्वारे ही बस पर्यटकांच्या सेवेत हजर असेल. ऑक्टोबरपासूनच ही बस सेवा सुरू होणार होती. मात्र, एेनवेळी मुहूर्त पुढे ढकलण्यात आला. शहरात येणाऱ्या पर्यटकांना पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी रिक्षा किंवा टॅक्सी करावी लागते. यातून पर्यटकांची फसवणूक होण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. शहराबाबत माहिती नसणाऱ्या पर्यटकांकडून कमी अंतरासाठी मोठी रक्कम वसूल केली जाते. फसवणूक झालेले पर्यटक शहराची वाईट प्रतिमा घेऊन आपल्या देशात परततात. हे प्रकार टाळण्यासाठी औरंगाबादेत पर्यटनासाठी खास शहर दर्शन सुरू करण्याची अनेक दिवसांची मागणी होती. ती आता पूर्ण झाली असून एसटीने किफायतशीर दरात शहर दर्शन बस उपलब्ध करून दिली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीनिमित्त पालकमंत्री, परिवहन मंत्री किंवा पर्यटन मंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी (४ ऑक्टोबर) बसचे उद‌्घाटन होणार होते. यासाठी मध्यवर्ती बसस्टँडमध्ये उपस्थित राहण्याची सूचना अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. परंतु एेनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. आता दसऱ्यानंतर ही बस सेवेत येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बसचा मार्ग असा
पहिली बस सकाळी साडेसात ते दुपारी साडेबारादरम्यान तर दुसरी बस दुपारी एक सायंकाळी सहापर्यंत पर्यटकांना शहर दर्शन घडवेल. बसस्टँड, एमटीडीसी कार्यालय, पाणचक्की, सोनेरी महाल, औरंगाबाद लेणी, बीबी का मकबरा, छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय, प्रोझोन माॅल, शहानूरमियां दर्गा ते सिद्धार्थ उद्यान असा या बसचा मार्ग असेल.

माहिती पुस्तिका देणार
या प्रवासासाठी ८० रुपये तिकीट आकारले जाणार असून यासाठी २५ सीटर मिनी बस तैनात करण्यात आली आहे. सुरुवातीला तरी यात गाइड नसेल. परंतु बसला पर्यटकांचा प्रतिसाद मिळाला तर गाइडची नेमणूकही केली जाऊ शकते. पर्यटकांना औरंगाबादची माहिती देणारी पुस्तिका दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...