औरंगाबाद - शहरातील ऐतिहासिक आणि दुर्मिळ वास्तूंमागचा इतिहास जाणून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने आयोजित केलेल्या ‘सिटी वॉक’ उपक्रमाला रविवारी इतिहासप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला. भडकल गेट ते रंगीन दरवाजा या मार्गावर पायी चालत ऐतिहासिक वास्तूंबद्दल नागरिकांनी माहिती जाणून घेतली. इतिहास संशोधक प्रा. डॉ. दुलारी कुरेशी यांनी या सफरीमध्ये शहराचा वैभवशाली इतिहास उलगडून सांगितला.
या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यटन विभागाचे प्रमुख प्रा. डॉ राजेश रगडे, प्रा. रफत कुरेशी, टुरिस्ट गिल्डचे अध्यक्ष जसवंतसिंग, छत्रपती महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख प्रा. संजय खरात, ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक धनंजय लांबे यांची उपस्थिती होती. डॉ. रगडे यांनी ज्युबिली पार्क व त्या परिसरातील ऐतिहासिक वास्तूंबद्दल माहिती दिली. शिवाय ‘सिटी वॉक’ उपक्रमासाठी विद्यापीठातील व विविध महाविद्यालयांच्या इतिहास विषयाच्या मुलांना प्रशिक्षण देऊन एकाच दिवशी अनेक ठिकाणी हा उपक्रम सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक धनंजय लांबे यांनी उपक्रमामागील भूमिका विशद करून अधिकाधिक लोकांना यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.
राजतलक, खडकी ते औरंगाबाद : भडकल गेट, टाऊन हॉल, जामा मशीद, नौबत दरवाजा, काळा दरवाजा, रंगीन दरवाजा अशी अनोखी सफर रंगली. राजतलक ते प्राचीन खडकीपासून औरंगाबाद या नावापर्यंतचा इतिहास कुरेशी यांनी उलगडून दाखवला. कार्यक्रमासाठी अरविंद शहा, प्रशांत पटेल, डॉ. दिवाकर देशमुख, जाकीर अली, मुकुंद भालेराव, शंकर परकंढे, नारायण नेरपगार, सुनील सावंत, एन. ए. जैन, अभिजय गढई, अमोल घुगे, सुनील राठोड, उमेश थोरे, शिरीष तांबे, अशोक गहिलोत, विशाल जाधव, दशरथ कदम, विजय पाटील उपस्थित होते.
..अन् इतिहास जिवंत झाला
सफरीच्या सुरुवातीला भडकल गेटविषयीची माहिती देण्यात आली. लोकांनी उत्सुकनेते ही माहिती जाणून घेतली. कुरेशी यांनी केवळ अध्र्या तासात भडकल गेटचा सर्व इतिहास सर्वांसमोर जिवंत केला. विजयाचे प्रतीक म्हणून बांधण्यात आलेल्या भडकल गेटचे दरवाजे, त्यांचे बांधकाम, तटबंदी त्या काळात होणारा दरवाजांचा वापर याविषयी त्यांनी सविस्तर विवेचन केले. त्यानंतर नौबत दरवाजा, काळा दरवाजा, रंगीन दरवाजाची माहितीही त्यांनी कथन केली. काळ्या दरवाजामधून सैन्याला येण्यासाठी केलेली तत्कालीन व्यवस्था अचंबित करणारी असल्याचे इतिहासप्रेमींनी सांगितले.