आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहराची दुर्दशा तुमच्यामुळेच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- रस्ते, पाणी, साफसफाईसारख्या अत्यावश्यक सेवा पुरवण्यात मनपाला आलेल्या अपयशाला पदाधिकारी, नगरसेवक व अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करीत औरंगाबाद प्रगतिशील नागरिक कृती समितीच्या वतीने शुक्रवारी मनपासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. उमरीकरांच्या आंदोलनानंतर जागे होण्याऐवजी मनपा पदाधिकार्‍यांनी दबाव आणून गुन्हे नोंदवल्याचा निषेध करीत मनपाने अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असा सज्जड इशारा समितीने दिला.

औरंगाबाद प्रगतिशील नागरिक कृती समितीचे प्रा. विजय दिवाण, सुभाष लोमटे, अण्णासाहेब खंदारे, प्रा. राम बाहेती यांच्या नेतृत्वाखाली नागरी समस्यांबाबत मनपाच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. या नंतर शिष्टमंडळाने उपायुक्त सुरेश पेडगावकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा आणि समांतर जलवाहिनी, मलनिस्सारण प्रकल्पांची कमतरता, साफसफाईचा बोजवारा, करवसुलीतील अडचणी, खासगीकरणाचा घाट आणि भ्रष्टाचार या मुद्दय़ांवर त्यांनी मनपाला धारेवर धरले. शहराच्या दुर्दशेला पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी सगळेच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रा. विजय दिवाण यांनी श्रीकांत उमरीकरांनी केलेल्या आंदोलनाचा उल्लेख करीत सुनावले की, काही पदाधिकार्‍यांनी दबाव आणून आंदोलन करणार्‍यांवर गुन्हे नोंदवले. हे वाईट आहे. जनतेला त्यांचे हक्क, प्रश्नांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे असे गुन्हे नोंदवून अशांतताच निर्माण केली जाते. मनपाने ते काम करू नये असा टोला त्यांनी लगावला. पाणी प्रश्नाबाबत ते म्हणाले की, समांतर हा एक भ्रष्टाचारमूलक कार्यक्रम आहे. जेवढय़ाची पाणीपट्टी घेता तेवढेच पाणी द्या, नाहीतर आम्हाला पाणीपट्टी न भरण्याचे आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला. या वेळी सुभाष लोमटे, अण्णासाहेब खंदारे, प्रा. राम बाहेती, मधुकर खिल्लारे, प्रदीप पुरंदरे, राजेंद्र देशमुख, भगवान भोजने, अश्फाक सलामी, जयश्री गायकवाड आदींची उपस्थिती होती. आंदोलनात अर्जुन दिवेकर, डॉ. एस. एम. नईम, बुद्धप्रिय कबीर, नारायण जाधव, सुखदेव बन, देवीदास कीर्तिशाही आदींचा सहभाग होता.

कळीच्या मुद्दय़ांवर घणाघात
रस्ते : रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत कंत्राटदाराकडून हमीपत्र घ्या. शहरात पॅचवर्कचे जेवढे काम झाले त्या खर्चात रस्ते नव्याने करता आले असते. कशाचाच हिशेब नसल्याने पॅचवर्कची कामे केली जातात.

मलनिस्सारण प्रकल्प :
ड्रेनेज खाम आणि सुखना नदीत सोडले जाते. ते थांबवून प्रकल्प उभारावेत. खाम नदीच्या पाण्याचा वापर करावा. कर बुडवणार्‍यांची यादी मनपाने जाहीर करावी.

समांतर जलवाहिनी :
जीवन प्राधिकरणाने दिलेला 511 कोटींचा प्रकल्पच करायला हवा होता. मनपानेच जलवाहिनी टाकावी व टप्प्याटप्प्याने शहरातील पाइपलाइन बदलावी.