आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Civics Issue : New Society Proposal In Cidco Area

नागरी प्रश्‍न: सिडको भागात आधुनिक वसाहतीचा प्रस्ताव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सिडको एन-5 मधील गुलमोहर कॉलनीतील 629 घरे पाडून त्याठिकाणी अत्याधुनिक पाच मजली रहिवासी संकुल उभारण्याचा प्रस्ताव प्रथमच पुढे आला आहे. मात्र, या प्रकल्पास घरमालकांचा विरोध असल्याने त्यास अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे.
नवीन प्रस्तावासंदर्भात भक्ती गणेश मंदिर एन-1 सिडको येथे रविवारी बैठक झाली. या वेळी 629 घरमालकांपैकी 40 जण उपस्थित होते. चारमजली सिडकोच्या योजनेतील चौथ्या मजल्यावरील घरमालकच बैठकीस आले होते. सिडको गुलमोहर कॉलनीत मध्यम उत्पन्न गटासाठी 629 घरांचे बांधकाम करण्यात आले. सिडकोने 1982 मध्ये घरांचे वाटप केले. चाळीस वर्षांनंतर ही घरे पाडून नवीन पाचमजली घरे बांधण्याचा प्रस्ताव एविया कन्स्ट्रक्शन ग्रुपने तयार केला आहे. सिडकोचे मनपाकडे हस्तांतरण झाल्यानंतर आता शंभर टक्के रहिवाशांची परवानगी असली तरच योजना कार्यान्वित होण्याचा मार्ग सुकर होईल.
कोण आहे एविया ग्रुप ? : विकासक अमित पटेल व त्यांचे पुत्र जेमिन पटेल यांची कंपनी असून सिडकोच्या अनेक योजनांचे बांधकाम यांनी केले आहे. शहरातील अक्षयदीप, अजयदीप व राजदीप कॉम्प्लेक्सची उभारणी केली आहे. अमरावती व ठाणे येथील पोलिस दलाची घरे व बडोदा (गुजरात) येथील मॉलचे बांधकाम केले आहे.
काय आहे प्रस्ताव ?
सिडकोच्या योजनेतील घरमालकांचे ना हरकत प्रमाणपत्र द्यावे. नागरिकांना आहे त्या जागेपेक्षा जास्त जागेत फ्लॅट बांधून देणार. मध्यम उत्पन्न गट 1 साठी घरमालकास 3 लाख रुपये तर मध्यम उत्पन्न गट 3 साठी चार लाख रुपये द्यावे लागतील. योजना तीन वर्षांत पूर्णत्वास जाणार तोपर्यंत घरमालकांनी आपल्या निवासाची व्यवस्था स्वत: करावी. नवीन घरे तयार झाल्यानंतर सोडत पद्धतीने वितरण होईल. सर्वच जण ग्राउंड फ्लोअर मागतील तर तिसर्‍या-चौथ्या मजल्यावर कोणी जावे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
काय आहेत अडचणी ?
ज्यांना ग्राउंड फ्लोअर अथवा दुसरा मजला मिळाला असेल त्यांना योजनेत रस नाही. अनेकांनी बँकेत आपली घरे तारण ठेवली आहेत. 3 वर्षे भाड्याने कुठे राहणार, चार लाख रुपये कुठून आणणार? अनेकांनी दोन घरे घेऊन आपली सोय केली आहे. घरांचे नूतनीकरण केले अशांनी योजनेच्या बैठकीकडे पाठ फिरवली.
योजना नियमाप्रमाणेच
गुलमोहर कॉलनीतील जुनी घरे पाडून नवीन घरे बांधण्याचा प्रस्ताव ठेवला असून संपूर्ण एफएसआय वापरून नागरिकांना घरे देणार. उर्वरित जागेत आम्ही आमच्या पद्धतीने घरे बांधून त्यांची विक्री बाजारभावाप्रमाणे करणार आहोत. अजित पटेल, एविया ग्रुप.
योजना शक्य नाही
सिडकोत अशा प्रकारची योजना शक्य नाही. सिडकोची जागा लीजवर असून घरांची मालकीही सिडकोची आहे. सिडकोच्या योजनेची घरे पाडून नवीन मल्टिस्टोरी अपार्टटमेंट उभारणे सिडको प्रशासनाच्या परवानगीशिवाय अशक्य आहे. पंजाबराव चव्हाण, प्रशासक, सिडको.
योजना सिडकोमध्येच का ?
सिडको वाशी (नवी मुंबई) येथे अशा प्रकारची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सिडकोची जुनी घरे पाडून नवीन घरे बांधण्यात आली. घराच्या नूतनीकरणास कुठलीही संस्था परवानगी देते. संपूर्ण नागरिकांनी ना हरकत दिल्यास प्रश्न मार्गी लागू शकतो. गुलमोहर कॉलनी मध्यवर्ती भागात असून टू बीएचके फ्लॅट 70 लाखांत विक्री होतो. सिडकोच्या घरांचे 1982 मधील मूल्य 35 हजार असून आज रोजी 20 ते 25 लाख रुपयांपर्यंत विक्री होते.