आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘क्लासिकल औरंगाबाद’ रसिकांना देणार माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- फेसबुक हे संवादाचे प्रभावी माध्यम असून सर्व स्तरांतील मंडळीचा याचा सर्रास आणि झपाट्याने वापर करत आहेत. फेसबुकद्वारे विविध विषयांवर मत मांडण्यासोबतच अनेक वैविध्यपूर्ण विषयांची माहितीही याद्वारे दिली जाते. असाच प्रयोग करत संजीव शेलार यांनी औरंगाबादेतील शास्त्रीय कलाप्रकारांच्या रसिकांसाठी ‘क्लासिकल औरंगाबाद’ हे फेसबुक पेज तयार केले आहे.

शहरात अनेक लहान मोठे शास्त्रीयनृत्य, संगीत आणि वादनाचे कार्यक्रम होत असतात. मात्र, त्याची माहिती प्रत्येकवेळी रसिकांना मिळतेच असे नाही. अनेक महान कलावंत शहरात येत असतात. त्यांना ऐकण्याची आणि भेटण्याची अनेकांची इच्छा आहे. मात्र, माहितीअभावी अनेक इच्छुकांना कार्यक्रम झाल्यानंतर माहिती मिळत होती, यातूनच हा नवा हायटेक विचार पूढे आला. दै. दिव्यमराठीने आठ महिन्यांपूर्वी घेतलेल्या स्वरझंकार कार्यक्रमाचा शहरातील दर्दी रसिकांनी आस्वाद घेतला. अत्यंत दज्रेदार अशा या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने रसिक उपस्थित होते. तेव्हा अशा कार्यक्रमांची माहिती हमखास मिळेल अशी काही तरी योजना आपणच रसिकांनी मिळून निर्माण करावी अशी चर्चा झाली. संजीव शेलार यांनी पुढाकार घेतला. फे सबुकचा समाजावर असलेला प्रभाव लक्षात घेता, ‘क्लासिकल औरंगाबाद’ची निर्मिती झाली. सध्या या पेजवर 400 फ्रेन्डस एकत्र आलेले आहेत. तर आजवर 30-35 कार्यक्रमांची माहितीही यावर देण्यात आली आहे.

आगामी काळात कलावंतांची माहिती देणार
या पेजवर आगामी काळामध्ये प्रत्येक कार्यक्रमात येणार्‍या विविध कलावंतांची माहिती किंवा त्यांच्या लिक्स देण्यात येणार आहेत. यामुळे कलावंतांची माहितीही रसिकांपर्यंत थेट पोहचणार आहे. वर्षभरात 50 च्या आसपास कलावंत शहरात हजेरी लावतात. कलावंत करत असलेल्या नव्या प्रयोगांची माहितीही यावर देण्यात येणार आहे.

कार्यक्रमांची इत्थंभूत माहिती
या पेजवर कार्यक्रमाचे स्थळ, काळ, वेळेसह कलावंत यांची माहिती तर आहे. याशिवाय शहरातील इतर कार्यक्रम आयोजकांनीही या पेजवर आपल्या कार्यक्रमांची माहिती देत राहावी, असे आवाहन संजीव शेलार यांनी केले आहे.

याखेरीज ‘क्लासिकल म्युझिक शेअरिंग’ असे मुख्य आणि स्वतंत्र पानही आहे. यामध्ये विविध गायक, वादक आणि नर्तकांची माहिती, होणार्‍या कार्यक्रमांची माहितीही देण्यात आली आहे.

छोटेखाणी मैफलीतून निर्माण होणार रसिक
शहरात खुल्या आणि मोठय़ा कार्यक्रमांसोबतच छोटेखाणी(खासगी) मैफलींचे प्रमाण वाढलेले आहे. खरे कानसेन हे अशाच मैफलींतून निर्माण होतात. त्यामुळे छोटेखानी मैफलींची माहिती मिळणे आवश्यक आहे. यासाठी कलावंतांची जबाबदारी आहे, तसेच सूज्ञ रसिकांचीही जबाबदारी महत्त्वाची आहे. हा विचार ठेवून शेलार यांनी हे पेज निर्माण केले आहे.