आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहाटेपर्यंत रंगला महोत्सव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड-अंबड शहरात नव्याने बांधलेल्या गायनाचार्य पं. गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात शनिवारपासून श्री दत्तजयंती संगीत महोत्सव सुरू झाला. या महोत्सवाचा पहिला दिवस गाजवला तो पद्मभूषण राजन आणि साजन मिश्रा बंधूंनी. पहाटे अडीचपर्यंत रंगलेल्या संगीत सभेत पंडित मोहन दरेकर, सतारवादक उस्ताद उस्मानखाँ, पंडित कल्याण गायकवाड यांनी बहारदार गायन करून अंबडवासीयांवर शब्दसुरांची बरसात केली.
पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संतोष सांबरे, जिल्हाधिकारी श्याम देशपांडे यांची उपस्थिती होती. पंडित राजन आणि साजन मिश्रा बंधूंच्या गायनात बनारस घराण्याची पूर्ण छाप दिसून आली. त्यांनी सुरेल लयकारी, रंजक आणि नजाकदार तानांमधून एक उत्कृष्ट कलाकृती रसिकांसमोर सादर केली. मिश्रा बंधूंनी जोग रागाने गायनास सुरुवात केली.
विलंबित एकतालातील चिजेचे बोल होते ‘साजन मोरे घर आ’ ही चीज अगदी मनसोक्तपणे रंगवल्यानंतर त्यांनी द्रुत तीनतालात ‘सजन का से कहू’ ही चीज पेश केली. त्यानंतर त्यांनी बिहागडा रागात ‘दानी-दानी तू दानी..तू दानी..दानी..तू दीन’ हा अंबडकर रसिकांनी न ऐकलेला अनवट प्रकार ऐकवून ‘धन्य भाग सेवा का अवसर पाया’ या सूरसंगम चित्रपटातील लोकप्रिय भैरवीने पहिल्या दिवशीच्या सभेची सांगता केली. त्यांना हार्मोनियमवर जयंत नेरळकर, तर तबल्यावर पं.अरविंदकुमार आझाद यांनी साथसंगत केली. सन 1999 पासून दत्तजयंती संगीत महोत्सवाला उपस्थित राहून आपल्या सतारवादनाची सेवा अव्याहतपणे सादर करणाºया उस्ताद उस्मानखाँ यांनी नेहमीच्याच तयारीने सतारवादन सादर केले. आलाप, जोड आणि झाला या प्रकारातून त्यांनी विलंबित एकताल आणि द्रुत तीनतालात राग चारुकेशी सादर केला. त्यांना तबल्यावर प्रा. शोण पाटील यांनी साथ दिली. गायकीच्या अंगाने सतारवादन करणे हे उस्मानखाँ साहेबांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या वादनाने अंबडकर रसिकांच्या स्मृती पुन्हा एकदा जागृत झाल्या. पंडित राजन आणि साजन मिश्रा यांचे शिष्य तथा मराठवाड्यातील रहिवासी पं. मोहन दरेकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. आपल्या भारदस्त आवाजात त्यांनी राग बागेश्री सादर केला. त्यांना हार्मोनियमवर अनंत जोशी, तर तबल्यावर प्रशांत पांडव यांनी साथसंगत केली.