आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता आणि आरोग्य हीच खरी संपत्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कचरा ही शहराची समस्या झाली आहे. मनपा यंत्रणेचे हे अपयश आहेच, मात्र हातावर हात धरून बसूनही काही उपयोग नाही. थोडी जबाबदारी आणि पुढाकार घेतला तर हे कामच आपली ओळख होऊ शकते. असाच काहीसा विचार शिवनेरीनगर येथील ज्येष्ठ रहिवाशाने केला आणि हा विचार बोलून दाखवला. त्यांचा हा विचार कॉलनीतील सार्‍या आबालवृद्धांनी उचलून धरला आणि बघताबघता अंतर्गत रस्ते, मैदान आणि सामाजिक सभागृहासह संपूर्ण परिसर स्वच्छ आणि सुंदर झाला. स्वच्छता म्हणजेच आरोग्य आणि आरोग्य म्हणजेच संपन्नता या चांगल्या व आदर्श ठरणार्‍या विचारांना साथ मिळाली आणि चमत्कार झाला. सर्वांनीच हा विचार रुजवावा असेच हे उत्तम उदाहरण..

मोकळ्या जागेत वाढलेले गाजरगवत, जागोजागी कायम दिसणारे कचर्‍याचे ढीग, उकिरडा आणि दुर्गंधी..ही अवस्था उल्कानगरी भागातील शिवनेरीनगर या वसाहतीत नेहमीच असायची. परिणामी डास आणि रोगराईही ठरलेली. याच वसाहतीत सी. जी. आगलावे हे उद्योजक राहतात. त्यांनी या कचर्‍याच्या समस्येवर उपाय सुचवला. कोजागरी पौर्णिमा साजरी करताना त्यांनी आपण स्वत:च आता स्वच्छता अभियान राबवायचा विचार मांडला. त्याला कॉलनीवासीयांनीही होकार दिला.

तरुणांसह ज्येष्ठही उत्साही
कॉलनीवासीयांनी लगेच शुभस्य शीघ्रम या उक्तीप्रमाणे प्रत्यक्ष अभियानात सहभाग नोंदवला. परिसरातील खुले मैदान, सामाजिक सभागृहाचा परिसर, अंतर्गत रस्ते आणि खासगी खुल्या जागांवरील कचर्‍याचे ढीग तसेच गवत स्वच्छ करायला प्रारंभ केला. कोजागरी पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी 19 ऑक्टोबर रोजी सुरू झालेले हे अभियान 1 नोव्हेंबर 2013 रोजी संपले. या काळात सारा परिसर नंदनवनासारखा स्वच्छ झाला.


पालिकेनेही केले मनापासून कौतुक
या लोकांचे हे मोठे काम पाहून मनपानेही त्यांचे कौतुक केले. महापौर कला ओझा आणि मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी स्वत: या स्वच्छता अभियानाची पाहणी करून शिवनेरीनगरवासीयांना शुभेच्छा दिल्या.