आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत 350 टन कचर्‍याची सफाई; विद्यार्थ्यासह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दहा हजार विद्यार्थी, नागरिकांनी रविवारी विविध भागांत साफसफाई केली. औरंगाबाद -जपानमधील क्योटो या दोन्ही महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महास्वच्छता अभियानाला पावसाचा थोडा फटका जरूर बसला, पण दिवसभरात या मोहिमेत 300 ते 350 टन कचरा उचलण्यात आल्याचे मनपाने सांगितले. मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे अडीच महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर परतले आणि लगेच आज त्यांनी हाती झाडू धरून या अभियानात भाग घेतला. सोमवारपासून मनपात प्रशासकीय साफसफाई सुरूकरण्याचे संकेतही त्यांनी दिले.

महास्वच्छता अभियानाचे हे दुसरे वर्ष आहे. रविवारी शहराच्या सहाही विभागांत हे अभियान राबवण्यात आले. त्यात विविध शाळा, संस्था व नागरिकांनी सहभाग नोंदवला होता. या मोहिमेचा शुभारंभ गजानन महाराज मंदिर चौकात झाला. त्याआधी शहागंजात सायरन वाजवून मोहिमेबाबत नागरिकांना जाणीव करून देण्यात आली. चौकात सकाळी दहा वाजता या मोहिमेला प्रारंभ झाला. भरपावसात जिल्हाधिकारी विक्रमकुमार, मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, विरोधी पक्षनेते डॉ. जफर खान, नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी, सूर्यकांत जायभाये आणि इतरांच्या उपस्थितीत मोहिमेला प्रारंभ झाला. आयुक्तांनी स्वत: झाडू हाती घेत डिव्हायडरजवळील कचरा जमा केला व फावड्याच्या मदतीने तो उचलला. त्यानंतर कामाला प्रारंभ झाला.

सहा वॉर्डांत दहा हजार जणांचा सहभाग
शहरातील सहाही वॉर्डांत हे अभियान राबवण्यात आले होते. त्यात सहभागी झालेल्यांनी सूतगिरणी चौक, त्रिमूर्ती चौक, उत्तमनगर, सिडको बसस्टँड, कैलासनगर स्मशानभूमी, खोकडपुरा, खाराकुंवा, गुलमंडी, चेतनानगर, देवगिरी हायस्कूल परिसर, किराडपुरा, मदनी चौक, मोंढा, शहाबाजार शाळा, कैसर कॉलनी दवाखाना यासह विविध ठिकाणी साफसफाई केली. डी. डी. सूर्यवंशी, एस. आर. जरारे, भालचंद्र पैठणे, व्ही. डी. राठोड या वॉर्ड अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार सहाही वॉर्डांत मिळून किमान दहा हजार जण आजच्या मोहिमेत सहभागी झाले होते.

..तर चांगले काम झाले असते
स्वच्छता दूत चैतन्य भंडारे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले की, या अभियानासाठी आम्ही चांगली तयारी केली होती. शाळा, महिलांचे बचत गट, संस्था, नागरिकांना यात सहभागी करून घेतले होते. मोहिमेच्या दिवशी पाऊस आल्याने थोडा परिणाम झाला. पाऊस नसता तर आणखीही चांगले काम झाले असते. पण नागरिकांचा प्रतिसाद चांगलाच राहिला. डॉ. जयर्शी कुलकर्णी म्हणाल्या की, या मोहिमेत दिवसभरात सर्व वॉर्डांत मिळून सुमारे तीनशे ते साडेतीनशे मेट्रिक टन कचरा उचलला गेला.

यांचे फोटोसेशन, त्यांचे प्रत्यक्ष काम

आयुक्त आणि जिल्हाधिकारी निघून गेल्यावर महापौर कला ओझा, सभागृहनेते सुशील खेडकर, गजानन बारवाल आले. मग त्यांचे फोटोसेशन झाले. जेथे आयुक्तांनी कुंडी साफ केली तेथेच महापौरांनी सफाई केली. मान्यवरांचे हे काम सुरूअसताना साफसफाईचे खरे काम जपानच्या पथकाने दुसर्‍या भागात सुरू केले होते. ते या मान्यवरांसोबत फारसे उभे राहिले नाहीत. चैतन्य भंडारे, मासाशी योशिनो, युकारी नाकामोतो, मिका किताजिमा यांनी रस्त्याच्या कडेला असणार्‍या दुकानांसमोरील कचरा, डिव्हायडरमधील कचरा आणि भाजी विक्रेत्यांनी टाकलेला कचरा हाताने उचलत टोपली भरली. त्यानंतर मनपाचे कर्मचारी त्यांच्या मदतीला आले. सुमारे तासभर ही मंडळी साफसफाई करीत होती. तोपर्यंत मान्यवर रवाना झाले होते. या वेळी उपायुक्त सुरेश पेडगावकर, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, हेमंत कोल्हे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयर्शी कुलकर्णी आदींसह अनेकांची उपस्थिती होती.