आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलित वस्त्यांत स्वच्छता कार्यक्रम आयोजित करा, सामाजिक समता सप्ताहानिमित्त अधिकाऱ्यांची सूचना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सामाजिक समता सप्ताहानिमित्त जिल्ह्यातील सर्व दलित वस्त्यांमध्ये स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात यावेत, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक आयुक्त पी. बी. बच्छाव यांनी केले आहे.
 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ते १४ एप्रिलपर्यंत सामाजिक न्याय विभागातर्फे सामाजिक समता सप्ताह राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त सप्ताहाचा शुभारंभ आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमातून साकार झालेली राज्यघटना आधार मानून मागासवर्ग घटकांच्या विकासासाठी शासन स्तरावरून अनेकविध योजना राबवल्या जात आहेत. त्याचा फायदा घेऊन मागासवर्गीयांनी विकास साधला पाहिजे आणि ग्रामीण शहरी भागात सामाजिक सलोखा निर्माण केला पाहिजे, असेही आवाहन बच्छाव यांनी केले. सहायक आयुक्त (समाजकल्याण) शिवाजी शेळके यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा समाजकल्याण अधिकारी डॉ. सतीश मंडावी यांनी आभार मानले.
 
बच्छाव यांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमास जिल्हा दक्षता संनियंत्रण समितीचे सदस्य उत्तमराव गाडेकर, विष्णू काटकर, बसंती लाहोट ,अशोक तुसांबड, बबिता कागडा, राजपाल सौदे, विलास चांदणे, जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...