आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील चारही मंत्र्यांचा ‘महाराष्ट्र अस्वच्छ’, स्वच्छता मंत्र्यांचेच जालना पिछाडीवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंकजा मुंडे आणि बबनराव लोणीकर - Divya Marathi
पंकजा मुंडे आणि बबनराव लोणीकर
औरंगाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचा मराठवाड्यात बोजवारा उडाला. मराठवाड्यातल्या चारही मंत्र्यांच्या मतदारसंघांत या अभियानाचे तीनतेरा वाजले आहेत. चार नगरपालिकांमध्ये शौचालय बांधण्याचे ३० टक्केही उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही. 

यामध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या मतदारसंघांचा समावेश आहे. मराठवाड्यातील जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यात अभियान यशस्वी राबवता आले नाही. जालना ३१ टक्के,  बीड ३३ आणि लातूर जिल्ह्यात ५९ टक्के उद्दिष्ट गाठता आले. मार्चपर्यंत हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे लक्ष्य या मंत्र्यांना आव्हान ठरणार आहे.
 
48% उद्दिष्टपूर्ती बबनराव लोणीकर यांच्या परतूर मतदारसंघात...
लोणीकर यांच्या परतूर पालिकेत १९५० वैयक्तिक शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र केवळ ९४० शौचालये बांधली. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांचे ८ ओडी स्पॉट्स निवडले आहेत. मात्र यापैकी एकही ठिकाण निष्कासित झाले नाही. हीच स्थिती खोतकरांच्या जालना  पालिकेची आहे. इथेही ४२ ओडी  स्पॉट निवडले असताना एकही पूर्ण झालेला नाही. या योजनेत शौचालय बांधण्यासाठी केंद्राचे ०४,राज्य सरकार ०८ व पालिकेकडून ०५ हजार असे १७ हजारांचे अनुदान दिले जाते.

18% उद्दिष्टपूर्ती पंकजा मुंडे यांच्या परळी मतदारसंघात...
परळी मतदारसंघात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे असे दोघांचे नेतृत्व आहे. परळी नगरपालिकेला देण्यात अालेल्या ४७३० शाैचालयांच्या उद्दिष्टांपर्यंत अाता फक्त ८७८ शौचालये बांधण्यात आली आहेत.  हे प्रमाण केवळ १८.५६ टक्के इतके आहे. इथेही १७ हागणदारीचे ओडी स्पॉट निवडण्यात आले असून, केवळ ४ ठिकाणे निष्कासित झाली आहेत. तर ७ पैकी केवळ २ ओडी स्पॉट निष्कासित केले आहेत. 

जालनामध्ये १३२०२ वैयक्तिक शौचालयांचे उद्दिष्ट असून, केवळ ३२१५ चे बांधकाम पूर्ण झाले.

निलंगेकर यांचा मतदारसंघ असलेल्या निलंग्यामध्ये १८५१ उद्दिष्ट असून, ५७४ बांधकाम पूर्ण झाले.

दाेषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार
चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना डोक्यावर घेतले जाईल. मात्र काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर  कारवाई केली जाईल. मराठवाड्यातील जालना,बीड, लातूर हे जिल्हे उद्दिष्टपूर्तीत पिछाडीवर आहेत. येत्या मार्चपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. 
- डॉ पुरुषोत्तम भापकर,
 विभागीय आयुक्त, औरंगाबाद
बातम्या आणखी आहेत...