आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिंधी कॉलनी झाली कचरामुक्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - केवळ मनपाची यंत्रणा आणि व्यवस्थेला दोष देण्यापेक्षा कॉलनीतील महिला एकत्र आल्या. त्यांनी ठरवले आणि कॉलनी कचरामुक्त झाली. सिंधी कॉलनीत हा प्रयोग यशस्वी झाला. घराघरात कचर्‍याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण केले. सीआरटीच्या (सिव्हिक रिस्पॉन्स टीम) माध्यमातून तो व्यवस्थितपणे कचरावेचकांकडे तसेच मनपाच्या सफाई यंत्रणेकडे सोपवला जातो. त्यामुळे दुर्गंधी, रोगराई दूर झाली असून परिसर स्वच्छ आणि सुंदर झाला आहे.

सिंधी कॉलनीत अडीचशे घरे आहेत. सीआरटीच्या माध्यमातून कॉलनीतील रहिवाशांना सनवीर छाबडा, नताशा झरीन यांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार प्रत्येक घरी ओल्या कचर्‍यासाठी स्वतंत्र डस्टबिन दिल्यामुळे घरातच ओला आणि सुका कचरा वेगळा केला जात आहे. यात उरलेले अन्न, खाद्यपदार्थ हे ओल्या कचर्‍याच्या डस्टबिनमध्ये टाकले जातात, तर प्लास्टिक, कागद आणि कॅरीबॅग हे सुक्या कचर्‍याच्या डब्यात टाकले जाते. गेल्या दोन महिन्यांपासून हा उपक्रम सुरू आहे.

रोज जमा होतो 3 क्विंटल ओला कचरा
महापालिकेचे कर्मचारी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत कचरा गोळा करण्याचे काम करतात. त्यामध्ये कार्टरच्या माध्यमातून ओला, सुका आणि मिक्स कचरा दोन कर्मचारी प्रत्येकाच्या घरी जाऊन गोळा करतात. तसेच रस्ता झाडणार्‍या महिलांनादेखील कॉलनीच्या वतीने पोत्याच्या पिशव्या देण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये झाडतानाच कचरा गोळा केला जातो. त्यानंतर दुपारी एकनंतर ओला कचरा प्राण्यांना खाण्यासाठी गांधीनगरमधील लोक घेऊन जातात.

रोज साधारण 3 क्विंटल ओला कचरा, दीड क्विंटल मिक्स आणि सुका कचरा एक क्विंटल जमा होतो. या कामासाठी नगरसेवक संजय केणेकर यांचेदेखील सहकार्य लाभले आहे.
कचरावेचक महिलांना काम मिळाले.

या ठिकाणी दोन महिला सुका कचरा वेचण्याचे काम करतात. साधारण एक क्विंटल कचरा त्यांना मिळतो. यामध्ये प्लास्टिक, काच, कागद, पुठ्ठा, पाण्याची बॉटल, कॅरीबॅग, दुधाच्या पिशव्या यासारखा सुका कचरा त्या घेऊन जातात. सिंधी कॉलनीतल्या एकूण कचर्‍यापैकी 60 टक्के ओला कचरा खाद्य म्हणून प्राण्यांना दिला जातो. 20 टक्के कचरा कचरावेचक घेऊन जातात आणि उरलेला फक्त 20 टक्के कचरा नारेगावला जातो.
गुरुद्वारामध्ये बायोगॅस निर्मितीचा प्रस्ताव
या परिसरात असणार्‍या गुरुद्वारामध्ये लंगरसाठी महिन्याला 30 सिलिंडर लागतात. त्यामुळे कॉलनीच्या वतीने ओल्या कचर्‍यापासून बायोगॅस निर्मितीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. गुरुद्वारा समितीच्या वतीनेही त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असल्याची माहिती समितीचे सचिव रणजितसिंह गुलाटी यांनी दिली. समितीच्या वतीने ओला कचरा गोळा करण्यासाठी कार्टरदेखील देण्यात आले आहेत. सध्या याबाबत बायोगॅस निर्मितीसाठी किती खर्च येतो, याची चाचपणी करण्यात येत असल्याचे गुलाटी म्हणाले.

आम्ही हा प्रयोग राबवल्यापासून अनेक भागांतील लोक विचारणा करत आहेत. आमची कॉलनी आता स्वच्छ झाली आहे. आम्ही त्याचा रोज फॉलोअप घेतो. यामुळे आम्हा सगळ्यांनाच शिस्त लागली आहे. त्यामुळे कॉलनीत आता कचरा, घाण पाहायला मिळत नाही.
-सनवीर छाबडा, सदस्य सीआरटी, सिंधी कॉलनी

सकाळी आम्ही रोज आठ वाजता ओला आणि सुका कचरा वेगळा करून देतो. त्यामुळे कॉलनीत घाण दिसत नाही. त्यामुळे फिरताना चांगले वाटते. आता दुर्गंधी आमच्या कॉलनीत अजिबात नाही.
-नरेंद्रकौर मुछल, नागरिक, सिंधी कॉलनी

आम्ही दोघे जणी मिळून या ठिकाणी सुका कचरा गोळा करण्याचे काम करतोय. साधारण एक क्विंटल कचरा रोज मिळतो. तसेच कचरा वेगळा केला असल्यामुळे गोळा करण्यास त्रासदेखील होत नाही, हातदेखील घाण होत नाहीत.
-आशा डोके, कचरावेचक

या प्रयोगामुळे आमचे 90 टक्के काम कमी झाले. लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. त्यामुळे कॉलनी स्वच्छ झाली आहे. शहरात अशा पद्धतीने स्वच्छतेचा प्रयोग राबवण्याची गरज आहे.
अशोक कांबळे, सुपरवायजर, स्वच्छता विभाग, मनपा.