आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगार वसाहतीत कचरामुक्ती अभियान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - रस्त्यालगतची घाण, त्यावर घोंगावणार्‍या माशा, कचर्‍याच्या ढिगार्‍यांवर घुटमळणारी कुत्री आणि डुकरे, घाणीमुळे वाढलेले डासांचे प्रमाण आणि पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीच्या आजारांची भीती अशा विविध त्रासांना नागरिकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे बजाजनगर येथील सिद्धिविनायक महिला मंडळाच्या महिलांनी पुढाकार घेऊन कचरामुक्ती अभियानास बुधवारपासून प्रारंभ केला. एवढ्यावरच न थांबता या महिलांनी ठिकठिकाणी भित्तिपत्रके लावून जनजागृतीचे कामही हाती घेतले आहे. शिवाय, हे अभियान कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी केला आहे.

वडगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या बजाजनगरात पिण्याचे पाणी, रस्ते, स्वच्छता, पथदिवे, सांडपाण्याच्या नियोजनासाठीच्या गटारांची बांधकामे आदी नागरी सुविधा पुरवण्याचे काम एमआयडीसी प्रशासन करते. कामगार वसाहतीतील कचरा उचलण्यासाठी एमआयडीसीने ठेका दिलेला आहे. मात्र, तरीही अनेक वसाहतीतील विविध भागात तसेच रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर कचर्‍याचे ढीग साचलेले आहेत. संबंधित ठेकेदारासह एमआयडीसी प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार सुरू होता. दुर्गंधीयुक्त कचर्‍याच्या ढिगार्‍यांमुळे कामगार वसाहतीत डासांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया या साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत.
महिलांचा पुढाकार
ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य असल्याने बजाजनगरातील घराघरांमध्ये विविध आजारांचे रुग्ण आहेत. यापुढेही अनेक जण आजारी पडण्याची शक्यता बळावली आहे. याची दखल घेऊन सिद्धिविनायक महिला मंडळाच्या महिला जयश्री घाडगे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आल्या. त्यात तीर्था सुपेकर, कल्पना सूर्यवंशी, उषा दाते, सुनीता गायकवाड, भारती शेलगावकर, सविता शिंदे, कमल सागरे, साधना साखळकर, चेतना राणी आदींचा समावेश होता. त्यांनी रस्त्यावर कचरा टाकणार्‍यांना मनाई करून जनजागृती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी कामाचे नियोजनही केले.
पाचला कामास प्रारंभ
निवेदनाची दखल न घेतल्याने महिलांनी या कामी स्वत:च पुढाकार घेऊन सोमवारी भल्या पहाटे पाचला सुवर्णपुष्प वसाहतीपासून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ केला. त्यानंतर संजीवनी कॉलनी, संकल्प सोसायटी ते तनवाणी विद्यालय परिसरात ही मोहीम राबवली. रहिवाशांनी रस्त्याच्या कडेला कचरा टाकू नये, यासाठी महिला कचरा टाकण्याच्या ठिकाणांजवळ थांबल्या. त्यांनी कचरा टाकण्यासाठी आलेल्या महिला, पुरुषांना समजावून सांगितले. जयश्री घाडगे यांनी एमआयडीसीचे सहायक अभियंता डी. एस. दिपके यांना बोलावून परिस्थितीची कल्पना दिली. त्यांना सांगून कचरा उचलणार्‍या ठेकेदारास वाहनासह बोलावून तेथील कचरा उचलण्यास भाग पाडले.

जनजागृतीसाठी भित्तिपत्रके
हा उपक्रम दररोज सकाळी साडेपाच ते नऊच्या दरम्यान राबवण्याचा निर्णय घेतला. सकाळच्या सत्रात रस्त्यालगत कचरा टाकणार्‍यांना मनाई करून त्यांना घंटागाडीतच कचरा टाकण्यासाठी प्रोत्साहित करायचे. अकरानंतर जेथे कचरा टाकला जातो, तेथे भित्तिपत्रके लावायची. त्यानंतर घरोघरी कचरा रस्त्यावर न टाकण्याबाबत समज द्यायची. शिवाय असा कचरा टाकलाच, तर पाचशे रुपयांचा दंड व त्याच जागेवर अपमानास सामोरे जायचे, असा दंडकही रहिवाशांना समजावून सांगितला जात आहे.
कामगार वसाहत करणार कचरामुक्त
सिद्धिविनायक महिला मंडळाच्या जयश्री घाडगे व त्यांच्या सहकारी महिलांनी हा उपक्रम संपूर्ण बजाजनगरात राबवणार असल्याचे सांगितले. जोपर्यंत संपूर्ण कचरा स्वच्छ होत नाही, रहिवाशांना स्वच्छतेचे महत्त्व कळत नाही तोपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
एमआयडीसी प्रशासनाला निवेदन
प्रथम महिलांनी एमआयडीसी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले. त्यात घंटागाडी दररोज द्यावी, उघड्या गटारी बंदिस्त कराव्यात, जुन्या जलवाहिन्या बदलाव्यात, मोठ्या वाहनांची योग्य त्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था करावी, अतिक्रमणे हटवावीत, त्रिमूर्ती चौकालगतच्या सर्व खदानीत घाण पाण्यामुळे डास होत असल्याने त्या बुजवण्यात याव्यात, या मागण्यांचा त्यात समावेश होता. मात्र, या निवेदनाची दखल एमआयडीसी प्रशासनाने घेतली नाही.