आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामानातील बदलाने मान्सूनला अडथळा , पावसाच्या खंडामुळे महाराष्ट्रावर दुष्काळाचे अरिष्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सकाळपासून सूर्य तळपत आहे. तापमान ३३ अंश सेल्सियसवर असल्याने कार्यालये घरांमध्ये कुलर, एसी सुरूच ठेवावा लागत आहे. आकाशात काळेकुट्ट ढग जमा होऊन आता पाऊस येणार, अशी आशा सर्वांना लागते; पण दाटलेले ढग विरळ होऊन पाऊस हुलकावणी देतो. गत चार आठवड्यांपासून हीच स्थिती आहे. अजूनही अल निनोचा प्रभाव कायम असल्यामुळे पावसाच्या पुनरागमनाबाबत निश्चित काहीच सांगता येत नसल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पावसाच्या या मोठ्या खंडामुळे महाराष्ट्रावर जवळपास दुष्काळाचे अरिष्ट कोसळणार, हे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रात १७ जुलैपर्यंत सरासरी ३५० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडणे अपेक्षित होते. त्या तुलनेत २५३.६ मिमी पाऊस पडला. यातही पावसाचे दिवस अत्यल्प आहेत. पावसाचे वितरण सर्वत्र विषम आहे. मराठवाड्यातील पंधरांपेक्षा अधिक तालुक्यांत अद्याप पेरणीयोग्य पाऊस नाही. परिणामी १४३.५६ लाख हेक्टर सरासरी खरीप क्षेत्रापैकी केवळ ४० टक्के क्षेत्रावरच पेरणी होऊ शकली. उगवलेली पिके पाण्यावाचून करपून गेली. या नैसर्गिक संकटात दीड हजार कोटींवर नुकसान झाले असून दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. खरीप पेरणीस जितका उशीर होईल, तितके उत्पादन घटेल, असा कृषी विभागाचा संशोधनात्मक निष्कर्ष आहे. त्यामुळे यंदा सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे.

प्रत्यक्षात पडलेला पाऊस
औरंगाबाद २३५.७ १७७.२८
जालना २४४.६३ १३३.५६
परभणी २६५.५२ ९०.५
हिंगोली ३३६.२८ १६६.९२
नांदेड ३४५.२२ १६७.२
बीड २२७.४७ ८२.३६
लातूर २६८.२४ ११२.२२
उस्मानाबाद २३९.९१ ९२.४
जिल्ह्यांत २७०.३७ १२७.७६

अलनिनोचा प्रभाव कायम आहे. पावसासाठी आवश्यक वातावरण तयार होत नाही. डॉ.रामचंद्र साबळे, राज्यहवामान सल्लागार.

दुष्काळाची १३ वर्षे
२०१०मध्ये पावसाचा मोठा खंड पडला आहे. २०१२ २०१४ मध्ये भीषण दुष्काळ होता. २०१३ मध्ये गारपीट झाली. २००४, २००९ आणि २०१२ मध्ये जूनमध्ये पाऊस वेळेवर आला. गत तीस वर्षांत १३ वेळा दुष्काळ पडल्याची नोंद वसंतराव नाईक कृषी मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्राने घेतली.

का पडला पावसाचा खंड ?
वाऱ्याचावेग अधिक राहिला. कमाल तापमान ३३ अंश सेल्सियस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सियसपर्यंत असल्याने जमिनीतील ओलावा, प्रकल्पातील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. त्यात पुन्हा पॅसिफिक महासागरात च्यान हॉम नावाचे वादळ सक्रिय झाले आहे. त्याची तीव्रता आणखी वाढल्यास पाऊस लांबण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ प्रा. प्रल्हाद जायभाये यांनी वर्तवली आहे.

यावर द्यावा भर
तुषार,ठिबक, सूक्ष्म सिंचनाचा वापर करावा. कृषी विभागाच्या मदतीने सवलतीच्या दरात बाष्पीभवन प्रतिबंधक वापरावेत. ऊस, फळबागांना पाणी देण्याचे प्रमाण कमी करावे. छाटणी करावी. आच्छादन वापरावे. कृषी विद्यापीठ, कृषी विभागाच्या सल्ल्याने आपत्कालीन पीक नियोजन, पेरणी आराखडा तयार करावा. पीक विमा योजनेत सहभागी व्हावे.
बातम्या आणखी आहेत...