आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संघर्षातून समाज कधीच घडत नसताे: फडणवीस, इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टीव्हलमध्ये CMची हजेरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘दलित- दलितेतर संघर्ष वाढतोय. मात्र, दुसऱ्या समाजाच्या विरोधात मागणी करणे चुकीचे आहे. संघर्षातून समाज घडत नसतो. केवळ मीच जगेल ही भावना चुकीची आहे. सर्व मिळून जगू ही भावना असावी’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले. ‘समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या पूर्ण करण्याची गरजही आहे. घटनेची पायमल्ली न करता जे काही प्रश्न असतील ते सोडवले जातील’,असेही त्यांनी मराठा माेर्चाचा उल्लेख न करता स्पष्ट केले.

औरंगाबादेत शुक्रवारी आयोजित इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टीव्हल-२०१६च्या समारोप सत्रात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय राज्यमंत्री राजकुमार बडोले व अर्जुन खोतकर, मुख्य संयोजक भिक्खू एम. धम्मज्योती थेरो, फेस्टिव्हलचे अध्यक्ष आमदार संजय शिरसाट, श्रीलंकेतील एका राज्याचे माजी मुख्यमंत्री शशिंद्र राजपक्षे यांच्यासह दहा राज्यांतून आलेले पाहुणे उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ‘अाजही देशाला गौतम बुद्धांच्या विचारांची गरज अाहे. छोट्या घटनेवरून जातीय पडसाद उमटतात हे अपेक्षित नाही. दुसऱ्या समाजाच्या विरोधात मागण्या करत निघणाऱ्या मोर्चामुळे सामाजिक सलोखा बिघडत असल्याचा संदेश जाईल. नाशिक येथे निर्माण झालेला तणाव चुकीचा आहे. कोणताही समाज संघर्षातून नव्हे समन्वयातून घडत असतो, याचेही भान ठेवले पाहिजे.’

बुद्धिस्ट सर्किटसाठी १०० कोटी
सन २०१७ हे वर्ष ‘व्हिजिट महाराष्ट्र’ वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. त्यात बुद्धिस्ट सर्किट तयार केले जाणार असून त्यातून बौद्ध लेण्या तसेच अन्य बुद्धिस्ट स्थळांचा विकास केला जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारने १०० कोटी रुपये दिले असून राज्य सरकार उर्वरित निधी देईल. बौद्ध देशांतून लोकांनी येथे यावे, अभ्यास करावा यासाठी हे सर्किट असेल.
त्याचबरोबर येथे पालीचे विद्यापीठ सुरू करायचे की जपान विद्यापीठाच्या सहकार्याने पाली केंद्र ठेवायचे
याचा निर्णय लवकरच घेतला जाईल’, असेही फडणवीस म्हणाले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.

अत्याचार न केल्यास कसा लागेल कायदा : अाठवले
मराठा अारक्षणास अामचा पाठिंबा अाहे. त्यासाठी आरक्षणाची मर्यादा ७५ टक्क्यांपर्यंत गेली तरी हरकत नाही, असे आठवले यांनी स्पष्ट केले. अॅट्रासिटी कायदा रद्द करण्याला विरोध दर्शवत अत्याचारच केला नाही तर या कायद्याचा वापर कसा होईल, असा सवालही त्यांनी केला. दलितांनीही या कायद्याचा दुरुपयोग करू नये. खरेच अत्याचार झाला तरच त्याचा वापर करावा. मराठ्यांच्या दोन गटातील भांडणात पुढे होऊन तक्रारी देऊ नयेत, असे अावाहनही त्यांनी दलितांना केले.
बातम्या आणखी आहेत...