आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मी मराठवाड्याचाही वकील, मागण्यांचा सकारात्मक विचार : मुख्यमंत्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - चार अाॅक्टाेबर राेजी औरंगाबादेत होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुंबईत मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करीत विविध मागण्यांबाबत ऊहापोह केला. ‘मी विदर्भासोबत मराठवाड्याचाही वकील म्हणून वागलो आहे. आता मराठवाडा सरकारच्या अजेंड्यावर आहे,’ असे आश्वासन देत मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील जनतेच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करू असे सांगितले.

सात वर्षांपासून औरंगाबादेत मंत्रिमंडळाची बैठक झाली नव्हती. त्यामुळे गेल्या महिन्यात १७ तारखेला मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या सोहळ्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांना मराठवाडा जनता विकास परिषदेने विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी वेळ मागितला होता. नंतरच्या काळात चार आॅक्टोबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा निर्णय झाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने जनता विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रित केले होते.

रविवारी (दि. २ आॅक्टोबर) सायंकाळी ८ वाजता मुंबईत ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसोबत ही बैठक झाली. या बैठकीत जनता विकास परिषदेच्या वतीने मराठवाड्याच्या विविध मागण्या मांडल्या. त्या ऐकून घेत मुख्यमंत्र्यांनी परिषदेच्या जास्तीत जास्त मागण्यांचा सकारात्मक विचार करू असे सांगितले. ‘तुमच्या बहुतांश मागण्यात प्राधान्याने घेण्यासारख्या आहेत. आतापर्यंत मी विदर्भासोबतच मराठवाड्याचाही वकील म्हणूनच वागलो आहे. मराठवाडा सरकारच्या अजेंड्यावर प्राधान्याने अाहे,’ असे ते म्हणाले.

या चर्चेच्या वेळी जनता विकास परिषदेचे अध्यक्ष अॅड. प्रदीप देशमुख, डाॅ. शरद अदवंत, शंकरराव नागरे, भरत राठोड, गोपीनाथ वाघ, शिवाजी नरहरे, प्रा. के. के. पाटील, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय तसेच विविध विभागांचे सचिव हजर होते.

या आहेत प्रमुख मागण्या
- दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी सहा हजार कोटी रुपयांची तरतूद करा. तसेच प्रत्येक शेतकऱ्याला १ लाख रुपयांचे क्रेडिट कार्ड द्या.
- औरंगाबादच्या घाटी व शासकीय दंत वैद्यकीय रुग्णालयाला सुपर स्पेशालिटीचा दर्जा द्या.
- परभणी व उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करा.
- मराठवाड्यात पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी विशेष प्राधिकरण स्थापन करावे व औरंगाबादला पर्यटनाची राजधानी म्हणून घोषित करावे.
- औरंगाबादला तत्काळ जल आयुक्तालय करा.
- मराठवाड्यातील सर्व उद्याेगांना सवलती द्याव्या.
- केंद्रीय कृषी विद्यापीठ, नॅशनल स्कूल आॅफ आर्किटेक्चर या सारख्या तत्सम राष्ट्रीय संस्था मराठवाड्यात सुरू कराव्यात.
बातम्या आणखी आहेत...