आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CM Devendra Fadnavis Visit Saraswati Bhuvan School

बेरोजगारांच्या फौजेवर देश उभा राहणार नाही, कौशल्य शिक्षण हवे - मुख्यमंत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नुसत्या डिग्र्या देऊन बेकारांची फौज तयार करून देश उभा करता येणार नाही. त्यासाठी ज्ञान आणि कौशल्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे लागणार आहे, असे मत मांडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौशल्याधारित शिक्षण देऊन महाराष्ट्राला देशाला प्रगतिपथावर नेण्याचे आवाहन केले. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या शताब्दी पर्व विशेष सोहळ्यात ते बोलत होते.

स. भु. च्या भव्य पटांगणावर हा शानदार सोहळा पार पडला. या वेळी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिनकर बोरीकर, उपाध्यक्ष बॅ. जवाहरलाल गांधी, सरचिटणीस अ‍ॅड. दिनेश वकील, कोशाध्यक्ष रामकृष्ण जोशी यांची उपस्थिती होती. स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षण प्रसाराचे काम सुरू करणार्‍या स. भु. संस्थेचा गौरव करीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, २६ विद्यार्थ्यांना घेऊन सुरू झालेल्या शाळेचा आज वटवृक्ष झाला आहे. संस्थेची यशोगाथा सांगणारे शेकडो विद्यार्थी येथे तयार झाले. ज्या काळात शिक्षणाची मोठी आवश्यकता होती त्या काळातच हे विद्यादानाचे कार्य सुरू झाले. भारतात शिक्षण व्यवस्था मजबूत होती, पण ब्रिटिशांनी ती उद्ध्वस्त केली. कारकून तयार करणारी शिक्षण व्यवस्था त्यांनी या देशाला दिली. पण राजाराम मोहन ऱॉय, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी नवी शिक्षण व्यवस्था रुजवली, उभी केली. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षण रुजवणाऱ्या स. भु. संस्थेचे महत्त्व अधिक आहे.

शिक्षणातील दरी दूर करा : विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले की, आज शहरी भागात शिक्षणाच्या अनेक संधी आहेत; पण ग्रामीण भागात त्या नाहीत. ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याने शिक्षणातील अंतर वाढत चालले आहे. ही दरी दूर करून जिल्हा परिषदेच्या शाळांतूनही दर्जेदार शिक्षण मिळायला हवे. स. भु.चा गौरव करताना बागडे यांनी १९५५ मध्ये पिंप्री राजा गावात स. भु.ची शाळा निघाली नसती तर मी चौथीच्या पुढे शिकलो नसतो. या संस्थेमुळे ग्रामीण भागात शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली हे मोठे काम आहे.

मुंडे यांची नाळ जोडलेली : पंकजापालवे म्हणाल्या की, वय वाढल्यावर माणसे म्हातारी होत जातात; पण एखाद्या संस्थेचे वय वाढले तर ती तरुण बनत जाते. मजबूत होते. या संस्थेची मी माजी विद्यार्थिनी आहे. थोड्या काळासाठी का होईना, पण मी येथे शिकले. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांची या संस्थेशी नाळ जोडलेली आहे. त्यांनी याच संस्थेच्या पायऱ्यांवर बसून मराठवाड्याच्या विकासाबाबत मंथन केले, तसे कार्यही केले.

या वेळी प्रा. बोरीकर यांनी संस्थेची माहिती देताना आगामी विकासासाठी सरकारने ५० कोटी रुपयांची मदत करावी, अशी विनंती प्रास्ताविकात केली. अ‍ॅड. वकील यांनी आभार मानले, तर अंजली मुलाटे-सहस्रबुद्धे यांनी सूत्रसंचालन केले.

आता अ‍ॅडमिशन वाढणार : हरिभाऊबागडे पंकजा पालवे स. भु.चे माजी विद्यार्थी असल्याचा उल्लेख करीत मुख्यमंत्री म्हणाले की, आता मला लक्षात आले की, मंत्री व्हायचे असेल तर या संस्थेत शिकावे लागते. बागडे नाना इथेच शिकले, मंत्री झाले. आता अध्यक्ष झाले. पंकजा मुंडे काही काळच होत्या, पण त्याही मंत्री झाल्या. आता इथून पुढे स. भु.मध्ये अ‍ॅडमिशन फुल्ल होणार. राजकीय नेत्यांची पोरं आता मंत्री होण्यासाठी याच शाळेत अ‍ॅडमिशन मागतील, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली.

स.भु. ला पाच कोटींचा निधी : संस्थेचे अध्यक्ष प्रा. बोरीकर यांनी संस्थेच्या आगामी प्रकल्पांसाठी विकासासाठी निधीची आवश्यकता असून सरकारने त्यासाठी ५० कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी केली. त्याचा उल्लेख करीत मुख्यमंत्री म्हणाले की, मागच्या काँग्रेसच्या सरकारने शताब्दी पूर्ण करणाऱ्या संस्थांना विशेष निधी देण्याची घोषणा केली होती. मी माहिती घेतली असता एकाही संस्थेला निधी देण्यात आलेला नसल्याचे समजले. स. भु.साठी ५० कोटी रुपये जरी मागितले असले तरी राज्याची एवढी आर्थिक स्थिती नाही; पण १३ हजार कोटींची तूट असताना शिक्षणावर सर्वाधिक खर्च महाराष्ट्र करते. त्यामुळे स. भु. ला पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा त्यांनी केली.

कौशल्याचे ज्ञान हवे
२१व्या शतकानुसार समाजाच्या गरजा ध्यानात घेऊन शिक्षण व्यवस्थेत बदल करायला हवेत, हे सांगताना फडणवीस म्हणाले की, शिक्षण हा संस्कार आहे. देशाच्या विकासात सहभागी होणारा तरुण बनवणे ही आजची गरज आहे. आज पुस्तकी शिक्षणापेक्षा ज्ञानाधारित कौशल्य विकसित करणारे शिक्षण देणारी व्यवस्था गरजेची आहे. आज प्रत्येक जण डिग्रीसाठी शिकतो; पण नुसत्या डिग्रीने फायदा नाही. मिळालेल्या ज्ञानाची उपयोगिता काय याचा शाळा, महाविद्यालये विद्यापीठांनी विचार करायला हवा. त्यासाठी कौशल्य विकसित करणारे ज्ञान दिले पाहिजे.

(फोटो : स. भु. शताब्दी पर्व विशेष सोहळ्यात संकेत जोशी या विद्यार्थ्याने फडणवीस यांना त्यांचा बालपणीचा वाजपेयींसोबतचा फोटो भेट दिला. छाया : रवी खंडाळकर)