आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामभाऊंना हरिभाऊंनी दिले राजकारणात येण्याचे आमंत्रण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सत्कारप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी भोगलेंना जॅकेट दिले. ते त्यांनी स्टेजवरच परिधान केले. सोबत हरिभाऊ बागडे. छाया : अरुण तळेकर - Divya Marathi
सत्कारप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी भोगलेंना जॅकेट दिले. ते त्यांनी स्टेजवरच परिधान केले. सोबत हरिभाऊ बागडे. छाया : अरुण तळेकर
औरंगाबाद - गेल्या साडेतीन दशकांपासून निर्लेपच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात ठसा उमटवणारे राम भोगले राजकारणाच्या उंबरठ्यावर आहेत. भोगले यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी राम भोगले यांना राजकारणात येण्याचे आमंत्रण दिले. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही भोगले यांना जॅकेट घातले आहे, त्या अर्थी संदेश मिळाला आहे, असे सांगत त्यांच्या राजकारणाच्या प्रवेशाचे संकेत दिले.

राम भोगले यांचा उद्योगाव्यतिरिक्त राजकारण, समाजकारण तसेच सर्व क्षेत्रांतील व्यक्तींसोबत नेहमीच वावर राहिला आहे. त्यामुळे ते राजकारणात येणार याबाबत चर्चा नेहमीच घडत राहिल्या. मात्र सत्कारानिमित्त उपस्थित राजकीय मंडळींच्या उपस्थितीने ते राजकारण प्रवेशाचा उंबरठ्यावर असल्याचे संकेत मिळाले.

राजकारणात गुणवान माणसाची गरज
बागडेयांनी भोगले यांना देवगिरी बँकेत कसे आणले याची आठवण सांगितली. देवगिरी बँकेत उत्तम प्रशासक म्हणून भोगले यांनी काम केले. त्यांच्याच काळात देवगिरी बँक मराठवाड्यात सर्वत्र रुजली. भोगले यांनी राजकारणात येण्याचे कायम टाळले. मात्र राज्यकर्त्यांना ते उत्तम मार्गदर्शन करतात. राजकारणात चांगल्या माणसाची गरज आहे. त्यामुळे भोगले राजकारणात आले तर त्यांना चांगली जबाबदारी मिळेल, असे सांगत बागडे यांनी भोगलेंना राजकारण प्रवेशाचे निमंत्रण दिले.

अनुभवाचा फायदा घेऊ
राजकारणी ज्याप्रमाणे जॅकेट घालतात तसेच जॅकेट मुख्यमंत्र्यांनी भोगलेंना दिले. त्यामुळे ते राजकारणात जाणार का, अशी कुजबुज उपस्थितांमध्ये सुरू झाली. मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवातच भोगलेंनी जॅकेट घातले आहे, असे म्हणत थोडासा पॉझ घेतला... त्या अर्थी संदेश मिळालाय. त्यामुळे सगळ्याच गोष्टी मनासारख्या घडत नसतात, असे सांगत त्यांच्या राजकीय प्रवेशाचे संकेत दिले. भोगले यांनी सामाजिक, औद्योगिक नेतृत्व केले आहे. त्यामुळे तुमच्या अनुभवाचा फायदा करून घेणार, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी भोगले यांच्या राजकीय प्रवेशाचे संकेत दिले. मानसिंग पवार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. उल्हास गवळी यांनी सूत्रसंचालन केले. मुनीश शर्मा यांनी आभार मानले.

जबाबदारी स्वीकारण्यास तयार
भोगले यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा नसली तरी जबाबदारी दिल्यास ती स्वीकारू, असे सांगून राजकारणात प्रवेशाचे संकेत दिले. विधान परिषदेच्या वेळी शिरीष बोराळकरांना तिकीट मिळावे यासाठी मी गोपीनाथ मुंडे यांच्याकडे गेलो असता त्यांनी माझ्याच नावाचा अट्टहास धरला. तसेच तुम्ही उभे राहत असाल तर लगेच घोषणा करतो असेदेखील सांगितले. रावसाहेब दानवे, खासदार चंद्रकांत खैरे यांनीदेखील आग्रह धरल्याचे त्यांनी सांगितले. घुसखोरी करण्याचा पिंड नसल्यामुळे मी आत्तापर्यंत राजकारणात आलो नाही.आगामी काळात एखादी जबाबदारी िदल्यास विकासासाठी ती पार पाडू, असे भोगले म्हणाले.