औरंगाबाद - राज्याचा गाडा हाकताना उसंत मिळत नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनोरंजनात्मक कार्यक्रमांना फारसे उपस्थित राहता येत नाही. मात्र, मंगळवारी शहरात झालेल्या एका देखण्या सोहळ्यात ते तब्बल दीड तास रमले. पोलिसांच्या २९ व्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते संध्याकाळी पार पडले. उद्घाटनानंतर मुख्यमंत्री वीस मिनिटे थांबतील, असे सर्वांनाच वाटले. पण या उद्घाटनपर सोहळ्यात सादर फिल्मी गिते, महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी सादर केलेले फक्कड लावणी नृत्य, सुपरस्टार मकरंद अनासपुरेची उपस्थिती आणि पोलिस बॉईजनी सादर केलेले झकास कार्यक्रम अशा देखण्या सोहळ्याचा त्यांनी दीड तास आनंद लुटला.
पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या गोकूळ मैदानावर या शानदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, पोलिस महानिरीक्षक सतीशचंद्र माथूर, मुंबईचे पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर, पोलिस आयुक्त अमितेशकुमार, विशेष पोलिस महानिरीक्षक अजित पाटील, अर्चना त्यागी, डॉ.प्रज्ञा सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती. बॉलिवूड गायिका निती मोहन, सकृती कक्कड, आकृती कक्कड यांनी सादर केलेल्या हिंदी सिनेमातील गीतांना रसिक खेळाडूंनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. स्थानिक महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. पोलिस पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कला सादर केली. अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी दत्ता मांजरसुंबेकर ही व्यक्तीरेखा साकारात खुमासदार शैलीत सूत्रसंचलन केले. यावेळी सुमारे २० हजार रसिक, श्रोते उपस्थितीत होते, अशी माहिती अमितेशकुमार यांनी दिली. सुमारे तीन हजार पोलिस खेळाडूही मनोरंजनाच्या पर्वणीत हरवून गेले.
चाळीस वर्षात बांधली नाहीत तेवढी घरे चार वर्षांत बांधू : सध्या पोलिसांना जुन्या घरांमध्ये राहावे लागत आहे. त्यांना सर्व सुविधायुक्त घरे मिळावीत यासाठी सरकार प्रयत्नशील असून ४० वर्षांत जेवढी घरे बांधली गेली नाहीत तेवढी पुढील चार वर्षात बांधू, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. आठ हजार घरे बांधली जातील, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र पोलिस देशभरात टेक्नॉलॉजीत सर्वात पुढे असल्याचा उल्लेख करून शहरातील पोलिसांचा हा इव्हेंट ग्रँड इव्हेंट असल्याचे त्यांनी सांगितले.
एकाहून एक सरस सादरीकरण
राष्ट्रीय ख्यातीच्या राज्य राखीव पोलिस दलाच्या पाइप बँडने मुख्यमंत्र्यांना सलामी दिली. तर इंडिया गॉट टॅलेंट या स्पर्धेत गाजलेल्या व्ही ग्रुपचे सादरीकरण, स्पेन भारतीय कलावंताचे शास्त्रीय नृत्याचे फ्युजन रसिकांसाठी खास पर्वणी ठरले. महाराष्ट्रातील विविध परिक्षेत्रातील बडे पोलिस अधिकारी यावेळी उपस्थित होते. यात संजय कुमार, विश्वास नांगरे पाटील, के.एन बिश्नोई, नवीनचंद्र रेड्डी, ज्योतीप्रिया सिंह यांचा समावेश होता. नीता पानसरे यांनी सूत्रसंचलन केले.