औरंगाबाद - शहरातील खासगी शिकवणी वर्ग (कोचिंग क्लासेस) भरताना आणि सुटताना होणारी वाहतूक कोंडी आणि विद्यार्थिनींची छेडखानी या प्रश्नावर शुक्रवारी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी कोचिंग क्लासेसच्या संचालकांचा वर्ग घेतला. क्लासेस चालकांनी विद्यार्थ्यांसाठी पार्किंगची व्यवस्था करावी, कोचिंग क्लासेसबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असा सल्ला त्यांनी दिला. पोलिस आयुक्तालयाच्या सभागृहात ही बैठक झाली.
पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्यासह शहर वाहतूक शाखेचे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कोचिंग क्लासेसच्या संचालकांना विविध सूचना करण्यात आल्या. शहरातील मुख्य रस्त्यांवर हातगाड्यांमुळे होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीवरही बैठकीत चर्चा करण्यात आली. शहरातील रस्त्यांवर करण्यात आलेली अतिक्रमणे हटवण्यास पोलिसांनी मनपाची मदतही केली. तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर बंदी घातली. तरीही शहरातील मोठ-मोठ्या हॉटेल्स आणि मंगल कार्यालयांमध्ये होणाऱ्या लग्न समारंभामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होत असल्याबद्दल पोलिस आयुक्तांनी चिंता व्यक्त केली. याबरोबरच शहरात मुख्य रस्त्यावर असलेल्या कोचिंग क्लासेसमुळेही वाहतुकीची कोंडी होत असल्याने ती सोडवण्यासाठीच या बैठकीचे आयोजन केल्याचे आयुक्तांनी सांगितले.
स्वत:ची पार्किंग उभारा
सर्वकोचिंग क्लासेस चालकांना आयुक्तांनी ताबडतोब आपल्या जागेत स्वत:ची पार्किंगची व्यवस्था करा. तसेच इमारतीबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सूचना केली. कोचिंग क्लासेसमध्ये येणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोचिंग क्लासेस चालकांनी काळजी घ्यावी, जोपर्यंत विद्यार्थिनींचे नातेवाईक घेण्यासाठी येत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोचिंग क्लासेस चालकांनी घ्यावी, अशी सूचना करून यापुढे कोचिंग क्लासेस वर्ग सुरू होण्यापूर्वी आणि सुटल्यानंतर वाहतुकीची कोंडी झाल्यास कडक कारवाई करू, असा इशाराही पोलिस आयुक्तांनी दिला.