आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोळसा आणि गॅसच्या तुटीमुळे भारनियमन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कोळसा व गॅस पुरवठ्यातील तुटीमुळे महावितरणला दररोज सुमारे 2 हजार मेगावॅट वीज कमी मिळत आहे. महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पातून किमान साडेपाच हजार मेगावॅट वीज अपेक्षित असताना तेथून केवळ 4 हजार ते 4500 मेगा वॅट वीज मिळते. या शिवाय इंडिया बुल्सकडूनही 270 मे. वॅ. वीज कमी मिळत असल्याने राज्यात भारनियमन केले जात आहे.
महानिर्मितीला दररोज किमान 32 कोळशाचे रेक्स मिळणे गरजेचे असताना प्रत्यक्षात 15 ते 16 रेक्स मिळतात. खापरखेडा, पारस, भुसावळ या केंद्रात एक ते अर्ध्या दिवसाचा कोळसा शिल्लक आहे. चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रात अडीच दिवसांचा कोळसा शिल्लक आहे. महानिर्मितीच्या सर्वच विद्युत केंद्रातील कोळशाची स्थिती बिकट असल्याने वीज निर्मितीवर परिणाम झालेला आहे. इंडिया बुल्सकडून कोळशा अभावी 270 मेगा वॅट वीज मिळणे थांबले आहे. गॅसच्या उपलब्धतेच्याही अडचणी आहेत. गॅसअभावी 1 हजार 950 मेगावॅटचा रत्नागिरी गॅस प्रकल्प बंदच आहे. उरण गॅस केंद्रात 150 मेगा वॅटवीज निर्मिती कमी झालेली आहे. अदानी प्रकल्पातून सुमारे 2 हजार 500 मे. वॅ. वीज अपेक्षित असताना गेल्या काही दिवसांत तेथून वेगवेगळ्या कारणांमुळे 1500ते 1700 मेगा वॅट वीज कमी मिळाली आहे.
या सर्व कारणांमुळे विजेची उपलब्धता कमी व मागणी जास्त असल्याने ज्या ठिकाणी गळती, चोरी व वीजबिलाच्या थकबाकीचे प्रमाण जास्त अशा सर्व ठिकाणी भारनियमन केले जात आहे. कोळसा व गॅसची उपलब्धता होईतोपर्यंत सुरू राहणार असल्याचे महावितरणने म्हटले आहे.

ऊर्जास्रोताचा वापर वाढवा
पावसाने मोठा खंड दिला आहे. त्यामुळे कृषी पंप सुरू झाले आहेत. कंपन्या सुरू आहेत. लोकसंख्येत वाढ झाली आहे. परिणामी विजेची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अपारंपरिक ऊर्जा स्रोताला चालना देणे आवश्यक आहे, असे वीज नियामक आयोगाचे सदस्य हेमंत कापडिया, जिल्हा विद्युतीकरण समितीचे सदस्य एन. बी. कुलकर्णी यांनी सांगितले.