आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूर तालुक्यात पारा 7.8 अंशावर, थंडीने कोंबड्या दगावल्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खंडाळा- संक्रांतीनंतर उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात होते; परंतु वैजापूर तालुक्यात शुक्रवारपासून गार वारे वाहू लागल्याने पारा 7.8 अंशावर आला. गेल्या दहा वर्षांतील ही नीचांकी नोंद आहे. थंडीमुळे तालुक्यातील जनजीवन पुन्हा विस्कळीत झाल्याचे पाहावयास मिळाले. थंडीचा सर्वाधिक फटका पोल्ट्री व्यवसायाला बसला असून अनेक कोंबड्या गतप्राण झाल्या आहेत.

पाच जानेवारी रोजी तालुक्याचे तापमान 8.1 अंशावर आले होते. त्यानंतर थंडी कमी झाली. संक्रांतीनंतर तर उन्हाळ्याची चाहूल लागते; परंतु शुक्रवारी रात्रीपासून सर्वत्र गार वारे वाहू लागल्याने तापमानात कमालीची घसरण झाली. शुक्रवारी सर्वत्र पुन्हा शेकोट्या पेटल्याचे चित्र दिसले. बंगालच्या उपसागरावर हवेचा दाब कमी झाल्याने थंड पश्चिम वारे पठारी प्रदेशाकडे येत असल्याने सध्याची थंडी वाढली आहे. पुढील चार पाच दिवस थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

थंडीचा कडाका रविवारीही कायम होता. त्यामुळे सर्वत्र शेकोट्या पेटल्याचे चित्र होते. दरम्यान थंडीमुळे सर्दीचा त्रास वाढू लागल्याने अनेकजण रुग्णालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती डॉ. एजाज शेख यांनी सांगितले.

थंडीने कोंबड्या गारठल्या, पोल्ट्री व्यवसायाला तडाखा
पोल्ट्री फॉर्ममधील कोंबड्याही या थंडीने गारठून गेल्या आहेत. पोल्ट्रीमधील विजेची उष्णता कमी झाल्याने अनेक कोंबड्या गतप्राण झाल्या. अनेक बचावात्मक उपाय करूनही कोंबड्या वाचवता आल्या नाही, अशी प्रतिक्रिया पोल्ट्री व्यावसायिक रमेश शेळके यांनी दिली.

>शुक्रवारी रात्री थंडीने मागील दहा वर्षातील नीचांकी पारा गाठला. पुढील चार ते पाच दिवस थंडी कायम राहणार आहे.
- व्ही. एस. जगधने, अधीक्षक कृषी हवामानशास्त्र विभाग.