आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमान घसरले, थंडी सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- उत्तर गोलार्धात बर्फवृष्टी होत असून तेथे रक्त गोठवणार्‍या थंडीला सुरुवात झाली आहे. याचा परिणाम भारतातील पठारी भागात दिसून येत आहे. 25 ऑक्टोबर रोजी किमान तापमान 23.2 अंशांवर होते. त्या तुलनेत 31 ऑक्टोबरला किमान तापमानात 6.5 अंशांनी घसरण झाली आहे. त्यामुळे बोचरी थंडी जाणवत आहे.

कोजागरी पौर्णिमा नुकतीच संपली आहे. सध्या सूर्याचे दक्षिणायन सुरू असल्याने तापमानात आकस्मिक बदल होत आहेत. उत्तर गोलार्धात बर्फवृष्टी सुरू झाली आहे. या भागात कडाक्याची थंडी आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फायलिन चक्रीवादळ निवळले आहे. परिणामी, पहाटे साडेपाच ते सकाळी 8 आणि रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत धुके पडण्यास सुरुवात झाली आहे. काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहत असल्याने सकाळी थंडी, दुपारी कडक ऊन पडल्यामुळे तापमानात वाढ होऊन उकाडा जाणवतो, तर सायंकाळी आणि रात्री पुन्हा गारव्यात वाढ होत असल्याने किमान तापमानात घट होत आहे. यामध्ये उत्तरोत्तर वाढ होऊन थंडीचा कडाकाही वाढणार आहे. जानेवारीच्या मध्यापर्यंत तापमान गेल्या काही वर्षांतील नीचांक गाठण्याची शक्यता एमजीएमचे खगोलशास्त्र व अंतराळ तंत्रज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना वर्तवली आहे.

तीन दिवस कमाल तापमान स्थिर
आकाशात ढगांची गर्दी होत असल्याने आद्र्रतेचे प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे 27 ते 29 ऑक्टोबरदरम्यान कमाल तापमान 32.2 अंशांवर स्थिर होते, पण किमान तापमानात सतत घसरण होत गेली.

यंदा थंडी चांगली राहील!
फायलिन वादळाचा परिणाम आपल्याकडेही झाला आहे. अधूनमधून ढगाळ वातावरण राहत असल्यामुळे पाहिजे तशी थंडी जाणवत नाही. सध्या हवेचा दाब 1014 हेप्टा पास्कल एवढा आहे. जसजसा हवेचा दाब वाढत जाईल तसतसा थंडीचा जोरही वाढत जाईल. पुढे पावसाची शक्यता फ ार कमी आहे. मात्र, यंदा थंडी चांगली राहील. डॉ. रामचंद्र साबळे, हवामानतज्ज्ञ. परभणी.

चक्रीवादळामुळे थंडी लांबली
तामिळनाडू, आंध्र प्रदेशात धडकलेल्या चक्रीवादळामुळे हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पंधरा दिवस थंडी लांबली आहे. सौर डागांची कमाल पातळी ओलांडली आहे. त्यामुळे येणार्‍या काळात उन्हाची तीव्रता कमी राहून कडाक्याची थंडी जाणवण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या मध्यापर्यंत किमान तापमान नीचांकी पातळी गाठेल.
-श्रीनिवास औंधकर, हवामानतज्ज्ञ. नांदेड.