आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच मंडपात ‘कुबूल-कुबूल', "साधू-साधू' अन् "सावधान’!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यातील दुष्काळी स्थिती आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेनेने जिल्ह्यातील २४४ जोडप्यांचा शनिवारी सामुदायिक विवाह लावून दिला. हिंदू, बौद्ध मुस्लिम समाजातील जोडपी या सोहळ्यात विवाहबद्ध झाली. सोहळ्याला राज्यपाल सी. विद्यासागर राव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अशा विवाह सोहळ्यांतून वाढेल सर्वधर्मसमभाव : राज्यपाल राव
एकाच मंडपात विविध धर्मांची जोडपी विवाहबद्ध होत आहेत. ही अतिशय आनंदाची बाब आहे. अशा सोहळ्यांतूनच सर्वधर्मसमभाव, सामाजिक एकोपा वाढेल, असे मत राज्यपाल विद्यासागर राव यांनी व्यक्त केले.
शिवसेनेतर्फे अयोध्यानगरीत शनिवारी सामूहिक विवाह समारंभ झाला. त्यात वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी राव उपस्थित होते. ते म्हणाले की, विवाहाच्या निमित्ताने पाणी खर्च होते. सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये त्याचीही मोठी बचत झाली आहे. काही समाजात हुंडा घेण्याची वाईट प्रथा आहे. ती बंद होण्याच्या दृष्टीनेही हा सोहळा हे एक चांगले पाऊल आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक प्रगत राज्य मानले जाते. त्यामुळे अशा सोहळ्यांचा उपक्रम सर्व जिल्ह्यांमध्ये राबवला जावा. येत्या पावसाळ्यापूर्वी पाणी जिरवण्याची जास्तीत जास्त कामे व्हायला हवीत. त्यासाठी विविध कंपन्यांचा सामाजिक फंड (सीएसआर) कसा वापरता
आवाहनहीत्यांनी केले. पालकमंत्री रामदास कदम यांनी मराठवाड्यातील गरिब शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींच्या विवाहाची जबाबदारी शिवसेना घेईल, असे जाहीर केले. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यासह शिवसेनेचे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

खासदार धूत यांच्याकडून २१ टँकर्स
मराठवाड्यातील गाव-खेड्यांना पाणीपुरवठा करता यावा यासाठी राज्यसभा खासदार राजकुमार धूत यांच्याकडून शिवसेनेकडे २१ टँकर्स देण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यासाठी त्यांची विभागणी करण्यात आली. गतवर्षीही धूत यांनी टँकर्सचा पुरवठा केला होता.

दिव्य मराठी दृष्टिकाेन
यासामूहिक विवाह सोहळ्याचे कौतुकच आहे. पण राजकीय पक्ष किंवा राजकारण्यांचे ध्येय, उद्दिष्ट अशा सोहळ्यांचे असता कामा नये. त्यांनी गरिब, सामान्य माणसाला इतके सक्षम बनवावे की त्यालाच आपल्या मुला-मुलीचा विवाह स्वत:च्या अपेक्षेनुसार करता यावा. तरच या राजकारण्यांना आम्ही खऱ्या अर्थाने रयतेचे राजे आहोत, असे म्हणून घेता येईल.
भीषण दुष्काळ, उजाड-ओसाड शेेत, चारापाण्यासाठी गुरांची तडफड, चिमुकल्यांची भूक भागवणेही मुश्कील व्हावे अशी भयाण परिस्थिती आणि त्यातच जर घरात लग्नाची लेक असेल तर शेतकरी राजाची झोप उडाल्यावाचून राहणार नाही. मराठवाड्यातील नेमकी हीच परिस्थिती ओळखून शिवसेना बळीराजाच्या मदतीला धावून आली. हिंदू आणि मुस्लिम राजवटींच्या खाणाखुणा अंगाखांद्यावर मिरवणाऱ्या एेतिहासिक औरंगाबाद शहरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेत २४४ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा शनिवारी धूमधडाक्यात पार पडला. दुपारी पाऊणच्या सुमारास मुस्लिम आणि ४२ बौद्धांसह, २४४ जोडप्यांची लग्ने लागली आणि ‘कुबुल-कुबुल, साधू-साधू अन् शुभमंगल सावधान’चे एकत्रित स्वर उमटले. ८० टक्के समाजकारण जपणाऱ्या शिवसेनेचा प्रत्ययच जणू या सोहळ्यातून शिवसैनिकांनी दिला.

मौलवी, भंतेजी आणि पुरोहितांनी ही लग्ने लावली. नवपरिणीत दांपत्यांना आशीर्वाद देण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तिन्ही धर्मांचे संत-महंत आणि शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार, खासदार, वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच जिल्हाभरातून आलेले सुमारे एक लाख वऱ्हाडी उपस्थित होते. मराठवाड्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते तेव्हाच त्यांनी शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न यापुढे शिवसेना लावून देईल, अशी घोषणा केली होती. ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना’ असे नाव या योजनेला देण्यात आले. त्यासाठी दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील सर्व नेते, कार्यकर्ते विवाह नोंदणीसाठी जिल्हाभर फिरत होते. त्यात २४४ दांपत्यांची नोंदणी झाली आणि शनिवारी रेल्वेस्थानक परिसरातील अयोध्यानगरीच्या मैदानावर हा सोहळा थाटात पार पडला. पोलिसांच्या बँडपथकाच्या तालावर वरांची भव्य मिरवणूकही काढण्यात आली. डोळे दिपवणारा असाच हा सोहळा होता. लग्नानंतरचे सर्व विधीही करण्यात आले.

आग्रहाने घातले जेवू
घरचे कार्य समजून शिवसैनिक झटत होते. लग्नघटिकेपर्यंत ५० हजार वऱ्हाडींची जेवणे आटोपली होती. लग्न लागल्यानंतरही सुमारे ५० हजार लाेकांची जेवणे झाली. एका वेळी १० हजार लोक बसतील अशा पंगती होत्या. वाढपी म्हणून पाच हजारांवर शिवसैनिकांची फौज होती. सर्वांना आग्रह करून जेवू घातले जात होते.

पैठणी, मंगळसूत्र, जोडवे, वराला सफारी, बूट, घड्याळ
केवळ दाखवण्यासाठी म्हणून हा सामूहिक विवाह सोहळा नव्हता. त्यात आपुलकीची भावना दिसत होती. शेतकऱ्याच्या लेकीचे कन्यादान आपली म्हणूनच करण्याची भावना जाणवत होती. त्यामुळेच येवल्याची प्रसिद्ध पैठणी, उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी पाठवलेले खास मंगळसूत्र, कानातील डूल, पायातील जोडवे, पैंजण असे सालंकृत कन्यादान करण्यात आले. वरासाठी ब्रँडेड कंपनीची सफारी, बूट, घड्याळाचा आहेर होता. संसाराला उपयोगी पडेल असे कपाट, गादी, पलंगासह स्वयंपाकघरात लागणाऱ्या ७६ प्रकारच्या वस्तू देण्यात आल्या.
बातम्या आणखी आहेत...