आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयभवानीनगरात नाल्यावर बहुमजली घरे, पाहून जिल्हाधिकारीही म्हणाले, ‘हे राम!’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बुधवारच्या पावसाने जयभवानीनगरातील असंख्य घरांत पाणी शिरले. अनेकांच्या घरांचा पहिला मजला रात्रभर पाण्यात होता. सकाळी पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी एन. राम येथे दाखल झाले. नालाच गायब करण्यात आल्याने हा प्रकार घडल्याचे त्यांच्या लक्षात आले. नाल्यावर बहुमजली इमारती उभ्या राहीपर्यंत महापालिका प्रशासन काय करत होते? ही अतिक्रमणे राहूच दिली कशी, असा सवाल त्यांनी केला. भविष्यात पुन्हा असा प्रकार घडू नये म्हणून नाला मोकळा करा, असे आदेश त्यांनी दिले. मनपा आयुक्त दीपक मुगळीकर बैठकीनिमित्त मुंबईला होते. शुक्रवारी सकाळी ते आल्यानंतर नाल्यावरील मालमत्ता काढून घेण्याचे नियोजन केले जाणार आहे. या नाल्यावर १३० मालमत्ता काढण्याचे संकेत गुरुवारी देण्यात आले. त्यानंतर शहरातील अन्य नाल्यांवरील अतिक्रमणांचा क्रमांक लागेल, असेही संकेत देण्यात आले आहे. 

थोडक्यात आता नाल्यांवरील बांधकामे हटवण्याची मोहीम हाती घेतली जाण्याची शक्यता आहे. जयभवानीनगरात पावसाचे पाणी तुंबल्याने हाहाकार माजल्याचे समजल्यानंतर गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी राम यांनी आमदार अतुल सावे, शहर अभियंता सखाराम पानझडे, उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार रमेश मुनलोड, नगरसेवक प्रमोद राठोड, माजी नगरसेवक बालाजी मुंडे यांच्यासह या भागाची पाहणी केली. 
 
शिवसेना इमारतींना हात लावू देत नाही : नाल्यावरीलबांधकामे काढून घेण्याची प्रक्रिया पूर्वीपासूनच हाती घेण्यात आली आहे. १३० मालमत्ताधारकांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. परंतु शिवसेनेचे पदाधिकारी इमारतींना हात लावू देत नाहीत, असा आरोप माजी नगरसेवक मुंडे यांनी केला. तर तुम्ही लेखी द्या, आम्ही अतिक्रमणे काढून घेतो, असे अधिकाऱ्यांनी यापूर्वी मुंडे यांना सांगितले तेव्हा त्यांनी तसे करण्यास नकार दिला होता. थोडक्यात या अतिक्रमणांवर शिवसेना तसेच भाजपलाही राजकारण करायचे आहे. परंतु आता तसे होणार नाही. 
 
फक्त पडझडीसाठी भरपाई : दरम्यान,रात्रीच्या पावसात झालेल्या पडझडीचीच फक्त नुकसान भरपाई मिळेल. घरातील साहित्याच्या नुकसानीचा मोबदला मिळणार नाही, असे जिल्हाधिकारी राम यांनी स्पष्ट केले. घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाल्याने त्याची भरपाई मिळावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली होती. परंतु तसे शक्य नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

या नदी-नाल्यांवर उभी अतिक्रमणे 
खाम नदी, बारुदगर नाला, बायजीपुरा- कैलासनगरातून वाहणारा नाला, आकाशवाणीपासून बालाजीनगरातून वाहणारा नाला, दलालवाडी येथील नाल्यांवरील अतिक्रमणे काही दिवसांत निघतील. 

कॅनॉटपासून रेल्वेस्टेशनकडे जाणारा नाला कुठे तीनच फूट, तर कुठे ‘भूमिगत’च 
जिल्हाधिकारीपाहणीसाठी या भागात पोहोचले तेव्हा अनेक ठिकाणी तीन फुटांपर्यंत पाणी साचले होते, घरात पाच फुटांपर्यंत पाणी तसेच होते. हे पाणी का साचले, याची पाहणी राम यांनी केली. तेव्हा सिडकोकडून येणारा आणि पुढे रेल्वेस्टेशनकडे जाणारा नालाच मध्ये गायब झाल्याचे निदर्शनास आले. कॅनॉट प्लेसपासून हा नाला सुरू होतो. त्याचे पाणलोट क्षेत्र मोठे आहे. मात्र, नागरिकांनी या नाल्यावर बांधकामे केली आहेत. जयभवानीनगरात काही ठिकाणी हा नाला फक्त तीनच फुटांचा आहे, तर काही ठिकाणी तो दिसतही नाही. 

आज ठरणार नेमका रोडमॅप 
या अतिक्रमणांना आधीच नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. शुक्रवारी आयुक्तांच्या उपस्थितीत त्यावर शिक्कामोर्तब होऊन दोन्हीही बाजूंनी नाला मोकळा करण्यात येईल. 
 
म्हणाले : मनपाने झोपा काढल्या का?, पाऊस लगेच थांबला म्हणून मोठी आपत्ती टळली !
जयभवानीनगरातील नाल्यावर उभ्या राहिलेल्या बहुमजली इमारती आणि काही घरांचे अंशत: तर काही घरांचे पूर्णत: बांधकाम पाहून चकित झालेल्या राम यांनी आधी मनपा अधिकाऱ्यांना झापले. बहुमजली इमारती उभ्या होत असताना तुम्ही काय करत होते, असा सवाल त्यांनी केला. सुदैवाने बुधवारचा पाऊस लगेच थांबला, अन्यथा मोठी आपत्ती ओढवली असती. पुन्हा असा पाऊस झाला तर चित्र चांगले नसेल. त्यामुळे नाला मोकळा करण्याचे काम तातडीने हाती घ्यावे, असे त्यांनी सांगितले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...