आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी कार्यालयात आता दलालांची गर्दी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - एक जानेवारीपासून रेडीरेकनरचे दर लागू होणार असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दलालांची गर्दी वाढली आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच दलालांनी थाटलेल्या दुकानात कधी नव्हे ते रविवारीही दस्तऐवज तयार करण्याचे काम सुरू होते. प्रत्येक दलाल रजिस्ट्रीचे टोकन घेण्यासाठी धडपडत असल्याने मालमत्ताधारकांऐवजी दलालांची चलती असल्याचे चित्र दोन दिवस पाहायला मिळणार आहे.

31 डिसेंबरच्या आत मालमत्तेची रजिस्ट्री केल्यास मुद्रांक शुल्क कमी लागणार असल्याने अनेक मालमत्ताधारकांनी खरेदी-विक्रीचा व्यवहार पार पाडला, तर गर्दीचा फायदा घेत काही दलालांनी प्रलंबित पडलेल्या फायली घुसवण्याचा प्रयत्न चालवला आहे. यामुळे दोन दिवसांत बोगस रजिस्ट्रीही होण्याची मोठी शक्यता आहे. 29 डिसेंबर रोजी रविवार असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील दस्तऐवज लिहिणारे दस्त तयार करण्यात व्यग्र होते. 30 आणि 31 डिसेंबर रोजी दलालांचे प्रतिनिधी खरेदी-विक्री करणार्‍यांसाठी टोकन घेण्यासाठी रात्रीपासूनच फील्डिंग लावत आहेत. सोमवारची गर्दी पाहून रजिस्ट्रीच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी विक्रमकुमार घेणार आहेत. 28 आणि 29 डिसेंबर रोजी शासकीय सुटी असल्याने या दोन दिवसांत मोठय़ा संख्येने दस्तऐवज तयार झालेले आहेत. यामध्ये काही वादग्रस्त आणि न्यायप्रविष्ट असलेल्या जमिनींचेही दस्त तयार करून ठेवण्यात आल्याचे समजते, तर जमीन घेणार्‍यांनी अधिकार्‍यांमार्फत लिंक लावून ठेवल्याने या दोन दिवसांत बोगस रजिस्ट्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या सदंर्भात मुद्रांक जिल्हाधिकारी वाय. डी. दामसे यांनी सांगितले की, वास्तविक पाहता लोकांनी गर्दी करण्याची गरज नाही. दलाल लोकांना घाबरत असून दोन दिवसांत रजिस्ट्री करून घेण्यासाठी दबाव टाकत आहेत. नागरिकांनी 31 डिसेंबर तारखेच्या आतील मुद्रांक विकत घेऊन ठेवल्यास चार महिन्यांत कधीही रजिस्ट्री केल्यास नवीन रेडीरेकनरचे दर लागणार नाहीत. बोगस रजिस्ट्री होऊ नये यासाठी आम्ही काळजी घेतो. कार्यालयाच्या आवारात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात सर्व हालचाली रेकॉर्ड केल्या जात आहेत.