आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांती चौकात सिटूचे धरणे, जिल्हाधिकारी कार्यालयावर अंगणवाडी कार्यकर्त्यांचा मोर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ शुक्रवारी कामगार संघटना रस्त्यावर उतरल्या.
संघर्षातून मिळवलेले मानधन रोखल्याबद्दल सरकारच्या विरोधात आयटक संलग्न अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी धडक मोर्चा काढण्यात आला, तर श्रमिक कायद्यात बदल करून कामगार विरोधी कायदा लागू केल्याबद्दल कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने धरणे दिली. दोन्ही आंदोलनात हमारे अच्छे दिन कब आयेंगे, मोदी सरकार जवाब दो, अशा घोषणा देण्यात आल्या.
अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एप्रिलपासून कर्मचाऱ्यांचे वेतन तीन ते चार चार महिन्यांनंतर होत आहे. ते वेळेवर मिळावे. मानधनाएवढा २०१४ चा दिवाळी बोनस (भाऊबीज) मिळावा. अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका यांच्या रिक्त जागा तत्काळ भरा, बचत गटाकडून पुन्हा फेडरेशनचा आहार शिजवण्याचे काम सेविका मदतनीस यांच्याकडे देण्यात यावे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पुद्दुचेरीप्रमाणे १२५०० रुपये मानधन मिळावे. सेवानिवृत्त झालेल्यांना निवृत्तिवेतन द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या. क्रांती चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. पैठण गेट, टिळक पथ, गुलमंडी, सिटी चौक, गांधी पुतळा, चेलीपुरामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचला. यात दोन हजार कर्मचारी सहभागी झाले होते. या वेळी प्रा. राम बाहेती, तारा बनसोडे, अनिल जावळे, विलास शेंगुळे, रफत सिद्दिकी, चंचल खंडागळे, छाया पोटे, समिंद्रा नाईक, रंजना राठोड, गंगा जंजाळ, मंगला परदेशी, सुनीता भोकरे, आशा सोनवणे, शन्नो शेख, सुनीता शेजवळ, मुक्ता पठाडे, प्रमिला शिंदे, रेखा सोनवणे, नूरजहाँ पठाण, विमल वाडेकर, अ‍ॅड. अभय टाकसाळ आदींची उपस्थिती होती.

महाधरणे आंदोलन
कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने क्रांती चौकात महाधरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र व राज्य सरकारने श्रमिक कायद्यात बदल करून कामगार विरोधी कायदा लागू केल्याने कामगारांचे हाल होत आहेत. त्यामुळे देशभर शुक्रवारी दहा मागण्यांसाठी सकाळी ११ ते चारपर्यंत महाधरणे आंदोलन करण्यात आले. यात संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी पी. एफ, ई. एस. आय. सेवा द्या, बोनस मर्यादा वाढवा, किमान वेतन सर्वांना लागू करून 15 हजार रुपये वेतन द्या, महागाई भत्ता सुरू करा, बँक व विमा कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली काढा, अंगणवाडी मिड डे मिल, आशा वर्कर्स, ग्राम रोजगार सेवक, बीडी, घरेलू कामगार, दूरसंचार आदी क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न सोडवा आदी मागण्या करण्यात आल्या. या वेळी सिटू, आयटक, बी. एम. एस., एचएमएस, इंटक, विमा, बँक, दूरसंचार, वीज, राज्य व केंद्र सरकार कर्मचारी संघटना, शेंद्रा सिमेन्स आदी ठिकाणच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. या वेळी अ‍ॅड. उद्धव भवलकर, बुद्धिनाथ बराळ, लक्ष्मण साक्रूडकर, विठ्ठल कदम, एन. ए. गफार, उमेश कुलकर्णी, जगदीश भावठाणकर, राम बाहेती, के. एम. झा, दामोदर मानकापे आदींची उपस्थिती होती.