आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालयीन तरुणी, महिलांच्या सुरक्षेचे पोलिसांसमोर मोठे आव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : पोलिसांच्या अविरत प्रयत्नांमुळेच राज्यात कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्यात यश मिळाले आहे. मात्र, येत्या काळात महाविद्यालयीन तरुणी, महिलांच्या सुरक्षेचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे, असे राज्यपाल विद्यासागर राव यांनी सांगितले. पोलिसांमुळेच महाराष्ट्र नक्षलमुक्त झाल्याचा दावाही त्यांनी केला. 
 
२९ व्या राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, गृह विभागाचे अपर सचिव श्रीवास्तव, पोलिस महासंचालक सतीश माथूर, अतिरिक्त पोलिस महासंचालक अर्चना त्यागी, डॉ. प्रज्ञा सरवदे, पोलिस आयुक्त अमितेशकुमार, विशेष पोलिस महानिरीक्षक अजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. गेल्या काही काळापासून मुली, तरुणींची छेड काढण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. त्याविषयीचे वृत्त ‘दिव्य मराठी’ सातत्याने प्रसिद्ध करत आहे. तोच धागा पकडत राज्यपाल म्हणाले की, महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. 
 
पोलिस अत्याचाऱ्यांवर कारवाई करत आहेत. मात्र, हे प्रकार झपाट्याने कमी करण्यासाठी तरुणांना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या प्रक्रियेत सहभागी करून घेणे आवश्यक आहे. सध्या राज्याची लोकसंख्या ११ कोटी २३ लाखांच्या पुढे गेली आहे. त्या तुलनेत पोलिसांची संख्या मात्र तोकडी आहे. सायबर क्षेत्रातील वाढते गुन्हेही पोलिसांसमोर मोठे आव्हान आहेत. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर भर देत काम करणे आवश्यक आहे. 
 
महाराष्ट्र देशातील सर्वाधिक प्रगत राज्य आहे. संपूर्ण देश महाराष्ट्राकडे आशेने पाहतो. भारत झपाट्याने विकास करणारा देश असून महाराष्ट्र त्याचा चेहरा आहे. देशात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक आपल्याच राज्यात होत आहे. राज्यातील गुंतवणुकीचे धोरण आणि कायदा सुव्यवस्थेमुळे निर्माण झालेली शांतता हे यामागचे प्रमुख कारण आहे
आपले पोलिस खाते २४ तास डोळ्यात तेल घालून रस्त्यावर उभे असते. त्यामुळे कधीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही. मुंबईतील अतिरेकी हल्ल्याच्या वेळी महाराष्ट्र पोलिसांनी दिलेले चोख उत्तर आणि बलिदान कायम स्मरणात राहणारे आहे, असेही ते म्हणाले. 
 
खेळाडू देशाचे नाव उज्ज्वल करतील : राव म्हणाले, या स्पर्धा पोलिसांसाठी नवचैतन्य देणाऱ्या ठरतील. यात महिला खेळाडूंचा सहभाग प्रशंसनीय आहे. या स्पर्धेतील खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी होऊन देशाचे राज्याचे नाव उज्ज्वल करतील, अशी आशा व्यक्त करून त्यांनी पोलिसांना नवीन वर्षासह मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. 
 
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राज्य राखीव पोलिस दलाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संदीप बिष्णोई, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी निधी पांडे समादेशक निसार तांबोळी, अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक उज्ज्वला वनकर, उपसमादेशक विल्सन सिरीन यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन नीता पानसरे यांनी केले. या वेळी एसआरपीएफ जवानांच्या पाइप बँड पथकाने राज्यपालांना मानवंदना दिली. या वेळी राज्यभरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 
 
पोलिस तणावमुक्त, सुदृढ हवेत 
पोलिसांचा तणाव कमी करून त्यांच्या समस्या सोडवणे, त्यांना शारीरिकदृष्ट्या सुदृढ तणावमुक्त ठेवणे गरजेचे आहे. त्यांच्या घरांचा प्रश्न सोडवणेदेखील आवश्यक आहे. पोलिसांसाठी एक लाख घरे बांधण्याचे काम शासनाने सुरू केले असून त्यासाठी स्वतंत्र बोर्ड तयार करण्यात आल्याचेही राज्यपाल म्हणाले. 
 
महाराष्ट्र आणि तामिळनाडूचे राज्यपालपद सांभाळणाऱ्या विद्यासागर राव यांनी भाषणाची सुरुवात मराठी भाषेत केली. नऊ मिनिटांच्या भाषणात सुमारे तीन मिनिटे त्यांनी मराठीत भाषण केले. त्यांच्या या प्रयत्नांचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून कौतुक केले.