औरंगाबाद- राज्यातील शासकीय व खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रवेशाकरिता राबवण्यात येणा-या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देऊनही विद्यार्थी संख्या मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रिक्त जागांची संख्या वाढल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रवेशासाठी मुदतवाढ देऊनही किती फायदा होईल, याबाबतही आता शंका निर्माण झाली आहे.राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने अभियांत्रिकीची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहेत. प्रवेश फेरीचे दोन राउंड पूर्ण झाल्यानंतर समुपदेशन फेरीत तरी विद्यार्थी मिळतील या आशेवर समुपदेशन फेरीला मुदतवाढ देण्यात आली आहे. 4 ऑगस्टपर्यंत चालणा-या या फेरीत विद्यार्थी मिळतील. तसेच किमान 25 हजार जागा तरी या शेवटच्या फेरीत भरल्या जातील, या आशेवरच ही शेवटची फेरी राबवण्यात येत आहे.
नव्या अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या मान्यतेची प्रक्रिया उशिरा झाल्याने या वर्षी संचालनालयाला अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास उशीर झाला. प्रवेशाकरिता न्यायालयाने ठरवून दिलेले वेळापत्रक बंधनकारक करण्यात आल्याने उच्च व तंत्रशिक्षण विभागाला प्रवेश फे-या कमी कराव्या लागल्या. आतापर्यंत प्रवेशासाठी तीन राउंड घेण्यात येत होते. त्यानंतर प्रवेशासाठी राहिलेल्या विद्यार्थ्यांकरिता चौथी फेरी ही समुपदेशनच्या स्वरूपात घेतली जात असे. गेल्या वर्षी सुमारे तीन हजार विद्यार्थी समुपदेशन फेरीत प्रवेशास पात्र ठरले होते; पण यावेळेस एक ऑनलाइन फेरी कमी झाल्याने जवळपास 25 हजार विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन फेरी राबवावी लागत आहे. यंदा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ही समुपदेशन फेरी राज्यात सहा ठिकाणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना जागांनुसार प्रत्यक्ष बोलावण्यात आले असून शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑनलाइन स्क्रीनवर राज्यभरातील रिक्त महाविद्यालयांतील जागा, ब्रँच या विषयीची माहिती दिली जात आहे. त्यातून त्यांना आपल्या पसंतीचे महाविद्यालय निवडण्यास मदत होते; परंतु या प्रक्रियेत वेळ खूप लागत असल्याने सुरुवातीला 1 ऑगस्टपर्यंत दिलेली मुदत आता 4 ऑगस्टपर्यंत करण्यात आली आहे. दरम्यान, मागील वर्षी 50 हजार, तर यंदा त्यापेक्षा अधिक म्हणजे 60 ते 65 हजार जागा पुन्हा रिक्त राहण्याची शक्यता आहे.
पर्याय निवडीची मुभा
यंदा प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात आल्याने तसेच ऑप्शन निवडीतील बदलांमुळेदेखील विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. पहिल्या राउंडसाठी शंभर पर्याय आणि दुस-यात सात पर्याय निवडीची मुभा देण्यात आली आहे. शिवाय गुणवत्तापूर्ण शिक्षण देणा-या महाविद्यालयांची संख्याही कमी आहे. एवढेच नाही, तर ऑप्शनमध्ये विशिष्ट महाविद्यालयांनाच प्रथम पसंती मिळत असल्यानेही बाकी महाविद्यालयांत विद्यार्थी जाण्यास तयार होत नाहीत. यामुळेच या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहणार आहेत. महाविद्यालयांचा दर्जा सुधारण्याचे पालकांनी म्हटले आहे.