आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Colleges 156, PG Courses 60 And Professors Only 17 In Bamu

सावळा गोंधळ : कॉलेज १५६, पीजी कोर्स ६० आणि प्राध्यापक फक्त १७

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - संलग्नित महाविद्यालयांतील पीजी कोर्सेससाठी सीबीसीएस म्हणजेच श्रेयांक (चॉइस बेस्ड क्रेडिट अँड ग्रेडिंग सिस्टिम) पद्धत लागू करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ देशातील एकमेव विद्यापीठ असल्याचा गवगवा केला जात आहे. परंतु इतर विद्यापीठांनी सावध पवित्रा का घेतला आहे, याचा उलगडा येथील विद्यापीठाच्या कारभाराकडे बघितल्यावर येतो. किमान २५०० पेक्षा अधिक मान्यताप्राप्त प्राध्यापकांची गरज असताना जिल्ह्यांतील १५६ पीजी कॉलेजमध्ये फक्त १७ जण कार्यरत आहेत. तरीही देशात क्रमांक एकचे विद्यापीठ असल्याचा दावा कुलगुरूंच्या वतीने केला जात आहे.
औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड आणि जालना या जिल्ह्यांतील संलग्नित महाविद्यालयांची संख्या ४१५ आहे. त्यापैकी १५६ महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम आहे. या १५६ महाविद्यालयांच्या पीजी कोर्सेससाठी विद्यापीठाने दोन महिन्यांपूर्वीच श्रेयांक पद्धत लागू केली आहे. एकूण ६० पीजी कोर्सेस महाविद्यालयांत चालवले जातात. एका कोर्ससाठी किमान दोन प्रोफेसर, दोन सहयोगी प्राध्यापक आणि चार सहायक प्राध्यापक असे मान्यताप्राप्त प्राध्यापक असणे गरजेचे आहे. म्हणजे, मान्यताप्राप्त प्राध्यापकांचा आकडा सहा हजारांपेक्षा अधिक असणे गरजेचे आहे. विद्यापीठाकडून हे सक्तीने करून घेणे केवळ अशक्यप्राय दिसते आहे, म्हणून श्रेयांक पद्धत लागू करण्याच्या अतिघाईसाठी विद्यापीठाने महाविद्यालयांना किमान एका कोर्ससाठी दोन प्राध्यापकांपर्यंतची शिथिलता दिली आहे. त्यानुसार अडीच हजार मान्यताप्राप्त प्राध्यापकांची गरज असताना विद्यापीठाच्या चार जिल्ह्यांत फक्त १७ मान्यताप्राप्त प्राध्यापक आहेत. तरीही जागतिक स्तरावरील विद्यापीठांशी स्पर्धा करण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने संलग्नित महाविद्यालयांत श्रेयांक पद्धत लागू करण्यात आली आहे. आता येत्या १६ ऑक्टोबरपासून परीक्षांना प्रारंभ होणार आहे. त्यासाठी प्रश्नपत्रिकांची संरचनाही केली जात आहे. पण महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापकांना अद्यापही श्रेयांक पद्धत समजलेली नाही. त्यांना समजावून सांगण्यासाठी विद्यापीठाने सोमवारी (२८ सप्टेंबर) कार्यशाळा घेतली. त्या वेळी बहुतांश प्राचार्यांनी दांडी मारली असून श्रेयांकाला उघडपणे विरोध करण्यास सुरुवात केली आहे.
संस्थेने अर्ज करावा
श्रेयांक लागू करणारे राज्यातील हे एकमेव विद्यापीठ असून यामुळे विद्यार्थ्यांचे अत्यंत पारदर्शकपणे मूल्यमापन करता येईल. मान्य आहे की, आपल्याकडे मान्यताप्रात प्राध्यापक नाहीत. पण संस्थाचालकांनी विद्यापीठाकडे अर्ज करावेत, प्राध्यापकांना मान्यता प्रदान करण्यात येईल. डॉ.बी. ए. चोपडे, कुलगुरू
प्राचार्यांना कारणे दाखवा
जवळपास हजार जणांची उपस्थिती अपेक्षित होती. दुर्दैवाने बहुतांश प्राध्यापक, प्राचार्यांनी पाठ फिरवल्यामुळे आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत. मान्यताप्राप्त प्राध्यापक नेमायचे नाहीत, विद्यापीठाच्या परिपत्रकांचे पालन करायचे नाही, बैठका-कार्यशाळांना हजर राहायचे नाही. ही मानसिकता खपवून घेतली जाणार नाही. जे आले नाहीत, त्यांचा डाटा उपलब्ध असून त्यांना दोन दिवसांतच कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येणार आहे. डॉ.के. व्ही. काळे, संचालक, बीसीयूडी.