आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद लेणीवरून - रंगभूमीची दिशा बदलणारा प्रतिभावान नाटककार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘मिलिंद महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९५० ते १९५५ पर्यंतच्या काळात असायचे. प्राचार्य चिटणीसांशी समस्त कॉलेजच्या प्रगतीसंबंधी चर्चा होत असे. प्राध्यापकांच्या वाचनापासून ते विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबर लोकशाहीपर्यंत चर्चा झडत. त्यावेळी स्नेहसंमेलनात सादर होणाऱ्या नाट्य प्रयोगांना पाहून आपल्या विषयावर मुलांना लिहायला सांगा ते सादर करा, अशी अपेक्षा बाबासाहेबांनी व्यक्त केली. चिटणीससरांनी त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनावर, समस्यांवर नाटक लिहावे अशी नोटीस काढली. १९५४ चा काळ. नाटक आले नाही. चिटणीससरांनी तसा रिपोर्ट बाबासाहेबांना दिल्यावर ‘मग तूच लिही’ म्हणून फर्मान सोडले. मी नाटककार नाही हे सांगूनही बाबासाहेब बधले नाहीत. चिटणीससरांना मग नाटककार व्हावे लागले आणि युगयात्रा या नाटकाचा जन्म झाला. जाणीवपूर्वक युगायुगाची कहाणी, आंबेडकर दृष्टीतून व्यक्त झालेला हा प्रवास माईसाहेबांसह तो बोधी मंडळाने, विद्यार्थी, प्राध्यापकांनी केलेला प्रयोग त्यांनी पाहिला. पावती दिली. १४ एप्रिल १९५५ रोजी बाबासाहेबांच्या वाढदिवसाची भेट दलित नाटकाच्या चळवळीचा प्रारंभ बिंदू ठरला.” दलित नाट्य चळवळ रंगभूमीशी जोडलेले अभ्यासू रंगकर्मी प्रा. अविनाश डोळस यांनी सांगितलेली ही आठवण दलित रंगभूमी आणि नाटककार प्रकाश त्रिभुवन या अत्यंत अभ्यासपूर्ण पुस्तकात प्रा. यादव गायकवाड यांनी नोंदवली आहे.
ती वाचताना आपण हळूहळू पाने उलटत जातो आणि एका सशक्त दलित नाट्य चळवळीचा इतिहास जिवंत होतो. प्रा. गायकवाड यांनी अनेक संदर्भ आणि भाष्यांसह अधोरेखित केलेला हा प्रवास खरे तर गेल्या ६० वर्षांचा साक्षीदारच म्हणावा लागेल. या इतिहासात त्यांनी नाट्य लेखकांनी मांडलेले विषय. त्या मांडणीमागील भूमिका तसेच त्यातील आशयघनता आदींवरही सखोल विवेचन केले आहे. दलित रंगभूमीवर प्रभाव टाकणारे अनेक नाट्य लेखक आहेत. त्यात प्रामुख्याने नाट्य संमेलनाचे पूर्व अध्यक्ष प्रा. दत्ता भगत, प्रेमानंद गज्वी, भि. शि. शिंदे, टेक्सास गायकवाड, संजय पवार यांचा समावेश आहेच. मात्र, त्यांनी मुख्य भर दिला आहे तो औरंगाबादचे रहिवासी असलेले प्रकाश त्रिभुवन यांच्यावर. समीक्षकांकडून काहीसे दुर्लक्षिले गेलेले त्रिभुवन हे दलित रंगभूमीवरील महान नाटककार आहेत, असे त्यांनी अनेक मुद्द्यांसह स्पष्ट केले आहे. त्यात कमालीची सत्यता आहे. केवळ मुंबई-पुण्यात वावर नसल्याने आपल्यातील अनेक मंडळी प्रतिभा असूनही लपली जातात. त्यात त्रिभुवन यांचा समावेश करावा लागेल. अत्यंत शांत, संयमी व्यक्तिमत्त्व असलेल्या परंतु अंतर्मनात ज्वालाग्राही, स्फोटक विचारांची मांडणी करण्याची त्रिभुवन यांची क्षमता आहे. ती त्यांनी त्यांच्या नाट्य लेखनातून सिद्ध केली आहे.
युगयात्रानंतर केवळ दलितच नव्हे तर मराठी रंगभूमीवर नवा प्रवाह आणणारे थांबा रामराज्य येतंय हे त्रिभुवन यांचे नाटक. १६ डिसेंबर १९८० रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. कामगार राज्य नाट्य स्पर्धेत उस्मानपुरा येथील ललित कला भवनात झालेला एक प्रयोग पाहिला. तो अजूनही कित्येकांच्या स्मरणात आहे. केवळ स्मरणातच नाही तर त्यातील प्रसंग, संवाद आणि कॉम्पोझिशन्सही मनावर कोरले गेले आहेत. एवढ्या सामर्थ्यवान संहितेचा लेखक दुर्लक्षित राहणे हे तमाम रंगकर्मींचे दुर्दैवच म्हणावे लागेल. एकीकडे थांबा रामराज्यचे प्रयोग प्रचंड गाजत असताना त्याची तत्कालीन तथाकथित समीक्षकांनी अपेक्षित दखल घेतली. कधी नाट्य लेखक म्हणून प्रा. दत्ता भगत तर कधी या नाटकाचे दिग्दर्शक प्रा. अविनाश डोळस यांनाच लेखक संबोधण्यात आले. मात्र, त्रिभुवन यांनी त्यावर कधीही त्रागा केला नाही. ते त्यांच्या वाटेवर शांतपणे चालत राहिले. हे त्यांच्यातील मोठेपण आणि वेगळेपणही आहे. थांबा रामराज्य येतंय या नाटकाने लोकप्रियतेचे अनेक विक्रम प्रस्थापित केले. अनेक कलावंतांना ओळख मिळवून दिली. परंपरावादी, दिवाणखान्याच्या चौकटीत अडकून पडलेल्या मराठी रंगभूमीच्या कक्षा त्यांनी रुंदावल्या. विषय मांडण्याची दिशाच बदलून टाकली. दलितांचे नेमके दु:ख काय. त्यांना गावात नेमकी कशी वागणूक मिळते. रोजचा श्वास घेण्यासाठी त्यांना कोणत्या टिपेचा संघर्ष करावा लागतो, हे त्यांनी त्यांच्या लेखणीतून अतिशय प्रभावीपणे मांडले. त्यातील अाशयसंपन्नता आजही थक्क करून टाकणारी आहे. स्वत:च्या जीवनात जे भोगले, पाहिले, पचवले ते त्यांनी एवढ्या ताकदीने नाट्य रूपात सादर केले आहे की बऱ्याच वेळा थांबा रामराज्य येतंय मधील प्रसंग रंगमंचीय अवकाश फोडून टाकत बाहेर येऊन उभे राहतात. नाट्य प्रवाही आणि वेगळेपण सांगणारे हवे यासाठी त्यांनी मिथके, पौराणिक प्रसंगांची जी रचना केली आहे ती त्यांच्यातील नावीन्यतेची साक्ष देणारीच आहे. दलित रंगभूमी म्हणजे केवळ दु:ख, वेदना मांडणे नाही, तर शोषित, पीडित वर्गाला अत्याचारांच्या विरोधात समर्थपणे उभे राहण्याची, स्वत्वातील अंगार चेतवण्याची ताकदही आहे, असा संदेश त्यांनी दिला आहे. म्हणूनच त्रिभुवन मराठी रंगभूमीवरचे महत्त्वाचे नाटककार आहेत. थांबा, रामराज्यमुळे रंगभूमीवर स्वत:चा ठसा उमटवल्यावर त्रिभुवन स्वस्थ बसले नाही. त्यांनी एक होता राजा, गणनायिका आम्रपाली ही नाटके लिहिली. ती दोन्ही रामराज्य एवढीच वेगळ्या वळणाची आणि आशयघन आहेत. धन नको, वन हवे या बालनाट्यातून त्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देताना बौद्ध संस्कृतीशी सुरेख सांगड घातली आहे. त्यांनी लिहिलेल्या दिग्विजय आणि इतर एकांकिका, सत्यमेव जयते या छोटेखानी एकांकिका पुस्तकांचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. या एकांकिका नव्या पिढीतील कलावंत, दिग्दर्शकांसाठी अत्यंत मोलाच्या ठरणाऱ्या आहेत. त्यात त्रिभुवन यांनी मांडलेली सूत्रे रसिकांनाही भावणारी आहेत. शिवाय ही सूत्रे सामाजिकदृष्ट्याही संदेश देणाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांचे दिशा बदलून टाकणारे लेखन अमूल्य आणि एेतिहासिक दस्तऐवज म्हणूनच नोंदले जाईल, याविषयी कोणतीही शंका नाही.
बातम्या आणखी आहेत...