आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिद्द करा दुनिया बदला: लष्कराची पेन्शन, घर विकून काढली शाळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भारतीय लष्करात कर्नल हुद्द्यावर असताना वैद्यकीय कारणावरून बढती नाकारली. निवृत्तीनंतर सेनादलाच्याच विविध शिक्षण संस्थांत काम करत हजारो विद्यार्थी घडवले. अखेर लष्कराची मिळालेली पेन्शन आणि कोल्हापूर येथील घर विकून अहमदनगर-सोलापूर रस्त्यावर ग्रामीण भागातील मुलांसाठी शाळा काढली. कर्नल दिलीप आणि गीता परब या दांपत्याचा विद्यार्थी घडवण्याचा हा उपक्रम कौतुकाचा ठरला आहे.
डेहराडूनचे राष्ट्रीय इंडियन मिलिटरी काॅलेज आणि औरंगाबादेतील सैनिक सेवापूर्व शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी सैन्यात अधिकारी करण्याचे काम कर्नल परब यांनी निवृत्तीनंतर केले. पुढे प्रवरा येथील पद्मश्री विखे पाटील संस्थेवरही त्यांनी काही काळ काम केले. पत्नी गीता यांच्या आग्रहावरून २००८ मध्ये नगरमध्ये दाेन एकर जमीन घेऊन त्यांनी शाळा काढली. आयसीएसई अभ्यासक्रमाच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या या शाळेत सध्या १८६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पत्नी गीता व मुलगा रिकी या शाळेचे व्यवस्थापन बघतात. वास्तविक नगर भागात कुठले नातेगोते नाही, परंतु या परिसरातील गरज लक्षात घेऊन परब यांनी येथे शाळा काढली आहे.
सेनादलाच्या संस्थांतून घडवले हजारो विद्यार्थी : परब यांच्या घरात लष्करी सेवेचा वारसा आहे. आजोबा सखाराम परब पहिल्या, तर वडील हरिश्चंद्र दुसऱ्या महायुद्धात सहभागी होते. हरिश्चंद्र हे गोरखा रेजिमेंटमधील पहिले भारतीय कमांडिंग अधिकारी होते. त्यामुळे कर्नल परब आपसूकच लष्करी सेवेकडे आकर्षिले गेले. लष्कराच्या डेहराडून येथील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजमध्ये (आरआयएमसी) १९९० ते १९९७ या काळात कर्नल परब प्रमुख होते. आठवी ते १२ वीपर्यंतचे देशभरातून फक्त २५ विद्यार्थीच या काॅलेजात घेतले जातात. पुण्याच्या खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीसाठी येथे या मुलांची तयारी करून घेतली जाते. पुढे २००० मध्ये परब सैन्यातून निवृत्त झाले. सैन्यात मराठी टक्का वाढावा म्हणून औरंगाबादेतील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत २००५ पर्यंत ते अत्यल्प वेतनावर संचालक म्हणून राहिले.
एसपीआयमधील त्यांचा काळ सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. या काळात सव्वाशेहून अधिक विद्यार्थी एनडीएमध्ये दाखल झाले. पुढे प्रवरा येथील संस्थेवर ते होते.
परब यांच्या घरात रोज फुलते गोकुळ दररोज सायंकाळी आणि रविवारी दिवसभर कर्नल परब यांच्या घरात गोकूळ फुललेेले असते. बालगोपाळांचा थवा घरभर विखुरलेला असताे. ओटा, दार, बैठकीची खोली, डायनिंग हाॅल, बेडरूम असा सर्वत्र बच्चे कंपनीचा वावर असतो. अभ्यासही सुरू असतो. स्वत: कर्नल परब, गीता आणि मुलगा रिकी मुलांना मार्गदर्शन करतात.
सैन्यासाठीच शिक्षण नव्हे, तर मुले इंग्रजीत निष्णात व्हावीत
नातेवाईक नसलेल्या ठिकाणी शाळा सुरू करणे जिकिरीचे होते. पण मराठी तरुण इंग्रजीत निष्णात व्हावेत हे ध्येय ठेवून अर्धनिवासी शाळा काढली. केवळ सैन्यासाठीच नव्हे, तर कल पाहून विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते. आठवीपासून समुपदेशन केले जाते.
- गीता परब, संचालिका, परब इंग्लिश स्कूल, नगर.