आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपसमोर बिकट आव्हान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंजाब आणि गोव्यामध्ये पराभवाची चव चाखलेल्या आम आदमी पार्टी म्हणजेच आपचा दिल्लीतील राजौरी गार्डन विधानसभा मतदारसंघात मोठा पराभव झाला आहे. दिल्लीत सध्या महापालिका निवडणुकांचा महासंग्राम चांगलाच तापलेला आहे. २३ एप्रिल रोजी तेथील दक्षिण, उत्तर आणि पूर्व दिल्ली या तीन महापालिकांच्या एकूण २७२ जागांसाठी मतदान होत आहे.  दिल्ली विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. या धामधुमीतच झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीला विशेष महत्त्व होते. त्यामुळे या मतदारसंघातील कौलाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. तेथे भाजप-अकाली दलाच्या उमेदवाराने काँग्रेस उमेदवाराचा १४ हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला. येथे आपचा उमेदवार नुसता तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला नाही तर तो अनामत रक्कमही वाचवू शकला नाही. 

पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी राजौरी गार्डनच्या आपचे आमदाराने राजीनामा दिल्यामुुळे ही निवडणूक घ्यावी लागली. पण त्यांचा तेथेही पराभव झाला. दिल्लीतील तीन महापालिकांच्या निवडणुकांमध्ये आधीच आपची कसोटी लागत आहे. त्यांच्या २१ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. या परिस्थितीत लागलेल्या या निकालामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमोरील आव्हान आणखी बिकट झाले आहे.  

पोटनिवडणुकीत आलेल्या अपयशाचे खापर आपने माजी आमदार जरनैल सिंह यांच्यावरच फोडले आहे. सिंह यांच्या राजीनाम्यामुळे लोक नाराज होते. ती नाराजी दूर करण्यात पक्षाला यश मिळाले नाही. त्यामुळे हा पराभव झाल्याचे म्हटले आहे.  देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील लोकसभा आणि त्यानंतरच्या निवडणुकांत मोदी- भाजपची लाट कायम सुरू होती. पण या लाटेला रोखण्याचे काम दिल्लीत केजरीवाल यांच्या आपने केले होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने ७० जागांच्या सभागृहात तब्बल ६७ जागा जिंकल्या होत्या. केवळ ३ जागांवर समाधान मानाव्या लागणाऱ्या भाजपसाठी हा मोठा धक्का होता. या निवडणुकीत काँग्रेस आणि अपक्षांना खातेही उघडता आले नव्हते. देशातील सगळ्यात मोठा विजय म्हणून या निवडणुकांकडे त्या वेळी पाहिले जात होते.  त्यानंतर इतक्या कमी दिवसांतील हा कौल नक्कीच विचार करायला लावणारा आहे.   

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपने दिल्लीतील जागा सत्ताधारी आपकडून खेचून आणल्यामुळे भाजपचे मनोधैर्य चांगलेच वाढले आहे. भाजपच्या चमकदार कामगिरीवर जनता समाधान व्यक्त करत आहे. विकास आणि सुशासनाच्या राजकारणावरच जनतेचा विश्वास आहे, असे भाजपकडून सांगण्यात येत आहे.  नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुका असो किंवा महाराष्ट्रातील महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमधील यशामुळे भाजप गोटात मोठा उत्साह आहे. सगळ्याच जागी आम्ही जिंकत आहोत, आता दिल्लीची बारी आहे, असे म्हणत भाजपच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे. 

दिल्ली विधानसभेचा पराभव जिव्हारी लागलेला असल्यामुळे भाजपने दिल्ली महापालिका ताब्यात घेण्यासाठी मोठी ताकद लावली आहे आणि  आधीच ताब्यात असलेली महापालिका पुन्हा ताब्यात ठेवण्यासाठी मोठी कंबर कसली आहे. ताज्या निकालाकडे भाजपच्या सध्या सुरू असलेल्या प्रचार यंत्रणेला दिलेला कौल म्हणून पाहिले जात आहे.  

हे यश म्हणजे एकीकडे भाजपच्या प्रचार यंत्रणेचा आणि लोकांत विश्वास निर्माण करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून पाहिले जात असले तरी केजरीवाल यांच्या आपमुळे दिल्लीकरांचा जो मोठा भ्रमनिरास झाला त्याचाही मोठा परिणाम आहे हे नाकारता येत नाही. देशात मोदी सरकारच्या विरोधात कायम भूमिका घेणारे आप आणि केजरीवाल यांच्याकडे मोदी टीकेशिवाय कोणताही ठोस कार्यक्रम दिसला नाही.  
 
राजकारणाचे शुद्धीकरण करण्यासाठीच आपण मैदानात उतरलो आहोत, असे भासवत कारकीर्द सुरू करणाऱ्या केजरीवालांनी दिल्लीकरांना भुरळ घालत सत्ता तर मिळवली; पण ती चालवताना भ्रष्ट, गुंड, दलाल आणि  वादग्रस्त मंडळींच्या मुक्त वावराला वाव दिला.  निवडणुकांच्या  वेळी दिलेल्या अाश्वासनांपैकी एकाचीही पूर्तता केली नाही. कोणतेही कर्तृत्व सिद्ध न करता इतर राज्यांत निवडणुका लढवण्याचा धडाका त्यांनी सुरू ठेवला.  लोकपालाचा जयघोष करत जन्माला आलेल्या आपचा कारभार आजच्या राजकारणात ‘जोकपाल’ म्हणून ओळखला जाऊ लागला. राजकारण हे गांभीर्याने करण्याएेवजी गमतीजमतीने करण्याच्या वृत्तीमुळे केजरीवालांनी आधीच हसे करून घेतले आहे, अशी टीका होत असताना एका पोटनिवडणुकीत झालेला पराभव  आपचे डोळे उघडणारा आहे.
 
- सचिन काटे, कार्यकारी संपादक, अकोला
बातम्या आणखी आहेत...