आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजमावण्याचे दिवस...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महापालिका हे मोठे अजब संस्थान आहे. इथे उघड मैत्री असणारे मित्रच असतील याची खात्री देता येत नाही, तर जे शत्रू आहेत ते शत्रू असतील याचीही खात्री कुणी देत नाही. लोकप्रतिनिधी असोत की अधिकारी... यांचे एक विश्व इथे काम करत असते. बऱ्याचदा ही दोन्ही वर्तुळे एवढी एकरूप होतात की दोघेही सारखेच वाटायला लागतात. पण मनपाचा सुपर बाॅस म्हणजे आयुक्त कसा असतो त्यावर सारा खेळ अवलंबून असतो. गेल्या वर्षभरात मनपाच्या वाट्याला तिसरे आयुक्त आले आहेत. या मनपाची निवडणूक झाल्यावर तत्कालीन आयुक्त प्रकाश महाजन यांचे पदाधिकारी नगरसेवक यांच्याशी पहिल्या दिवसापासून जमले नाही. ही दरी दिवसागणिक वाढत गेली. मग लोकांची कामे होणे दूरच, वैयक्तिक हेव्यादाव्यातच सात महिने कसे गेले कळाले नाही. यात नावडत्या पदाधिकाऱ्यांशी संघर्ष करण्याच्या तयारीने काही अधिकारीही मैदानात उतरले होते. प्रकरण चिघळत थेट महाजनांवरील अविश्वास ठरावापर्यंत पोहोचले. महाजन एकदाचे गेले, पण तोपर्यंत ना मनपाचे बजेट फायनल झाले होते ना काही हजारांचे एखादे विकासकाम सुरू झाले होते. एकमेकांची ताकद आजमावण्यात सारा वेळ गेला आणि शहराच्या हाती काही लागले नाही, फक्त पदाधिकारी नगरसेवक तेवढे जिंकले.

नंतर आयुक्तपदी आलेल्या सुनील केंद्रेकरांच्या बाबतीत मात्र वेगळेच झाले. तेथे आयुक्तांना आजमावून पाहण्याची संधीच नगरसेवक पदाधिकाऱ्यांना मिळाली नाही. केंद्रेकरांच्या कामाच्या धडाक्यापुढे साऱ्यांच्याच तलवारी आपोआप म्यान झाल्या. केंद्रेकरांसारख्या कडक अधिकाऱ्याने येथे येऊ नये म्हणून त्यांना विनवायला गेलेल्या अधिकाऱ्यांची सुरुवातीलाच चंपी करीत त्यांनी आपला अजेंडा स्पष्ट केला होता. शिवाय सत्ताधारी असो की विरोधी पक्षाचा.. काम महत्त्वाचे असेल तर कुणाचीही पर्वा करता ते त्यांनी केले. परिणामी गेल्या तीन महिन्यांत पदाधिकारी नगरसेवकांनी नव्हे, तर आयुक्तांनीच मनपा चालवली उत्तम चालवली.

आता नवीन आयुक्त ओमप्रकाश बकोरिया रुजू झाले आहेत. पुण्यातल्या त्यांच्या धडाकेबाज कामांची कीर्ती त्यांच्या आधी येथे पोहोचली. केंद्रेकरांची जनमानसातील प्रतिमा पाहता त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांबाबत नगरसेवक पदाधिकारी नाराज होते, पण त्यांची बोलायची टाप नव्हती. खास करून नगरसेवकांसाठी अघोषित निधीच असलेल्या एवन रेटलिस्टच्या फुटकळ कामांच्या बाबतीत. केंद्रेकरांनी खुर्चीत बसल्या बसल्या पहिल्यांदा हे दुकान बंद केले. या कामांवरच गुजराण असलेल्या अनेकांना हा निर्णय नकोसा होता. आयुक्त बदलले आहेत, आता किमान हा निर्णय बदलावा यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्रेकरांनी एवन रेटलिस्ट बंदचा निर्णय घेण्याआधी केलेल्या कामांच्या बिलावरून हा विषय पुन्हा चर्चेत आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. रोज कोणी ना कोणी पदाधिकारी नगरसेवक आयुक्तांना भेटून येत आहेत. बकोरियांची ऐकलेली कीर्ती भेटून आलेले अनुभव याचा ताळा-पडताळा मांडला जात आहे. आयुक्तही सध्या मनपाचा सांगोपांग अभ्यास करण्यात मग्न आहेत. बैठकांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना जोखणे भेटींतून नगरसेवक-पदाधिकाऱ्यांना जोखणे यातून आयुक्त मनपाच्या राजकारणाची नस समजून घेत आहेत. या सगळ्या कामांत त्यांनी आपण केंद्रेकरांचे मार्गदर्शन घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. लोकप्रतिनिधींची राजकीय गणिते असतात. शिवसेनेला समांतरचे दुखणे सावधपणे हाताळायचे आहे, तर भाजपला आपला ठसा उमटवण्यासाठी जास्तीत जास्त श्रेयाची कामे करायची आहेत. तिकडे एमआयएमलाही आपली ताकद दाखवून द्यायची आहेत. असे असताना शहराच्या प्रश्नांची माहिती करून घेण्यात आयुक्त बिझी आहेत. कचरा साफसफाई, वसुली हे विषय टार्गेटवर घेत त्यांनी शहराच्या बऱ्याचशा भागांना भेटीही दिल्या. नागरिकांनाही भेटत आहेत. तेही या शहराची नाडी चाचपून पाहत आहेत. सध्या महापालिकेत असे आजमावण्याचे दिवस आहेत.
जाता जाता
गुरुवारीसकाळी आयुक्त बकोरिया शहरातील दरवाजे बीबी का मकबरा परिसरात पाहणीवर होते. पाणचक्कीजवळ ते आले तेव्हा शिवसेनेच्या एका दिग्गज नगरसेवकाने त्यांचे स्वागत केले. त्यांना दुरून पाहताच आयुक्तांनी या नगरसेवक महोदयांना मी इथे आल्याचे इतक्या लवकर समजते कसे, असा सवाल केला. अधिकारी लोकप्रतिनिधींची दोन वेगवेगळी वर्तुळे अशी कोठेही एकत्र येतात.