आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्षक : सुन्न करणारा अनुभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पडदा उघडल्यानंतर पहिल्याच सेकंदापासून ते अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखायला लावेल आणि पडदा पडल्यावर त्यातील अाशय, विषय आणि मांडणीच्या शैलीवर किमान दोन-तीन वेळा विचार करायला भाग पाडेल, अशा नाट्यकृती दुर्मिळच. एकांकिकांचा कालावधी कमी असल्याने अशा गोळीबंद सादरीकरणाची शक्यता त्यात जास्त असते. तरी ती प्रत्येक संहितेत साधली जातेच असे नाही. अनेक एकांकिकांचा प्रारंभ आणि शेवट जोरकस असतो; पण मधले काही प्रसंग तणाव निवळून टाकणारे असतात. सध्या अनेक राज्य नाट्य स्पर्धांमध्ये क्रमांक पटकावणाऱ्या भक्षक एकांकिकेत विलक्षण तणाव आणि वेग आहे. प्रत्येक वाक्य, एकूण एक हालचाली विषयाला आणखी खोलवर घेऊन जाणाऱ्या अन् सुन्न करत अर्थ प्राप्त करून देणाऱ्या आहेत.

दोन किंवा तीन अंकी नाटक, दीर्घांक आणि एकांकिका अशा तीन प्रकारांत नाट्यानुभव घेता येतो. अनेक वर्ष दोन अंकी नाटक कौटुंबिक, विनोदात आणि दिवाणखान्यात फिरत असताना एकांकिकांनी अक्षरश: जागतिक पातळीवरच्या मुद्द्यांना हात घातला. त्यांची कसदार मांडणीही केली. प्रश्नाला थेट भिडणारा, समाजमनाला भेडसावणारा, आक्रमक पद्धतीने मांडला जाणारा विषय ही स्पर्धात्मक एकांकिकेची वैशिष्ट्ये. अर्थात एकांकिका म्हणजे फक्त स्पर्धा असेच समीकरण असल्याने स्पर्धेेच्या पलीकडे त्यांचे सादरीकरण अपवादात्मक स्थितीतच होते. त्या वेळीही त्या एकांकिकेतील ताकद लक्षात आल्याशिवाय राहत नाही. स्पर्धेच्या मंचापलीकडे अवतरित होणारी एकांकिका पकडून, जखडून ठेवणारी असते. विचार करण्यास भाग पाडणारीच असते. त्यात जर स्पर्धांमध्ये यश मिळवलेली असेल तर त्यातील अस्सलपणा अधिकच उजळदार असतो. रविवारी प्रा. कुमार देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त तापडिया नाट्यमंदिरात झालेल्या ‘भक्षक’ या रावसाहेब गजमल लिखित, दिग्दर्शित एकांकिकेने असाच अनुभव रसिकांना मिळवून दिला.

शहरीकरणामुळे जंगलांवर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे बिबटे, वाघ शहरात येऊ लागले आहेत आणि माणूस नावाचा क्रूर प्राणी शहरातही त्यांच्यावर हल्ले करत आहे. असे अनेक प्रसंग अलीकडच्या काळात वारंवार घडत आहेत. जिवाच्या भयाने नागरी वस्तीत घुसणाऱ्या प्राण्यांना भक्षक म्हटले जात आहे; पण वस्तुस्थिती काय आहे? याबद्दल गजमल यांनी ‘भक्षक’मध्ये सुसंस्कृत मनाच्या आरपार जाईल, असे टोकदार भाष्य ‘तुम्ही (शहरातील लोक) जंगल नष्ट करत चालतात अन् तिथले प्राणी आमच्या वस्त्यात येऊ लागलेत.’ असे दोनच वाक्यांत स्पष्ट केले आहे. जंगल विरुद्ध माणूस आणि शहरी माणूस विरुद्ध ग्रामीण माणूस असा दुहेरी संघर्ष त्यांनी मांडला आहे. शहराजवळच्या एका वस्तीत बिबट्या शिरतो. त्यापासून बचाव करण्यासाठी गावकरी मंडळी त्याच्यावर हल्ला करण्याचे ठरवतात. मोठी शोध मोहीम राबवतात, पण बिबट्या त्यांच्या तावडीतून निसटून वस्तीत पोहोचतो. तिथे नजरचुकीने एक बाळ राहिलेले असते. बिबट्या त्याच्याजवळ पोहोचतो, पण बाळाला काहीही करत नाही. त्याला शोधणारी माणसे मात्र त्याला चहुबाजूंनी वेढा घालतात अन्् त्याचा खात्मा करतात. एक संकट टळले असे वाटत असतानाच आणखी एका बिबट्याची गुरगुर कानावर पडू लागते. ती सुरू असतानाच रंगमंचावर पडदा पडू लागतो.
मात्र, विचारांचे पडदे उघडले जातात. आधीच म्हटल्याप्रमाणे एका ओळीचा विषय गजमल यांनी ज्या ताकदीने लेखणीत उतरवला, त्यापेक्षाही जास्त परिणामकारकरीत्या दिग्दर्शन केले आहे. कथानकाला वेग देताना त्यात शब्द कमी आणि हालचाली वेगवान असे तंत्र त्यांनी ठेवले. प्रत्येक व्यक्तिरेखा बोलकी केली. केवळ बोलकीच केली नाही, तर त्याच्या चेहऱ्यावरील रेष न् रेष सभागृहातील प्रत्येक प्रेक्षकाला लक्षात येईल, इतपत मेहनत करून घेतली आहे. संगीत, प्रकाश योजना भक्षकमध्ये एखाद्या भूमिकेसारख्या आहेत. त्यामागेही दिग्दर्शकाची कल्पकताच आहे. रावसाहेब यांचे आणखी एक कौतुक म्हणजे त्यांनी बिबट्याही साकारला. एकही संवाद नाही. केवळ चेहऱ्यावरील भाव, हालचालींमधून त्यांनी काळजाचा थरकाप करणारा अन्् अखेरच्या क्षणाला काळीज थरथरून टाकणारा बिबट्या जिवंत केला. फक्त रात्रीच्या वेळेस बिबट्याचा शोध घेत असणाऱ्या गावकऱ्यांच्या हातात विजेरी (टॉर्च) दिली पाहिजे. रावसाहेब यांना पुढील सादरीकरणात तेवढा बदल करता येईल. रत्नदीप वावले (अप्पा), अर्जुन टाकरस (बापू), बाळू बटुले (परभ्या), अभिजित वाघमारे (बाब्या), चंद्रकांत हिवाळे (गोप्या), प्रवीण गायकवाड (नाम्या), नारायण पवार (सख्या), भाग्यश्री हिरादेवे (वहिनी) हे सारे कलावंत खरेखुरे गावकरीच वाटत होते, एवढी त्यांची भूमिकेतील एकरूपता होती. रामेश्वर देवरेंचे नेपथ्य, कविता दिवेकरांची रंगभूषा, असलम शेखची वेशभूषा संहितेला उंचीवर नेणारी. चेतन ढवळे यांची प्रकाशयोजना, अनिल बडेंचे संगीत अतिशय परिमाणकारक. गेल्या काही वर्षांत मराठवाड्यात नवे लेखक, दिग्दर्शक आणि कलावंत उदयास येत आहेत. त्यांच्याकडून अपेक्षा वाढत आहेत. त्याचे ओझे बाळगता त्यांनी वाटचाल सुरूच ठेवावी. त्यातूनच मराठवाड्यातील रंगभूमीच्या यशाचा आलेख उंचावत जाणार आहे.