आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१५ ऑगस्ट : काळीज फाडणारा अनुभव ( श्रीकांत सराफ )

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दूर कुठल्या तरी खेडेगावातील जिल्हा परिषदेची शाळा सुटलीय. तिच्यातून बाहेर पडणारा निरागस चेहऱ्याचा पोरगा घरी पोहोचतो. तेव्हा त्याची आई दारातच उभी असते. मुलगा तिला म्हणतो, आई...१५ ऑगस्ट जवळ आलाय. नवा ड्रेस घ्यायला सांगितलंय शाळेतून. हा प्रसंग पडद्यावर पाहिल्यानंतर कुठल्यातरी शालेय गणवेशाचा विषय असावा. त्याला गरिबी किंवा फार झाले तर गावातील संघर्षाची किनार असेल, अशी कल्पना तुम्ही करू लागता आणि पुढील काही क्षणातच तुमचे सर्व अंदाज, कल्पना चुकत जातात. एकापाठोपाठ एक प्रसंग धडाधड तुमच्या हृदयावर, मनावर, विवेक बुद्धीवर आक्रमण करू लागतात. सतरा - अठरा मिनिटांनंतर बधिरावस्था येते. त्यातून बाहेर पडल्यावर ‘खरंच भारत देश स्वतंत्र झाला आहे का? आपण १५ ऑगस्ट का साजरा करायचा? भारतातील सर्व लोक सुखी नसतील तर आपल्या सुखाच्या कल्पनांना काही अर्थ आहे का? आपल्याला खरंच गरिबांची, सामाजिक उतरंडीत अगदी खालच्या तळाला राहणाऱ्यांची जाणीव आहे का? त्यांच्यासाठी आपण काहीच का करत नाही?’ असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. कन्हैयाकुमारला ज्या समस्यांपासून आझादी हवी आहे. ते हेच तर प्रश्न असावेत, असेही वाटून जाते. भारतीय समाजापुढे जात, धर्मातील संघर्षाचे प्रश्न तर आहेतच. पण काही जणांचे प्रश्न जात, धर्म, पंथाच्या पलीकडील आणि कमालीच्या गुंतागुंतीचे आहेत. हे काहीजण आपल्या माणुसकीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतात. त्यातील एका समाजघटकाच्या वास्तवाची त्यांनी मांडणी केली आहे. मन सुन्न करणारा हा अनुभव रसिकांसमोर तरुण पिढीतील प्रतिभावान दिग्दर्शक अनिलकुमार साळवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १५ ऑगस्ट या लघुपटातून मांडला आहे. या लघुपटाची लॉस एंजलिसमध्ये हाेणाऱ्या लघुपट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यावरून त्याचा दर्जा स्पष्ट होत असला तरी पूर्ण आकलन होत नाही. प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने १५ ऑगस्ट पाहूनच तो घ्यावा, एवढी ताकद त्यात भरलेली आहे. एका वेश्येच्या मुलाची ही कहाणी प्रगतीचे, विकासाचे गोडवे गाणाऱ्यांना खणखणीत चपराक तर आहेच शिवाय दीन, दुबळ्या समाजासाठी काही करू इच्छिणाऱ्यांना दिशाही देते. त्यामुळे साळवे यांच्या निर्मिती आणि दिग्दर्शकीय दृष्टीचे मूल्य अधिक आहे. त्यांनी प्रत्येक प्रसंग टोकदार, वेगवान केला आहे. यात कॅमेरा एखाद्या जिवंत व्यक्तिरेखेसारखा दर्शकासोबत राहतो. खोलवर रुतून बसणारा आणि काळीज फाडून टाकणारा विषय लघुपटात मांडणे, हेच खरे आव्हान होते. ते त्यांनी केवळ समर्थपणे पेललेच नाही तर त्यापुढे नेऊन ठेवले आहे.
देवगिरी महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागप्रमुखपदाची जबाबदारी सांभाळणारे साळवे स्वत: संघर्षाच्या पर्वातून चालत आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जीवन, त्यात राहणाऱ्या प्रत्येकाची लढाई त्यांना जवळून परिचित आहे. बीड जिल्ह्यातील माजलगावसारख्या दुर्गम भागात कष्टकरी कुटुंबात जन्म झालेले साळवे यांनी वयाच्या १२ व्या वर्षापासून नाट्यलेखनाला प्रारंभ केला. एकीकडे रंगभूमीसाठी योगदान देत असताना पोटापाण्यासाठी बांधकामांवर मिस्त्री म्हणूनही काम केले. २००० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात प्रवेश घेतल्यावर त्यांच्यातील प्रतिभेला आणखी वाव मिळाला. आम्ही बंदिस्त पाखरे, मृत्यूच्या छायेत, गांधीजींचा चष्मा हरवला आहे, अघटित, ग्लोबल आडगाव, शांतता दंगल चालू आहे आदी ४० एकांकिका, कथा खैरलांजी, ओयासिस, उद्ध्वस्त, दिल्या घरी सुखी राहा ही नाटकेही त्यांनी लिहिली. १५ ऑगस्टपूर्वी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या शिरमी या लघुपटालाही अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. या साऱ्या वाटचालीत त्यांच्या गाठीला ग्रामीण भागातील जीवनाचा अनुभव होता. तोच त्यांनी नाटक, एकांकिकांच्या माध्यमातून मांडला. रंगमंचासोबत लघु चित्रपट हेही तेवढेच प्रभावी आणि अधिक व्यापक माध्यम असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी त्याकडेही लक्ष दिले. नवख्या पण गुणवंत कलावंतांना एकत्र करत गेवराई (जि. बीड) येथे चार दिवस चित्रीकरण करून १५ ऑगस्टची निर्मिती केली. साळवेंपासून सारेच कलावंत, तंत्रज्ञ विषय, आशयाला मुळापासून भिडलेले असल्याने लघुपट कमालीचा प्रभावी झाला आहे. यात विशाखा शिरवाडकर, राहुल कांबळे, शिवकांता सुतार, प्रदीप सलगरकर, सद्दाम शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांनी अभिनयात केलेली कमाल, व्यक्तिरेखांमध्ये ओतलेला जीव पडद्यावर पाहिलाच पाहिजे, असा आहे. शरद शिंदे यांचे कॅमेरा संकलन उत्तम आहे. सिद्धार्थ तायडे, नीरज बोरसे, सुजित देठे, रामेश्वर झिंजुर्डे यांनी दिग्दर्शनाला साहाय्य केले आहे. रवी बारवाल, मंगेश तुसे, युवराज साळवे यांनी प्रकाशयोजनात कल्पकता दाखवली आहे. बद्रीनाथ कुबेर, विवेक खराटे, विजय ठोंबरे, शुभम गरुड, विक्रम त्रिभुवन आशिष कांबळे आदींचेही योगदान महत्त्वाचे ठरले आहे.
बातम्या आणखी आहेत...