आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढोलवादनाचा आनंदच, आता मेळ्यांकडे वळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या आठवड्यात महापालिकेचे पदाधिकारी आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या कार्यपद्धतीविरुद्ध, तर खड्ड्यांनी त्रस्त झालेले तमाम औरंगाबादकर नगरसेवकांविरुद्ध ढोल वाजवण्यात मग्न असताना प्रोझोन मॉलच्या हिरवळीवर खरेखुरे आनंददायी ढोलवादन सुरू होते. जिल्हा गणेश महासंघ आणि ‘दिव्य मराठी’तर्फे आयोजित ढोल पथकांच्या स्पर्धेत या अस्सल लोकवाद्याचा गगनभेदी आवाज ऐकण्यास मिळाला. गणपती बाप्पा मोरया, जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा देत आबालवृद्ध धुंदावून गेले होते. १९९० पर्यंत मेळे हेच गणेशोत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य होते. त्यानंतर टीव्हीचा उदय झाल्यावर मेळे झपाट्याने लयास गेले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सादर होणारी विनोदी नाटके संपली. संगीत मैफली, ऑर्केस्ट्राचे आयोजन विरळ होत गेले. त्यामुळे कलावंतांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. विशेषत: वाद्य वादन क्षेत्रात काम करणाऱ्यांना गणेशोत्सवात आपण काय करावे, असे वाटत होते. त्यातील पहिली वाट ढोल वादनाने निर्माण करून दिल्याचे दिसते. शनिवारी झालेल्या स्पर्धेत सहभागी झालेले संघ आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहिला तर ही वाट पुढील काळात प्रशस्त होईल, असे वाटते. पतित पावन, मोरया, बाल गजानन, विघ्नहर्ता आदी मंडळांचे सादरीकरण चकित करणारे होते. अक्षरश: व्यावसायिक संघांना लाजवेल, अशी त्यांची कामगिरी होती. त्यांनी घेतलेली मेहनत त्यांच्या ठेक्यातून लक्षात येत होती. गणेश महासंघाचे अध्यक्ष अभिजित देशमुख, संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार आणि त्यांच्या तमाम सहकाऱ्यांनी अशी देखणी आणि कलावंतांना वाव देणारी स्पर्धा आयोजित केली. त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
ढोल हे पुरातन भारतीय चर्मवाद्य. ऐतिहासिक काळातही त्याचा स्वर घुमत होता. उत्तर भारतात ढोल वादनाची मोठी परंपरा असल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्रात धनगरी ढोलही अनेक शतकांपासून वादक, रसिकांना आकर्षित करत आले आहेत. वीर रस निर्माण करण्याची शक्ती ढोलाच्या आवाजात असते. ऱ्हिदम आणि आवाज यांचा उत्कृष्ट संगम झाला की ढोलाचा खरा आनंद मिळतो. तो परवाच्या स्पर्धेत हजारो रसिकांना मिळाला. काही पथकांनी वादनात क्रिएटिव्हिटीही दाखवून दिली. विशेषत: ढोलकी आणि शंखाचा प्रयोग दाद देण्यासारखा होता. ढोल वादनात कमालीची ताकद लागते. खांदे, मनगटांची पूर्ण शक्ती पणाला लावावी लागते. अनेक वादक मैदान, पटांगणात फिरत फिरत वादन करत असतात. तेव्हा त्यांचे कौशल्य टिपेला पोहोचल्याचे लक्षात येते. स्पर्धेत असे वादक मोठ्या संख्येने होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक ढोलपथकात युवतींची संख्या लक्षणीय होती. त्या युवकांच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्यापेक्षा काकणभर जास्तच वादनात दंग झालेल्या होत्या. कित्येकजणींची वादनावर मजबूत पकड होती. शढोल पथकांच्या स्पर्धेत भगवा झेंडा उंचावून ठेक्यावर नृत्याचा ताल धरला जातो. हे काम तुलनेने कमी महत्त्वाचे असले तरी सर्वाधिक लक्षवेधी असते. त्यातही औरंगाबादकर तरुणाई उत्साहाने सहभागी झाली होती, हे महत्त्वाचे. आणि सर्वात बहार आणली ती चिमुकल्या वादकांनी. त्यांनी ताशांवर अशी काही हुकूमत दाखवून दिली की सारेच खुश होऊन गेले.
एकेकाळी तोंडाला रंग लावून रंगमंचावर जाणे, नाटकात काम करणे, ढोलकी वाजवणे, ढोल गळ्यात घालणे म्हणजे घराण्याच्या तोंडाला काळे फासणे असे मानले जात होते. ढोल, ताशा वाजविणे हीन दर्जाचे म्हटले जात होते. आता परिस्थिती बदलली आहे. मनोरंजनाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळत असल्याने मुले स्वत:ची कला प्रांताची आवड जोपासत आहेत. आणि स्वत: आनंद मिळवत इतरांनाही मिळवून देत आहेत. ढोल वादनासारख्या पारंपरिक लोककलेला ऊर्जितावस्था देण्याचे मोठे काम गणेश महासंघ करत आहे. त्यात पुढील काळात सातत्य ठेवले तर कलावंत मंडळी त्यांचे आभारी राहतील. येणाऱ्या वर्षांमध्ये महासंघाने मेळ्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ठोस पावले उचलली तर बहार येईल. कारण नाट्यछटा, प्रहसन, समूह गायन, वाद्य वादन अशा अनेक कलाप्रवाहांना मेळे सामावून घेत असतात. त्यांचे सादरीकरण पुन्हा होऊ लागले तर शेकडो कलावंतांना त्यांची कला जिवंतपणे सादर करण्याचा आनंद मिळू शकेल.
बातम्या आणखी आहेत...