आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉकिंग पॉईंट - असाच चालवाल का शहराचा कारभार?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑक्टोबरमध्ये झालेली विधानसभेची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रदीर्घ कारकीर्दीची अखेर करणार, हे निकालाआधीच स्पष्ट झाले होते. शिवसेना-भाजपमधील फाटाफूट हा त्या तुलनेत बऱ्यापैकी चर्चेचा विषय होता. निकालानंतर काय होणार, कोण कोणाचा पाठिंबा घेणार? याबद्दल राजकीय विश्लेषक, तज्ज्ञ मते मांडत होते. प्रत्यक्षात निकालाच्या दिवशी त्यांना एक नवाच विषय मिळाला. तो होता औरंगाबाद मध्य मतदारसंघातील एमआयएमचा विजय. वर्षभरापूर्वी संवेदनशील पत्रकार म्हणून ओळख असलेले, सर्वधर्मसमभावासाठी लढणारे इम्तियाज जलील एकगठ्ठा मुस्लिमांच्या बळावर आमदार झाल्याचे कळताच हलकल्लोळ उडाला. मध्य औरंगाबादेतील अनेक रस्ते हिरव्या गुलालाने माखून गेले. हजारो तरुणांनी ढोल-ताशांच्या तालावर नृत्याचा ठेका धरला होता. इकडे टीव्ही चॅनलवर प्रत्येकाने आपापल्या आकलनानुसार त्याचे विश्लेषण केले. इम्तियाज यांचा विजय म्हणजे रझाकारीचा पुन्हा प्रवेश इथपासून ते आता महाराष्ट्रही एमआयएम काबीज करणार, जागोजागी एमआयएमचे बालेकिल्ले तयार होणार, मुस्लिम समाज आक्रमक होणार अन् ते हिंदूंवर चाल करून जाणार इथपर्यंत मते नोंदवण्यात आली होती. उच्चशिक्षित इम्तियाज यांनी विजयाचा हसतमुखाने स्वीकार करत या निकालाचा, जल्लोषाचा इतर कोणत्याही समाजाला त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची कडक शब्दांत सूचना केली होती. प्रचाराच्या काळातही त्यांनी अतिशय सभ्य शैलीत मतदारांशी संपर्क साधला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात मुस्लिम समाजात विशेषत: तरुणांमधील अनेक वर्षांपासूनचा असंतोष एमआयएमकडे वळवण्यावरच त्यांनी लक्ष केंद्रित केले होते. एवढेच नव्हे, तर प्रचारात कोणत्याही धर्माविरुद्ध जहरी वक्तव्ये करणार नाही, अशी हमी त्यांनी खासदार असदुद्दीन ओवेसी आणि आमदार अकबरोद्दीन ओवेसींकडून घेतली होती. हे सर्व पाहता एमआयएम पक्ष धर्माधिष्ठित, कडवट मूल्ये तिखट शब्दांत मांडणारा असला तरी तो औरंगाबादेत मवाळपंथी राहील. आमदार इम्तियाज मुस्लिम तरुणांना विधायकतेकडे वळवतील. त्यांच्यात औरंगाबादविषयी आणखी प्रेम जागृत करतील. कायद्याचे पालन करण्यात अग्रेसर ठेवतील, अशीच अपेक्षा होती. दुर्दैवाने ती मनपा निवडणुकीच्या तोंडावर पूर्णपणे फोल ठरली आहे. काही महिन्यांपूर्वी 'मुस्लिम सारे एक' असे म्हणणारेच एकमेकांच्या अंगावर नगरसेवकपदासाठी तिकीट मिळत नाही म्हणून तुटून पडत आहेत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये केवळ भांडणे, वादावादी, शाब्दिक चकमकी असतील तर ते समजू शकते. कारण राजकीय पक्ष म्हणजे हेवेदावे अपेक्षितच असतात. युतीमध्येही उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा होती. तिकीटवाटपात अन्याय झाल्याचे म्हणत युतीच्या कार्यकर्त्यांनीही बंडखोरी केली. मात्र, एमआयएमने सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. परस्परांना रक्तात माखवण्याचा आसुरी आनंद ते घेत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीला मुस्लिम समाजात बऱ्यापैकी जनाधार आहे. त्यामुळे त्यांच्यावरही एमआयएमचे हल्ले सुरू झाले आहेत. खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या साक्षीने हाणामारी करण्यापर्यंत त्यांची मजल पोहोचली आहे. हे सारे पाहून यांना निवडून का द्यावे? ते खरेच शहराचा तर सोडाच, मुस्लिमांच्या हिताचा कारभार करतील का? याचा गांभीर्याने विचार मुस्लिम समाजाला आताच करावा लागणार आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार इम्तियाज यांनी एमआयएममधील तिकिटांच्या स्पर्धेचे समर्थन केले. एवढी स्पर्धा म्हणजे पक्ष जिवंत असण्याचीच निशाणी आहे, असा दावा त्यांनी केला. मात्र, स्पर्धा म्हणजे विरोधकांचे, आप्तांचे रक्त सांडणे कसे असू शकते? सत्ता काबीज करण्याची भाषा करणाऱ्या पक्षाचा पाया रक्तरंजित कसा असू शकतो? या रक्तपाताचा शिवसेना-भाजपसोबत काँग्रेस, राष्ट्रवादीला थेट फायदा होणार, हेही आमदार महोदयांच्या लक्षात कसे येत नाही? सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या पक्षाला लागलेली गटबाजीची लागण पुढे घातक ठरणार आहे. त्यातून शहरातील कायदा-सुव्यवस्था कोलमडू शकते. त्याचे गंभीर परिणाम केवळ मुस्लिमांनाच नव्हे, तर इतर समाजालाही भोगावे लागतील. ओेवेसी तर शहराबाहेरचे आहेत. आपल्याला येथेच सर्व जाती-धर्मांसोबत राहायचे आहे याचे इम्तियाज त्यांचे सहकारी डॉ. गफ्फार कादरी, जावेद कुरेशी यांना जाणवण्याइतपत भान राहिले आहे का? की सत्ता मिळवण्याच्या धुंदीत त्यांच्या हेदेखील लक्षात राहिलेले नाही?