आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांगोंच्या लोकसभा उमेदवारीवर शिक्कामोर्तब- भाकप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-भाकपचे प्रदेश सचिव आणि झुंजार कामगार नेते डॉ. भालचंद्र कांगो यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव भाकपच्या जिल्हास्तरीय बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.

खोकडपुरा येथील पक्षाच्या कार्यालयात बुधवारी झालेल्या बैठकीस जिल्ह्याच्या सहा तालुक्यातील सर्व 71 जिल्हा सदस्य तसेच विशेष निमंत्रित अशोक जाधव, शिवाजी जंगले, गुलाम मोहंमद उपस्थित होते. ज्येष्ठ नेते व राज्य सचिव मंडळ सदस्य अँड. मनोहर टाकसाळ, शहर सचिव व माजी नगरसेवक अश्फाक सलामी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. त्यात जिल्हा सचिव प्रा. राम बाहेती यांनी डॉ. कांगो यांनी ही निवडणूक लढवणे कसे योग्य आहे, याची मांडणी केली. त्यावर दिवसभर चर्चा झाली. 40 सदस्यांनी त्यात सहभाग नोंदवला. त्यानंतर प्रस्ताव मंजूर करून तो सायंकाळी ई-मेलद्वारे मुंबईला राज्य कार्यकारिणीकडे पाठवला. 18, 19 जानेवारीला मुंबईतील बैठकीत तो मंजूर करून राष्ट्रीय कार्यकारिणीकडे पाठवला जाईल. कांगोंना पक्षादेश मान्य असल्याचे प्रा. बाहेती यांनी सांगितले. 15 ते 31 जानेवारीदरम्यान देशभरात महागाईविरोधी आंदोलन छेडले जाणार आहे. या वेळी भास्कर लहाने, कैलास कांबळे, अशोक जाधव, रावसाहेब निकम यांचीही उपस्थिती होती. शामराव जाधव यांनी आभार मानले.

विधानसभेचीही तयारी

आगामी विधानसभा निवडणुका लढण्याची तयारीही भाकपने केली आहे. त्यासाठी बैठकांचे आयोजन करून जिल्हा कार्यकारिणीकडे प्रस्ताव पाठवावेत, अशी सूचना शहर पदाधिकार्‍यांना करण्यात आली.