आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Coming Election Women Vote Play Important Role, Supriya Sule Remark

येत्या निवडणुकीत महिलांची मते निर्णायक, सुप्रिया सुळे यांचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - एकदा निर्णय घेतला की महिला मागे फिरत नाहीत. आमिषाला बळी पडत नाहीत. त्यांच्यात जागरूकता खूप वाढली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत महिलांची मते निर्णायक ठरणार असल्याचे राष्ट्रवादी युवती परिषदेच्या अध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. महिलांच्या एकगठ्ठा मतांचा अनुभव बिहारमध्ये नितीशकुमार यांनी घेतला आहे, अशीही आठवण त्यांनी करून दिली.


एमजीएम परिसरात आयोजित राष्ट्रवादी युवती मेळाव्याच्या निमित्ताने औरंगाबादेत आलेल्या सुळे यांनी ‘दिव्य मराठी’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. विविध क्षेत्रातील महिलांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. त्या म्हणाल्या, आरक्षणामुळे राजकारणात आलेल्या महिला कुशलपणे सत्ताही चालवत आहेत. मतदार म्हणूनही महिलांचे महत्व वाढत आहे. पुरुष मतदानाच्या आदल्या दिवशी आमिषांना बळी पडून निर्णय बदलतात. मात्र, महिलांचे निर्णय अतिशय ठाम असतात.


मानसिकता बदलत आहे; पण...
राजकारणातील महिलांविषयीची मानसिकता पूर्णपणे बदलली नाही. कारण, शिक्षण, आरोग्य, पाणी हे विषय येतात तेव्हा महिलांनो बोला, असे म्हटले जाते. तर ग्लोबल विषय पुरुषांचे आहेत, महिला काय बोलणार असा सूर असतो. आरोग्य, शिक्षण आणि पाणी हा पुरुषांचा प्रश्न नाही का, असेही सुळे म्हणाल्या. या वेळी गरवारे कम्युनिटी सेंटर बचत गटाच्या सुलभा जोशी, हिमगौरी कदम, शुभांगी भोसकर, माहेश्वरी मंडळाच्या नमिता बाहेती, अ‍ॅड.स्वाती शिऊरकर, विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निलेश राऊत, शहराध्यक्ष मुश्ताक अहमद, जिल्हाध्यक्ष सीमा थोरात आदींची उपस्थिती होती.


बांगड्यांचा टोमणा मारणे बंद करा
काही दिवसांपूर्वी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना बांगड्या पाठविण्यात आल्या. यावर नाराजी व्यक्त करत सुळे म्हणाल्या, आभूषण म्हणून महिला बांगड्या घालतात. मात्र, म्हणून आम्ही अबला आहोत, असे मुळीच नाही. त्यामुळे कुठल्याही विषयावर बांगड्या भरा, असे टोमणे मारणे आता समाजाने बंद करायला हवे.