आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Commercialization Of News Paper Is Sad Says Narendra Jadhav

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वृत्तपत्रांचे बाजारीकरण होणे दुर्दैवी- डॉ. नरेंद्र जाधव यांची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- अलीकडच्या काळात वृत्तपत्रांचे बाजारीकरण झाले आहे. जाहिरातींमध्ये बातम्या शोधाव्या लागतात. त्यामुळे जाहिरात आणि व्यवस्थापन विभागाचे प्राबल्य वाढून संपादकीय महत्त्व कमी झाले. ही दुर्दैवी बाब आहे, अशी खंत व्यक्त करून बातमी बातमीच्याच ठिकाणी असायला हवी, असे स्पष्ट मत राष्ट्रीय नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले.

सिडकोतील जगद्गुरू तुकोबाराय नाट्यगृहात आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या 39 व्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते. डॉ. जाधव म्हणाले, अलीकडच्या काळात वृत्तपत्रांमध्ये कमालीची स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे आपल्याकडे काय सनसनाटी आहे, यावर भर दिला जातो. तेथे तारतम्य पाळले जात नाही, परिणामी लगावबत्ती म्हणजेच सनसनाटी बातम्या दिल्या जातात. यामुळे नकारात्मकता वाढली आहे. मात्र, यामुळे देशाची प्रतिमा मलिन होते, याकडे दुर्लक्ष केले जाते. चांगल्या लोकांवरच देश चालतो आहे, याचेही भान राहिले नाही.

सुनीता नाईक यांची आर्थिक विवंचना लांच्छनास्पद : महालक्ष्मी नियतकालिकाच्या संपादिका थेट रस्त्यावर राहताना आढळून आल्या. पत्रकारांची अशी आर्थिक विवंचना महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासाठी लांच्छनास्पद आहे. देशातील अन्य नऊ राज्यांत जर पत्रकारांना निवृत्तिवेतन मिळत असेल तर ते येथे का मिळत नाही? त्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत आणि मी वैयक्तिक पातळीवर तसे करेन. दुसरीकडे पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठीही काही केले जात नाही. यात महाराष्ट्र सर्वात मागे आहे.

पत्रकारांना प्रशिक्षणाची गरज : तारतम्य समजण्यासाठी पत्रकारांना शिक्षण आणि प्रशिक्षणाची गरज असल्याचे डॉ. जाधव यांनी नमूद केले. ज्या विषयावर आपण प्रश्न विचारतोय, त्याचीच माहिती पत्रकारांकडे असत नाही, अशी टीकाही त्यांनी केली अन् त्यामुळेच मला ‘बाइट कल्चर’चा तिरस्कार असल्याचे ते म्हणाले. आकलनशक्ती मोठी असल्यास सनसनाटी होणार नाही.

मंदी येणार म्हणाल तर नक्की येईल : मंदी येणार, असे तुम्ही सातत्याने म्हणत राहिलात तर ती नक्कीच येईल. कारण मंदी येणार असे म्हटल्यानंतर मंदीत होणार्‍या गोष्टी केल्या जातात. खरेदी-विक्रीचे व्यवहार पुढे ढकलले जातात आणि मंदी येते. त्यामुळे सकारात्मकता महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदारांना पेन्शन कशासाठी? : महाराष्ट्रातील बहुतांश आमदार हे कोटींच्या गाड्यांमध्ये फिरतात, तरीही त्यांच्या निवृत्तिवेतनात अवघ्या 10 वर्षांत तीन वेळा गलेलठ्ठ वाढ कशासाठी केली जाते, असा सवाल एस. एम. देशमुख यांनी केला असून याविरोधात न्यायालयात याचिकाही दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. आमदार स्वत:साठी सर्वकाही करतात; पण पत्रकारांसाठी काहीही करत नाहीत. गेल्या तीन वर्षांत 290 पत्रकारांवर हल्ले झाले. मात्र, पत्रकार हल्लाविरोधी कायदा झाला नाही, असेही त्यांनी सांगितले. लहान वृत्तपत्रे तसेच पत्रकार संघटना मोडीत काढण्याचा डाव शासनाने रचला असल्याची टीका अंभोरे यांनी केली.