आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Commissioner Of Police Rajendra Singh Take Charge To Aurangabad

दबाव झुगारून काम करू ! नवनियुक्‍त पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह यांची ग्वाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मी 1992 मध्ये पैठणमध्ये होतो. त्यामुळे शहर संवेदनशील असल्याची जाणीव आहे. निवडणुकीच्या तोंडावर धार्मिक तेढ निर्माण करून राजकीय ईप्सित साध्य केले जाते हेही माहिती आहे. पण मी भारतीय संविधानाच्या निर्देशांप्रमाणेच कार्यवाही करणार. दबाव झुगारून काम करणार. ‘नो कॉम्प्रमाइज टू मेंटेन दी लॉ अँड ऑर्डर.!’ असा निर्धार नवे पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

नवे पोलिस आयुक्त सिंह हे इनोव्हा कारमधून आज सायंकाळी 4.55 वाजता पोलिस आयुक्तालयात आले. त्यानंतर पोलिस आयुक्त संजय कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारण्याची प्रक्रिया 4.55 ते 6.45 पर्यंत पार पाडली.

आयुक्तपदाची सूत्रे घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सिंह म्हणाले. ‘दोन दशकांपूर्वी या शहरात काम केल्यामुळे थोडीफार माहिती असली तरी आता ते खूप बदलले आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काय आव्हाने आहेत याचा पूर्णपणे अभ्यास करण्यात येईल. शहरातील पोलिस विभागाची उत्तमोत्तम सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यास प्राधान्य असेल. थेट नागरिकांनी आपल्याला दूरध्वनी करण्याची गरजच पडणार नाही, अशी आदर्श व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न राहील. याचा अर्थ आपण सर्वसामान्यांना ‘नॉट रिचेबल’ राहू असा होत नाही. अभ्यागतांना भेटू, लोकांशी संवाद साधू.!’ पोलिस ठाण्यात सर्व अडचणींचा निपटारा व्हावा, या मताचा मी आहे, असे ते म्हणाले. राजकीय हस्तक्षेप सहन करणार नाही, पण लोकप्रतिनिधींचा योग्य सन्मान राखू. दोन ते तीन दिवसांत ठाण्यांच्या प्रभारींची निवड केली जाईल. वाहतुकीसह सर्व व्यवस्थांचा अभ्यास करून कामाला प्रारंभ करू.

धार्मिक स्थळांबाबत नियमानुसार कारवाई
शहरातील 14 रस्त्यांच्या रुंदीकरणात अडथळा निर्माण करणार्‍या 41 धार्मिक स्थळांना पाडण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. 31 मेपर्यंत ही स्थळे पाडण्यासाठी मुदत आहे. यासंदर्भात आपण काय भूमिका घेणार आहात, असा सवाल प्रस्तुत प्रतिनिधीने सिंह यांना विचारला असता त्यांनी सावध पवित्रा घेतला. ते म्हणाले, ‘खंडपीठाने काय निर्णय दिला याची माहिती अद्याप मी घेतलेली नाही. लवकरच सहकार्‍यांशी चर्चा करू. खंडपीठाच्या निर्णयाचा अभ्यासही करावा लागेल.’ त्यानंतर नियमाप्रमाणे कार्यवाही करून धार्मिक स्थळांना पाडण्यासाठी दबाव झुगारून काम करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.