आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Commissioner Sent Back To The Mess After The Announcement; Scepter Trying To Drama Possession

गोंधळानंतर उपायुक्तांना परत पाठवण्याची घोषणा; राजदंड पळवल्याचे नाट्य रंगले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - तीन महिन्यांपूर्वी ज्या उपायुक्तांना परत पाठवण्याचा सर्वसाधारण सभेने निर्णय घेतला होता त्या उपायुक्त सुरेश पेडगावकर यांना आज तातडीने पदमुक्त करण्याचा निर्णय मनपा आयुक्तांनी सर्वसाधारण सभेत जाहीर केला. मात्र त्यासाठी सभागृहात सर्व सदस्यांकडून गोंधळ, राजदंड पळवणे आणि नंतर अँटी चेंबरमध्ये हमरीतुमरी एवढय़ा घडामोडी झाल्या. तब्बल दीड तास याच विषयावरून सदस्यांनी आयुक्तांना धारेवर धरले होते.

18 ऑक्टोबर रोजी सर्वसाधारण सभेने उपायुक्त सुरेश पेडगावकर यांना परत पाठवण्याचा निर्णय घेत त्यांना सभागृहातून काढून दिले होते, पण त्या निर्णयानंतर ते मनपात आजपर्यंत कार्यरत होते. त्यांच्याबाबत घेतलेल्या या प्रस्तावाबाबत शासनाने मनपाचे म्हणणे मागवले होते. ते पाठवून बराच काळ लोटला तरी पेडगावकर सर्वांच्या नाकावर टिच्चून तेथेच होते. आज अखेर तीन महिन्यांनंतर या विषयाचा स्फोट झाला. सर्वसाधारण सभा निर्णय घेते तो बंधनकारक असताना पेडगावकर यांना परत का पाठवले जात नाही, सर्वसाधारण सभेच्या निर्णयाची अंमलबजावणी करायला उशीर का होत आहे, असे प्रश्न समीर राजूरकर यांनी केले. अफसर खान, डॉ. जफर खान यांनीही त्यात सूर मिसळत पेडगावकरांना पाठीशी घालू नका, अशी मागणी केली.

इशारा आणि घोषणा : राजूरकर म्हणाले की, आयुक्तांनी त्यांना तत्काळ पदमुक्त करायला हवे होते. गेल्या अडीच महिन्यांत पेडगावकरांनी घेतलेले निर्णय ग्राहय़ धरणार का, असा कायदेशीर प्रश्न यामुळे निर्माण होत असल्याचे ते म्हणाले. राजू शिंदे यांनी आजच्या आज पेडगावकरांना पदमुक्त न केल्यास सभागृह चालू देणार नाही, असा इशारा दिला. पाठोपाठ शिंदे, अफसर खान, मिलिंद दाभाडे, अमित भुईगळ, राजूरकर आणि इतर नगरसेवक महापौरांच्या आसनासमोर गेले व त्यांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. संजय केणेकर यांनी तत्काळ निर्णय घेण्याची मागणी केली. त्यावर आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी पुढच्या आठवड्यात सचिवांना भेटून सभागृहाची भावना कळवून निर्णय घेण्याची विनंती करू, असे आश्वासन दिले. त्यांच्या विधानावर सदस्यांचे समाधान झाले नाही व ते पुन्हा महापौरांच्या आसनासमोर गेले. एकच गलका सुरू झाला. राजूरकर यांनी आम्ही तक्रार केल्यावर मनपाने सरकारला पत्र पाठवल्याचा आरोप केला तर मिलिंद दाभाडे यांनी महापौरांना उद्देशून पेडगावकरांना कार्यमुक्त करून सभागृहाचा सन्मान ठेवा, अशी सूचना केली. यानंतर एकच गोंधळ उडाला व घोषणा सुरू झाल्या आणि सभा पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली. पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर आयुक्त डॉ. कांबळे यांनी पेडगावकर यांना शासन निर्णयाच्या अधीन राहून पदमुक्त करीत असल्याचा निर्णय जाहीर केल्यावर नगरसेवक शांत झाले.

अँटी चेंबरमध्ये वादावादी

पाच मिनिटांसाठी तहकूब केलेले सभागृह तब्बल अर्धा तास तहकूब होते. या काळात अँटी चेंबरमध्ये महापौर आणि आयुक्तांवर नगरसेवक तुटून पडले. आताच्या आता निर्णय घेतलाच पाहिजे, अशी मागणी करीत त्यांनी वादावादी सुरू केली. या वादावादीत सर्वच पक्षांचे नगरसेवक एकीकडे आणि आयुक्त-महापौर एकीकडे असे चित्र पाहायला मिळाले. नगरसेवकांचे आक्रमक रूप पाहून अखेर तोडगा काढण्यात आला.
पदाधिकारी अस्वस्थ

पेडगावकर प्रकरणात तीन महिन्यांच्या ‘जैसे थे ’ परिस्थितीमागे बराच अर्थ असल्याचे बोलले जात असल्याने पदाधिकारी आज हा विषय आक्रमकपणे सुरू होताच अस्वस्थ झाले. महापौर, उपमहापौर अस्वस्थपणे गोंधळ पाहत होते तर स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेते यांची अवस्थाही फारशी वेगळी नव्हती.

प्री-जीबीनंतर हल्लाबोल

शिवसेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वसाधारण सभेआधी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक घेत त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. आयुक्त ऐकत नाहीत हे चित्र महागात पडेल, असे सांगत सदस्यांना आता आक्रमकपणे कामाला लागा नाही तर खरे नाही असे सांगत चांगलीच कानउघाडणी केली. त्यानंतरच सभागृहात आयुक्तांवर चहुबाजूंनी हल्लाबोल केला.