आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Communication News In Marathi, Brodband Connection, Telephone Dead

22 एटीएम, 500 ब्रॉडबँड कनेक्शन्स बंद; एक हजार टेलिफोन डेड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महानगरपालिकेने ज्योतीनगर परिसरात जलवाहिनीसाठी जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम केल्याने बीएसएनएल आणि खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या केबल तुटल्या. परिणामी एक हजाराहून अधिक टेलिफोन बंद पडले, 500 हून अधिक ब्रॉडबँड कनेक्शन्स बंद पडले तर इंटरनेटवर काम करणारी जवळपास 22 एटीएम केंद्रे बंद पडली. याशिवाय मार्च एंडिंगची धावपळ सुरू असताना काही बँकांची कामेही ठप्प झाली. दरम्यान, बीएसएनएलने जोडणीचे काम हाती घेतले असून सारी व्यवस्था पूर्ववत व्हायला किमान दोन ते तीन दिवस लागणार आहेत.


सहकारनगर ते ज्योतीनगर चौक या रस्त्याचे काम सुरू करण्याआधी जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू करण्यात आले. मनपाच्या पथकाने चक्क जेसीबी लावून खोदकाम सुरू केले आणि सगळ्या दूरसंचार व्यवस्थेचा बोजवारा उडाला. जेसीबीच्या खोदकामात बीएसएनएल आणि इतर कंपन्यांच्या केबल जागोजाग तुटल्या आणि ज्योतीनगर, सहकारनगर, दशमेशनगर उस्मानपुर्‍याचा काही भाग, स्टेट बँक कॉलनीचा काही परिसर या भागांतील दूरसंचार व्यवस्था कोलमडली. केबलच तुटल्यामुळे सर्वाधिक फटका बीएसएनएलला बसला आहे. या परिसरातील सुमारे एक हजार दूरध्वनी डेड झाले, तर 500 हून अधिक ग्राहकांची ब्रॉडबँड सेवा ठप्प झाली. या शिवाय 20 लीज लाइन बंद पडल्या आहेत.


बीएसएनएलकडून तातडीने दुरुस्ती सुरू
केबल तुटल्याने बीएसएनएल, रिलायन्स, टाटा आणि एअरटेल या दूरसंचार कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. या सर्वांना आता केबलच्या दुरुस्तीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. रिलायन्सने दोन महिन्यांपूर्वीच या भागात केबल टाकल्या होत्या. मनपाने त्या काल एका झटक्यात तोडून टाकल्या. बीएसएनएलने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले असून त्यांचे तंत्रज्ञ दिवसभर या कामाला जुंपले होते.

मनपाच्या चुकीमुळे बँका, एटीएमला फटका
मनपाने केलेल्या या तोडातोडीमुळे परिसरातील जवळपास 22 एटीएम केंद्रांचे कामकाज प्रभावित झाले आहे. एटीएम केंद्र आणि बँकांचे व्यवहार इंटरनेटच्या माध्यमातून होत असल्याने या प्रकारामुळे त्यावर खूपच परिणाम झाला. या परिसरात पाच बँकांच्या शाखा आहेत. तेथेही कामकाजावर परिणाम झाला आहे. सध्या बँकांत मार्च एंडिंगची धामधूम सुरू असताना हा प्रकार घडल्याने त्यांची व्यवस्था विस्कळीत झाली आहे.

मनपामुळे बीएसएनएलला 50 लाखांचा भुर्दंड
बीएसएनएलचे उपअभियंता आर. एस. गायकवाड यांनी सांगितले की, महानगरपालिकेने खोदकाम करण्यापूर्वी आम्हाला कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती. शिवाय आतापर्यंत यंत्राविना काम होत असल्याने केबलचे नुकसान व्हायचे नाही. पण जेसीबीमुळे अंदाधुंद तोडातोडी झाली. एकट्या बीएसएनएलचे 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दुरुस्ती आणि सेवा पूर्ववत करण्यासाठी काही ठिकाणी किमान तेवढाच खर्च येणार आहे. त्यामुळे मनपामुळे 50 लाखांचा फटका बीएसएनएलला बसला आहे.