आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जात अन् पैशाच्या बळावर लोकशाही संपवण्याचे प्रयत्न, सीताराम येचुरींचा केंद्रावर घणाघात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - देशात सर्वत्र उन्मादाचे वातावरण निर्माण केले जात आहे. धर्म, जात आणि पैशाचा वापर करून लोकशाही नष्ट करण्याचे प्रयत्न होत आहेत, अशा शब्दांत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव, खासदार सीताराम येचुरी यांनी केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रुपाने दिलेली सर्वात महत्वाची लोकशाही वाचवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन करताना बाबासाहेबांना आपण केवळ सामाजिक न्यायापुरते मर्यादित ठेवत आहोत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सव समारोपीय वर्षानिमित्त पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजित व्याख्यानमालेस शनिवारी प्रारंभ झाला. त्यात पहिले पुष्प गुंफताना येचुरी यांनी ‘सत्ताधारी पक्षाच्या वतीने भारतीय राजकारणाची होणारी वाताहत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर भूमिका मांडली. अध्यक्षस्थानी निवृत्त विभागीय आयुक्त कृष्णा भोगे होते. येचुरी म्हणाले की, १९२० मध्ये देशात तीन प्रवाह होते. त्यातील एक होता धार्मिक मुस्लिमांचा. दुसरा होता हिंदुत्वाचा आणि तिसरा होता समाजवादी, धर्मनिरपेक्षतेचा. त्यावेळीही या तिन्ही प्रवाहांत संघर्ष होता. स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे उलटून गेली तरी हा संघर्ष सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटनेतून लोकशाहीला स्वातंत्र्य, बंधुता, समतेची तीन मूलभूत तत्वे दिली.

या तत्वांवरच सत्ताधाऱ्यांकडून हल्ले सुरू आहेत. डॉ. आंबेडकरांना सामाजिक, आर्थिक लोकशाही अपेक्षित होती. ती करण्यासाठी त्यांनी व्यापक संविधान दिले. नेमके तेच सत्ताधाऱ्यांना मान्य नाही. कोणी काय खावे, कोणते कपडे परिधान करावे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य बाबासाहेबांनी दिले. पण आता सरकार कोणी काय खावे, कोणते कपडे वापरावेत, हे ठरवत आहे. २०१४ मध्ये जेव्हा मनमोहनसिंगाचे सरकार होते. तेव्हा एक टक्के लोकांकडे ४९ टक्के जीडीपी होता. आता एक टक्क्यांकडे ५८.४ टक्के जीडीपी आहे. अनुसूचित जातीसाठीची १७ कोटींची शिष्यवृत्ती या सरकारने बंद केली आहे. मणिपूर, गोव्यात ज्यांना सर्वाधिक जागा मिळाल्या. त्यांच्यापेक्षा तिप्पट पैसे देऊन सत्ताधाऱ्यांनी आमदारांंना खरेदी केले होते, असा आरोपही त्यांनी केला. प्राचार्य प्रा. डॉ. अभिजित वाडेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. राज महेंद्र सावंत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन समाधान इंगळे यांनी केले. डॉ. सुशांत खेडगीकर यांनी आभार मानले.
 
ओबामांना ठणकावले
बराकओबामांनी राष्ट्रपती भवनातील व्हिजीटर्स बुकमध्ये त्यांनी भारताचा दुय्यम उल्लेख केला होता. तेव्हा मी त्यांना अमेरिकेत १९६२ मध्ये कृष्णवर्णीयांना मतदानाचा अधिकार मिळाला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व भारतीयांना मताचा अधिकार दिल्याचे ठणकावले होते, अशी आठवणही येचुरी यांनी सांगितली.
 
बातम्या आणखी आहेत...