औरंगाबाद - दैनिक ‘दिव्य मराठी’ व रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘कॉफी विथ ऑफिसर्स' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १६ ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथील सिडको परिसरातील संत तुकाराम नाट्यगृहात सकाळी १० वाजता होत असलेल्या या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.
याप्रसंगी प्रशासकीय सेवांमध्ये काम करणारे अधिकारी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी यांच्यामध्ये थेट संवाद होणार आहे. परीक्षेसाठी कशा प्रकारची तयारी करायची, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती अशा अनेक विषयांवर उपस्थित मान्यवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमामध्ये सहभागी विद्यार्थी उपस्थित अधिकाऱ्यांना प्रश्न विचारतील, निवडक प्रश्नांवर हा संवाद होणार आहे. प्रत्यक्ष अधिकाऱ्यांच्या सहभागामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि प्रेरणा निर्माण होणार आहे. प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कसे यश मिळवले, प्रशासनात काम करतानाचे त्यांचे अनुभव, प्रशासकीय पदांची प्रतिष्ठा व महत्त्व या सर्व बाबींवर प्रकाश टाकण्यात येणार येईल.
अनेकांची स्वप्ने साकार
रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राने गत पाच वर्षांत मराठवाड्यातील सुमारे साडेतीनशे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करून अधिकारीपदाचे त्यांचे स्वप्न साकार केले आहे. आत्महत्या केलेल्या एका शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी रिलायबलने नऊ दिवसांचा सेमिनार आयोजित केला. यातून मिळालेल्या ७० हजारांच्या शुल्काची रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाचे शिक्षण किंवा मुलीच्या विवाहासाठी मदत म्हणून देण्यात येणार आहे.
धनंजय आकात, रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र