आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Compition In Shiv Sena, No Activity In BJP Inspirants Showing Strenght

सेनेत घमासान, भाजप सुनसान - इच्छुकांच्या शक्तिप्रदर्शनामुळे वातावरण तापले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिवसेनेत तिकिटे निश्चित झाल्याची बातमी समजताच इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन करीत रविवारी आपल्यालाच तिकीट मिळावे यासाठी प्रचार कार्यालयात गर्दी केली. घोषणाबाजी करतानाच आम्ही इतके दिवस पक्षासाठी काम केले, आता काही द्यायची वेळ आली की त्याच त्याच लोकांना तिकिटे का देता, असा सवाल काहींनी केला. अनेकांनी तर काहीही झाले तरी आपण निवडणूक लढवणारच असे सांगत बंडाचे इशारेही देऊन टाकले.

शिवसेनेच्या काही इच्छुकांना शनिवारी रात्री तुमचे तिकीट फायनल झाल्याचे सांगत तयारीला लागा, असे सांगण्यात आले होते. त्यापैकी काहींनी तर चक्क रात्रीच फटाके फोडून आनंद व्यक्त केला होता. पण त्यामुळे त्या वाॅर्डांतील इतर इच्छुकांच्या संतापाला पारावार राहिला नाही. काही ठिकाणी तिकिटासाठी शेवटचा जोर लावायचा असेल तर नेत्यांवरच दबाव आणावा लागेल, असे ठरवून इच्छुकांनी फिल्डिंग लावली. त्यामुळे शिवसेनेच्या समर्थनगरातील प्रचार कार्यालयावर तुफान गर्दी उसळली. गटागटाने कार्यकर्ते दाखल झाले.

मयूरनगर, शिवनेरी काॅलनी, रोजाबाग, मिटमिटा या भागांतील वाद त्यामुळे येथे पाहायला मिळाले. शिवनेरी काॅलनीतील एका इच्छुकासाठी शिवसेना महिला आघाडीच्या विभागप्रमुखाने तर महापौर कला ओझा, खासदार चंद्रकांत खैरे यांना थेटच सुनावले. आम्ही दहा दहा वर्षे पक्षासाठी खस्ता खाल्ल्या, तरीही आम्हाला संधी मिळणार नसेल तर काय कामाचे, असा सवाल त्यांनी केला. त्यावर त्यांच्या विरोधकांपैकी एकाने यांनी पक्षासाठी विधानसभेला काम केले नाही, असे म्हणताच महिला तुटून पडल्या. खोटे बोलायला लाज वाटत नाही का, असे सुनावत त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घ्या व संधी द्या, अशी जोरदार मागणी केली.
मिटमिट्यात विकास जैन यांच्या उमेदवारीला विरोध करून काही पदाधिका-यांनी काल राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. ही बातमी समजताच आज तेथील पदाधिकारी नसलेले कार्यकर्ते तेथे आले व त्यांनी कोणालाही उमेदवारी द्या, आम्ही काम करू असे सांगितले. मयूरनगरात सभागृह नेते किशोर नागरे यांच्या पत्नीला तिकीट देण्यावरून स्थानिक पदाधिकारी नाराज आहेत. त्यांनी पक्षाकडे नागरे यांच्या घरात तिकीट देऊ नका, अशी मागणी केली.
त्यानंतर दुपारी नागरे यांच्यासोबत तेथील एक गट आला व त्यांनी प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे, खासदार खैरे व विनोद घोसाळकर यांची भेट घेत आपले गा-हाणे मांडले.
विशेष म्हणजे, काही इच्छुकांनी आपले शक्तिप्रदर्शन करतानाच तिकीट न मिळाल्यास बंडखोरी करण्याचाही इशारा देऊन टाकला. आता नाही तर पुन्हा नाही अशी वेळ असल्याने हे करावेच लागेल, असे स्वत:चेच समर्थनदेखील त्यांनी या वेळी केले.
पुढे वाचा... भाजप कार्यालयात शुकशुकाट