आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलगुरूंच्या विरोधात कुलपतींकडे तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद आणि पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांच्या दबावात कुलगुरू काम करत आहेत. त्यामुळे विद्यापीठाची बदनामी होत असल्याचा आरोप अधिसभा सदस्य प्रा. गजानन सानप आणि विद्या परिषद सदस्य डॉ. शंकर अंभोरे यांनी शुक्रवारी (१० जुलै) केला आहे. प्रा. सानप यांनी विद्यापीठ विकास मंचतर्फे, तर डॉ. अंभोरे यांनी मुप्टातर्फे कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना निवेदनाद्वारे कुलगुरूंच्या चुका निदर्शनास आणून दिल्या आहेत. आमदार चव्हाण यांचा हस्तक्षेप थांबवण्याची मागणीही दोघांनी केली आहे.

व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तथा शुल्क निश्चितीकरण समितीचे प्रमुख डॉ. दत्तात्रय आघाव यांनी मराठवाडा दुष्काळाच्या छायेत असताना शुल्कवाढ केली आहे. मागील तीन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडलेले नाही. अशा परिस्थितीत त्यांचे पाल्य भरमसाट शुल्क भरून शिक्षण कसे काय घेऊ शकतील? तरीही डॉ. आघाव यांनी आमदार चव्हाण यांच्या इशाऱ्यावरूनच शुल्कवाढ केली होती. व्यवस्थापन परिषदेच्या सर्व सदस्यांना कुलगुरूंऐवजी आमदारच मोठे असल्याचा भास होत आहे. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच आधी शुल्कवाढ केली अन् मग आमदारांच्या दबावामुळे मागे घेतल्याचे चित्र निर्माण केले गेले. यामध्ये पूर्णपणे षड््यंत्र होते, असा आरोप प्रा. सानप यांनी कुलपतींना दिलेल्या निवेदनात केला आहे. कुलगुरूंच्या तक्रारीचे स्वरूप निवेदनाला असून त्यांनी दबाव झुगारून काम करावे, असे निर्देश द्यावेत, अशी विनंती कुलपतींकडे करण्यात आली आहे.

मुप्टाच्या दबावात काम केल्याचे उदाहरण
डॉ.शंकर अंभोरे, प्राचार्य डॉ. किशोर साळवे, अरुण शिरसाट आदींच्या स्वाक्षरीने मुप्टाचे निवेदन कुलपती कार्यालयाला पाठवले आहे. त्यामध्ये एमसी मेंबर संजय निंबाळकर यांच्या कॉलेजमध्ये रिझर्व्हेशन डावलण्याच्या कृतीला कुलगुरूंची मान्यता असल्याचे म्हटले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या डॉ. जाधव यांच्यावरील कारवाई मागे घेण्याची मागणी एमसी मेंबर डॉ. प्रमिला जाधव यांनी केली आहे. त्यासाठीही कुलगुरू अनुकूल असल्याचा आरोप निवेदनात केला आहे.