आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक नगरसेवकांनी केला राडा, तक्रार मात्र दोघांच्याच विरोधात; इतरांचे काय...?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुक्त मुगळीकरांना निवेदन देताना वंदे मातरम संघटनेचे पदाधिकारी. - Divya Marathi
आयुक्त मुगळीकरांना निवेदन देताना वंदे मातरम संघटनेचे पदाधिकारी.
औरंगाबाद- शनिवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत एमआयएम नगरसेवकांसह शिवसेना भाजपच्या नगरसेवकांनीही मोडतोड केली होती. मात्र सोमवारी तक्रार फक्त एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन शेख जफर या दोघांच्याच विरोधात देण्यात आली. महापौरांनी दिलेल्या पत्रात फक्त दोघांचीच नावे असल्याने दोघांच्याच विरोधात तक्रार देण्यात आल्याचे आयुक्त दीपक मुगळीकर यांनी सांगितले. महापौरांनी सूचना केली तर इतर नगरसेवकांच्या विरोधातही तक्रार दिली जाऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

सर्वसाधारण सभेत वंदे मातरमच्या वेळी एमआयएम काँग्रेसचा प्रत्येकी एक नगरसेवक बसून होता. यावरून युती एमआयएमच्या सदस्यांमध्ये जोरदार संघर्ष झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत गेले होते. हाणामारीसाठी सदस्यांनी सभागृहातील माईकच्या दांड्या तोडल्या. काहींनी पंखेही उचलले होते. एमआयएमचे सय्यद मतीन शेख जफर हे स्पष्टपणे माईक तोडताना दिसतात. शिवसेना भाजपचे सदस्य जेथे थांबलेले होते, तेथेही माईक तोडण्यात आले. याचा अर्थ युतीच्या सदस्यांनीही मोडतोड केल्याचे स्पष्ट होते. परंतु आदेश देताना महापौरांनी फक्त मतीन जफर या दोघांच्याच विरोधात तक्रार नोंदवण्यास सांगितले. शनिवारी सायंकाळी महापौरांनी स्वत:च्या सहीने आयुक्तांना पत्र देऊन गुन्हा नोंदवण्यास सांगितले होते. उशीर झाल्यामुळे त्याच दिवशी पोलिसात तक्रार देणे शक्य झाले नाही. रविवारी सुटी होती. सोमवारी पालिकेच्या वतीने सिटी चौक पोलिसात तक्रार देण्यात आली. त्यात फक्त मतीन जफर यांचीच नावे आहेत. 

मोडतोड करताना आणखी नगरसेवक दिसतात, तेव्हा फक्त दोघांविरोधातच तक्रार का, असा प्रश्न आयुक्तांना केला असता, तूर्तास महापौरांच्या सूचनेनुसार दोघांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. पुढे जशा सूचना येतील, तशी कारवाई प्रशासनाकडून करण्यात येईल, असे स्पष्ट केले. 

वंदे मातरमचा अवमान करणाऱ्या नगरसेवकांचा पुण्याच्या वंदे मातरम संघटनेने सोमवारी निषेध केला. या नगरसेवकांवर कडक कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला असून मनपा आयुक्त दीपक मुगळीकर, स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल आणि पोलिस उपायुक्तांना याबाबतचे निवेदन दिले आहे. या शिष्टमंडळात प्रशांत नरवडे यांच्यासह उपाध्यक्ष सूरज जाधव, विनोद मोहिते, आकाश गजमल आणि दीपक देशमुख यांचा समावेश होता. 
बातम्या आणखी आहेत...